सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. याच आरमाराची शान असलेली ‘संगमेश्वरी’ नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या निढळेवाडी येथील सुतारांनी तयार केल्याचे सांगितले जाते. सुतारकलेची ही परंपरा जोपासत आजही या गावात नौका तयार करण्याचा व्यवसाय करण्यात येतो.
संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर शास्त्री नदीच्या तटावर मुंबई-गोवा महामार्गाला लागूनच नारळाच्या झावळ्यांनी बनलेल्या मोठ्या छताखाली नौकांचा सांगाडा पाहायला मिळतो. अनेक कारागीर येथे रंधा, हातोडी, करवत आदी हत्यारांसह काम करण्यात गुंतलेले असतात. साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षांची नौका बांधणी व्यवसायाची परंपरा अनेक अडचणींचा सामना करीत निढळेवाडीच्या सुतार समाजाने जपली आहे.
पूर्वी ओझरखोल आणि महाबळे या दोन गावांच्या सीमा लागून होत्या. मात्र सुतार समाजाच्या पुर्वजांना इनामात गावाची जमीन मिळाल्यावर या दोन्ही गावाच्या मधोमध ‘वाडा निढळ’ हे गाव वसले. याच गावाचे पुढे नामकरण निढळेवाडी असे झाले. साडेपाचशे लोकसंख्येच्या या गावात ९० टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह नौकाबांधणीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. गावातील मुलांचे बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण होते. तुरळक अपवाद वगळता इतर मुले याच व्यवसायाकडे वळतात, असे आनंद वाडकर यांनी सांगितले.५६ वर्षाचे वाडकर ३२ वर्षापासून या व्यवसायात आहेत.
नदी किनारी झापाची कुड (छप्पर) बनवून त्याखाली नौका बांधणीला सुरूवात होते. नौका बांधणीसाठी कर्नाटकातील कारवार, मट्टी, आईन येथून लाकूड येते. नौका ज्या आधारावर उभी केली जाते त्या लाकडास पठाण (नौकेचा कणा) म्हणतात. त्याला जोडून नौकेचा इतर सांगाडा तयार केला जातो. एक सारख्या जाडीच्या फळ्या तयार करून त्या सांगाड्यात वापरल्या जातात. फळ्यांमधील भेगा बुजविण्यासाठी कडू तेलात चंद्रूस (झाडाचा चीक) शिजवून तो कापसासोबत वापरतात. या मिश्रणामुळे फळ्या एकमेकाला घट्ट चिकटतात. खिळे मारण्यापूर्वी कुठेही भेग राहू नये ‘वाकं’ बसवितांना ‘कावर’ने दोरी घट्ट बांधली जाते. खिळे मारताना आधी दोरी सोडून नंतर कावर काढली जाते. हे काम अत्यंत कसबिचे असते. कामात जराशी चूक झाल्यास वर्षभराची मेहनत वाया जाण्याची शक्यता असते.
एक नौका बांधण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागतो. पावसाळ्यातही हे काम सुरूच असते. नौकेचा मालक सर्व साहित्य पुरविण्याची व्यवस्था करतो. आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असलेला गावातील एखादा कारागीर कर्ज काढून स्वत: नौकाबांधणीचे धाडस करतो. सागवान लाकडाचा उपयोग केल्यास साधारण ६० फुटाच्या नौकेला ४० ते ५० लक्ष तर साधारण लाकडापासून बनविलेल्या नौकेसाठी २५ ते ३५ लक्ष रुपये खर्च येतो. कारागिराला नियमित काम मिळाल्यास महिन्याला साधारण सात-आठ हजार रुपये मिळतात. अत्यंत कष्ट आणि तेवढेच कौशल्य असलेले हे काम शास्त्री नदीच्या तटावर तन्मयतेने सुरू असते. विश्रांतीसाठी नौकेच्या बाजूलाच फळ्या टाकून त्यावर सोय केलेली असते. काही कारागीर फळ्यांचे कटींग करण्यासाठी जनरेटरवर चालणारे यंत्रही वापरतात. एकावेळी आठ ते दहा नौकांचे काम या ठिकाणी चालते.
साडेतीनशे पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असणाऱ्या या व्यवसायाला अडचणीत असताना मत्स्य विभागातर्फे नौका बांधणीसाठी मच्छीमार सोसायट्यांना अनुदान मिळू लागल्याने थोडाफार आधार मिळाला आहे. गावातील बरीचशी मंडळी पूर्वी घराचे व शेती अवजारांचे कामही करायची. मात्र आता प्रामुख्याने नौका बांधणीतच बहुतेकांनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. कोकणातील अनेकांचे जीवन मच्छीमारीवर अवलंबून असल्याने त्यांच्या जीवनात नौकेलाही तेवढेच महत्वाचे स्थान आहे. दर्यावर आपल्या मालकाला विश्वासाने नेणारी ही नौका घडविणारे निढळेवाडीचे कलाकार इतिहासाच्या अनेक पाऊलखुणांचा मागोवा घेत त्या मार्गाने पुढे जात आहेत. त्यांच्या कलेची आणि कष्टाची जाण समाजाने ठेवावी एवढीच अपेक्षा त्यांची आहे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply