मौखिक अस्वच्छता हे श्वासाला दुर्गंध येण्याचे एक कारण असू शकते. किंबहुना दात, जीभ, हिरड्या यांच्या म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, हे श्वाेसाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असते. काहीही खाल्ल्यानंतर दातात अन्नाचे छोटे मोठे कण अडकतात. तोंडातील जीवाणूंद्वारे त्या कणांचे विघटन होऊन दुर्गंधीयुक्त रासायनिक पदार्थ आणि वायू तयार होतात. या रासायनिक पदार्थांमुळे आणि वायूंमुळे तोंडाचा वास येऊ लागतो. शिवाय त्यांच्यामुळे दात किडतात आणि हिरड्या सुजून त्यात पू भरतो. दात आणि हिरड्यांच्या या जंतुसंसर्गामुळे हा वास अधिकच दुर्गंधीयुक्त बनतो. अनेकदा दातांची कवळी, काही दातांची डेन्चर्स, दातांना बसवलेल्या तारा ज्या व्यक्ती वापरतात, त्यांनी त्या त्या गोष्टींची स्वच्छता न बाळगल्याने त्यांना श्वचसन दुर्गंधीची बाधा होते. दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात तर जिभेवर द्रवपदार्थांचा साका जमा होतो. जिभेवर हा अन्नपदार्थांचा साका जमा होऊन त्यामध्ये जंतूंचा शिरकाव होतो आणि त्याचा वास येऊ लागतो. श्वावस दुर्गंधीच्या या कारणाला आळा घालण्याकरिता दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासावेत. दातांबरोबर जीभसुद्धा घासून स्वच्छ करावी. काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या कराव्यात. अधूनमधून “डेंटल फ्लॉस‘ वापरून दातांच्या फटीतले अन्नकण काढावेत. वर्षातून किमान एकदा दंत वैद्याकडून दातांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
विशिष्ट अन्नपदार्थ आणि पेयपान
लसूण, कांदा, मसाल्याचे पदार्थ असे तीव्र वासाचे पदार्थ खाण्यात आले तर तोंडाला वास येतोच. चहा, कॉफी, मद्यपान अशा पेयांच्या सेवनानेसुद्धा श्वासाला दुर्गंध येतोच. मद्यसेवनानंतर उच्छवासात येणारा त्याचा अंश “ब्रेथ ऍनॅलायझर‘ या यंत्राच्या साह्याने पोलिसही तपासतात. या घन आणि द्रवपदार्थांच्या सेवनाने येणारा दुर्गंध जर टाळायचा असेल तर ते खाणे (किंवा पिणे) टाळणे हाच त्यावरचा उपाय असतो. कारण कितीही ब्रश केला किंवा गुळण्या केल्या तरी, कांदा-लसणाचा किंवा दारूचा वास सहजी नाहीसा होत नाही. याउलट दिवसभरात पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तींचे तोंड कोरडे पडून त्यांच्या श्वाससामध्येसुद्धा दुर्गंध जाणवू शकतो.
तंबाखूजन्य पदार्थ
धूम्रपानाचा वास हादेखील मद्याप्रमाणे उच्छवासातून येत असतो. तंबाखू, गुटखा, पान यांच्या सेवनानंतर त्यांच्यापासून निघणारा रस तोंडातील लाळेमध्ये मिसळतो. हा मिश्र द्रव तोंडातील दात, गालाची आतली बाजू, जीभ, हिरड्या यांच्यावर एक पातळ थर निर्माण करतो. त्याचा वास येत राहतो. त्याशिवाय विडी-सिगारेटच्या धुराचा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा तोंडातील दात, हिरड्या, टाळू आणि जीभ यांच्यावर रासायनिक परिणाम होऊन दातांवर लालसर काळ्या रंगाचे किटण तयार होते. त्याचाही कायमस्वरूपी दुर्गंध येत राहतो. या गोष्टींच्या व्यसनापासून मुक्त होणे, हाच या दुर्गंधावर मात करण्याचा ठोस उपाय आहे.
फॅड डाएट
व्यायाम करून वजन कमी करण्याऐवजी काहीतरी नवीन जाहिरातबाजी करणाऱ्या “विशेष आहाराच्या‘, डाएटच्या, उपाशी राहण्याच्या नादी लागण्याकडे आजकाल बहुसंख्य लोकांचा कल असतो. अशा डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ अत्यल्प खायला आणि साखर पूर्णपणे वर्ज्य करायला सांगितलेली असते. हा सल्ला अतिशय अशास्त्रीय असतो. कारण शरीराला पिष्टमय पदार्थ हे दैनंदिन जीवनात लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यावश्यसक असतात. ते कमी मिळाल्यामुळे शरीरातील चरबी वितळून तिच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. या प्रक्रियेत शरीरात “कीटोन्स‘ नावाचे दूषित पदार्थ निर्माण होतात. यांचा एक वेगळाच गोडसर वास श्वासाला येत राहतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त प्रमाणात राहिली तर असाच वास येत राहतो.
औषधे
काही ठराविक औषधांच्या नियमित वापरानंतर श्वाासाला दुर्गंध येऊ शकतो. यात छातीतल्या दुखण्यावर घेतल्या जाणाऱ्या नायट्रेट्स, केमोथेरपीमध्ये वापरली जाणारी काही औषधे, फिनोथायाझिन गटातली चिंतानाशक औषधे येतात. याशिवाय ऍसिडिटी कमी करणारी अल्सरविरोधी औषधे. उच्च रक्तदाबावरील, अर्धशिशीवरील, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी काही औषधेदेखील अशीच त्रासदायक ठरू शकतात. डोके आणि मानेच्या भागात एखाद्या अवयवाचा कर्क असेल तर त्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या किरणोपचारांमध्येसुद्धा असेच घडते.
काही आजार
काही विशिष्ट आजारांमध्ये तोंडाला दुर्गंधी येणे प्रकर्षाने आढळते.
पोटाचे आजार- एच. पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग जठर आणि लहान आतड्याच्या सुरवातीच्या हिश्या आजात होतो. यामुळे हायपरऍसिडिटी, पोट दुखणे अशा प्रकारच्या त्रासांसमवेत तोंडाला दुर्गंधी येण्याचे आणि करपट ढेकर येण्याची लक्षणे आढळतात. हाच प्रकार जी.ई.आर.डी. या आजारात होतो. यामध्ये पोटातील आम्ल हे अन्ननलिकेत येत राहते.
श्वासनसंस्थेचे आजार- सर्दीने नाक चोंदणे, सर्दी पिकणे, सायन्युसायटीस, घशाला सूज तसेच जंतुसंसर्ग होणे, टॉन्सिलायटिस, ब्रॉन्कायटिस, ब्रॉंकिएकटॅसिस अशा श्वेसन संस्थेच्या आजारात श्वावसाला हमखास दुर्गंधी येते.
झीरोस्टोमिया- या आजारात तोंडात लाळ तयार होत नाही. त्यामुळे तोंडातील जंतूंची बेसुमार वाढ होते, शिवाय सर्वसामान्य लोकांच्या तोंडात आढळणाऱ्या जंतूंव्यतिरिक्त इतर प्रकारचे जंतूदेखील नव्याने तयार होतात. त्यांचा अन्नकणांशी संपर्क होऊन, सातत्याने खूपच दुर्गंधी येत राहते.
स्योग्रेन्स सिंड्रोम- या स्वयंप्रतिकार रोगात (ऑटोइम्युन डिसीज) रुग्णाची लालोत्पादक पिंडे नष्ट होतात. त्यामुळेसुद्धा तोंड कोरडे पडून दुर्गंधी येत राहते.
“हॅलिटोफोबिया‘ या मनोविकारात रुग्णाला सतत आपल्या तोंडाला दुर्गंध येतोय असं वाटत असतं. प्रत्यक्षात तसा तो येतच असतो असेही नाही, पण अशा व्यक्ती इतरांच्या साध्या बोलण्याचा तसा अन्वयार्थ लावतात. “आपल्या तोंडाची दुर्गंधी टाळणे‘ हा एक विचार त्यांच्या मनात पक्के घर करतो, त्यामुळे सतत दात घासणे, फ्लॉस करणे, च्युईंग गम खाणे, माउथ फ्रेशनर्स वापरणे अशा गोष्टी ते सतत अकारण करत राहतात. आजच्या जमान्यात “सेल्फ इमेज‘ किंवा स्वयं प्रतिमा या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते. चांगले दिसण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. पण यामध्ये वेशभूषा, केशभूषा, स्वतःला नटवण्यासाठी अनेक प्रसाधने वापरणे एवढेच केले जाते. पण तोंडाचे आणि पर्यायाने शरीराचे आरोग्य टिकवणाऱ्या मौखिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास, श्वास दुर्गंध तर जाणवणार नाहीच; पण व्यक्तिमत्त्वदेखील उजळून जाईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. अविनाश भोंडवे
Leave a Reply