नवीन लेखन...

संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक सी.रामचंद्र

सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्घ होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले. ‘न्यू थिएटर्स’ च्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या (नोटेशन्स) बनविणे हाही त्यांचा एक छंद होता. चित्रपटात काम करण्याचीही त्यांना ओढ होती. नागानंद ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; परंतु तो चित्रपट यशस्वी झाला नाही. प्रसिद्घ चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तेथे हूगन आणि मीरसाहेब ह्या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज त्यांना आला. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या करताना स्वतःला सुचलेले नवीन काही ते त्यांत घुसडून देत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्घतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. चाली कशा बांधतात ह्याचे प्रात्यक्षिकच ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ मध्ये सी. रामचंद्रांना मिळाले. थोर संगीतकार अनिल विश्वास ह्यांनी हिंदी संगीतात पाश्चात्त्य संगीताचे स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते. त्यांच्या चालींचे संस्कारही सी. रामचंद्रांवर झाले. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय मुख्यत्वे सी. रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळी भारतीय संगीतातील गोडवा व सुरावटही त्यांनी आपल्या संगीतातून जपली. हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते मा. भगवान ह्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक्कोडी हा तमिळ चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचे संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या सुखी जीवन ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. ‘जयंत देसाई प्रॉडक्शन्स’ चे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपटही त्यांनी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीपजी ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ ह्या चित्रपटसंस्थेत सी. रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे-अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटामुळे त्यांचे नाव भारतभर झाले. अनेक चित्रपट त्यांच्याकडे आले. मा. भगवान ह्यांच्या अलबेला ह्या अफाट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील ‘भोली सूरत दिलके खोटे’, ‘शोला जो भडके’ , ‘शाम ढले खिडकी तले’, ‘मेरे दिल की घडी करे टिक टिक’, ‘ओ बेटाजी ओ बाबूजी’ ही गाणी अतिशय गाजली. त्यांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. विशेषतः ‘धीरे से आजा रे अखियनमे निंदिया’ ही लोरी (अंगाई गीत) हिंदी चित्रपटांतल्या गाजलेल्या अविस्मरणीय लोरींपैकी एक मानली जाते. त्यानंतर फिल्मिस्तानच्या अनारकली ने यशाचा उच्चांक गाठला. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा सर्वाधिक होता. ‘ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत अवीट गोडीमुळे अजरामर ठरले. आझाद, इन्सानियत, तिरंदाज, यास्मिन, शहनाई, नवरंग, नास्तिक, झांझर, शिनशिनाकी बबला बू, दुनिया गोल है हे त्यांच्या संगीत दिग्दर्शना-खालील काही उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांपैकी झांझर व दुनिया गोल है यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केली होती. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीतात त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला होता.

सी. रामचंद्र यांनी संगीतबद्घ केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली. उदा. ‘जाग दर्दे इष्क जाग’ , ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’, ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘देख तेरे संसार की हालत’, ‘ कैसे आऊँ जमुना के तीर’, ‘कितना हसीन है मौसम’ , ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ , ‘इना मिना डिका’, ‘कटते है दुख मे ये दिन’ व ‘तुम क्या जानो, तुम्हारी याद मे’ , ‘आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना’, ‘जलनेवाले जला करे’ इत्यादी. मा.सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले. सुरूवातीच्या काळात आर्. एन्. चितळकर या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी धनंजय व घरकुल हे मराठी चित्रपट निर्माण केले, त्यांना संगीत दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुल मधील गाणी, विशेषतः ‘पप्पा सांगा कुणाचे’ हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत-चीन युद्घाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या भावोत्कट गीतात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केलेले आहे. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे.

सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मराठी विश्वकोश

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..