नवीन लेखन...

संगणकीय आजार !

रोजचे संगणकावरचे काम हे आता जवळपास कुणालाच न टाळता येण्यासारखे आहे. सतत संगणकावर काम करुन करून अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. काहींचे डोळेही दुखतात. संगणकासमोर सक्तीने बसावे लागण्याचे तोटे आणि त्यावरचे काही सोपे उपाय.

मानदुखीची कारणे अनेक असू शकतात. पण संगणकासमोर घालवलेला वेळ जितका जास्त, तितकी मानदुखी अधिक असे एक साधे समीकरण आहे. या मानदुखीसाठी संगणकासमोर बसण्याची आपली पद्धत कारणीभूत ठरते. अनेकदा संगणकाचा ‘मॉनिटर’ डोळ्यांच्या सरळ रेषेच्या तुलनेत वरच्या किंवा खालच्या पातळीवर ठेवलेला असतो. मॉनिटरकडे पाहण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की तो असा वर किंवा खाली आहे हेही लक्षात येत नाही. मॉनिटर नेहमी डोळ्यांच्या समोर सरळ रेषेतच हवा. तो काही मिलिमिटर वर किंवा खाली चालू शकेल, पण मॉनिटरकडे पाहताना वर किंवा खाली पाहावे लागू नये अशी त्याची जागा असावी. संगणकासमोर काम करताना काही जणांना एकदा की- बोर्डकडे आणि एकदा मॉनिटरकडे असे सतत खाली आणि वर पाहावे लागते. सहसा कागदपत्रे वाचून ती टाईप करताना असे होते. हे देखील मानदुखी वाढवणारे ठरते. अनेकदा की- बोर्ड आणि मॉनिटर यांच्या जागांचा काही मेळच नसतो. एकीकडे की- बोर्ड आणि त्याच्या समोर नव्हे तर थोडासा दूर तिरक्या रेषेत मॉनिटर अशी परिस्थिती असते. यात नुसते वर-खालीच नाही तर उजवीकडे- डावीकडे असेही सारखे पाहावे लागते आणि मानेच्या स्नायूंवर वाढीव ताण येतो.

संगणकासमोर बसल्यावर मॉनिटरवरील मजकूर वाचण्यासाठी खुर्चीतून पुढे वाकावे लागू नये हा पहिला नियम. त्यामुळे खुर्ची सहजपणे पुढे किंवा मागे हलवता यावी. काही खुच्र्याना हाताचे कोपर टेकवायला जागाच नसते. माणसाची उंची अधिक असेल तर की-बोर्ड वापरताना कोपरे सतत हवेत लटकल्यासारखी राहतात. असे करताना खांदे वर उचललेले राहतात आणि मानेच्या बाजूला असलेला स्नायू सतत दाबला जातो. यामुळे काही वेळाने मान दुखायला लागते. त्यामुळे खुर्चीच्या दोन्ही बाजूंना कोपर टेकवायला आधार असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर खुर्चीच्या हातांची उंची कमी-जास्त करण्याची सोय असलेली खुर्ची निवडल्यास उत्तम. की- बोर्डवर टाईप करताना कोपरांना आधार मिळाला तर खांद्यांवर ताण येत नाही. पाठदुखी टाळण्यासाठी खुर्चीला चांगला ‘लंबर सपोर्ट’ असायला हवा. खुर्चीची पाठ सहसा केवळ पाठीला आधार देण्यापुरती असते. पण हा आधार खांद्यांपर्यंत मिळणे गरजेचे असते. खुर्चीची पाठ तुमच्या खांद्यांपर्यंत असेल तर संपूर्ण पाठीला आधार मिळेल. अशी खुर्ची वापरल्यास पाठदुखीबरोबरच मानदुखीलाही प्रतिबंध करता येऊ शकतो. सातत्याने संगणकावर काम करायचे असेल त्यांनी काही वेळ गेल्यावर पाठ आणि मानेच्या स्नायूंचे साधे व्यायाम करावेत. हे व्यायाम अगदी साधे, कार्यालयात देखील करण्यासारखे असतात. आपल्या डॉक्टरांकडून ते जरूर शिकून घ्यावेत. या हालचालींमुळे पाठ, कंबर आणि मानेवरचा ताण हलका होतो. काहींना तासा- दोन तासांनी ब्रेक घेतलेला पुरेल तर काहींना दर अध्र्या तासाने ‘विश्राम’ स्थितीत यावे लागेल. ब्रेक घेणे म्हणजे काम थांबवून पुन्हा संगणकावरच फेसबुक किंवा तत्सम काहीतरी करणे नव्हे! ब्रेक घेतल्यावर ती पाच मिनिटे तुम्ही संगणकापासून दूर राहायला हवे. या काळात उभे राहून पाठीचे व्यायाम करा किंवा कार्यालयात या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर मारून या.
चष्म्याचा क्रमांकही तपासून घ्या.

नेहमी संगणकावर काम करणाऱ्यांनी आपला चष्म्याचा नंबर बरोबर आहे ना हे ठराविक काळाने तपासून घेतलेले बरे. चष्म्याचा नंबर बदललेला असला तर डोळ्यांवर वाढीव ताण येतो. मानदुखी आणि डोकेदुखीसाठीही हे कारणीभूत ठरू शकते. चाळिशीनंतर बहुतेक जणांना वाचताना चष्मा लागतो, पण ही मंडळी चष्मा घालायचे टाळतात. त्यामुळे आपल्याला चष्मा असेल तर संगणकावर काम करताना तो घालायचे विसरू नका. चष्मा असताना तो न वापरणे हे देखील मान दुखण्याचे एक कारण ठरू शकते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- संपदा सोवनी / सकाळ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..