बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुद्गुल पुराणात आहे. कल्याण नावाच्या व्यापार्याचा बल्लाळ हा सुपुत्र. बालपणापासून त्याची विनायकावर श्रद्धा होती. त्याने गावातील इतर मुलांनाही भक्ती मार्गास प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशास दूर फेकून दिले. व बल्लाळाचे हाल करून त्यास झाडाला टांगून दिले. बल्लाळाने गणेशाची आराधना केली. गणेश त्यास प्रसन्न झाले आणि त्याच्या इच्छानुसार पाषाणरूपी मूर्तीत येथेच राहिले. व बल्लाळेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे. बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली हीच ती मूर्ती. प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथील बल्लाळेश्वराची पूजा सकाळी ११.३० पर्यंत स्वहस्ते करता येते. माघी चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात.
रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभार्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणार्या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभार्याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चवर्या ढाळीत आहेत.
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply