भावभक्तीची शुभ्र फुले ही वाहुनी तवचरणा
पुजीन मी तुजला पंचानना, शंकरा तुजला पंचानना ।।धृ।।
प्रेमभावमनी अथांग भरला ओथंबुनी तो नेत्री उतरला ।।१।।
अश्ररुपे ते सुजल वाहिले पादप्रक्षालना सहा रिपूंचे भस्म करोनी विलेपनार्थे तुला वाहुनी
सात्विकतेचा धूप सुगंधित तोषवितो या मना ।।२।।
भक्तीची ती ज्योत लावुनी दीप तेविला देह निरंजनी
त्या दीपाने ओवाळीन तुज शिवा हे शुभवदना ।।३।।
नैवेद्यास्तव काय आणु मी ? अज्ञ अल्पमती अजाण परि मी
फलासहित त्या कृतकर्मांचा नैवेद्य हा समर्पणा ।।४।।
नयना व्हावे तुझेच दर्शन अधरी अखंडित तुझेच चिंतन
तुझ्या भक्तिविण मनात माझ्या अन्य नको भावना ।।५।।
ध्यान मग्न तव मूर्ती बघता जळो काम अन् नुरो अहंता
वरदहस्त तव असो मस्तकी आशिर्वाद कारणा ।।६।।
काय मागणे तुज हे शंकर ! अशीच सेवा घडो निरंतर
कृपामृताच्या वर्षावाने सफल करी जीवना ।।७।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply