आज ६ नोव्हेंबर.. आज हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेता म्हणून ज्यांना ओळखलेजाते अशा संजीव कुमार यांची पुण्यतिथी
जन्म: ९ जुलै १९३८
संजीव कुमार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले श्री हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. सुमारे २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी १५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ या चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या शिवाय सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणूनही तीन फिल्मफेअर पुरस्कारांनीही संजीव कुमार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी १९६० साली आलेल्या ‘हम हिंदुस्तानी’या चित्रपटात केवळ दोन मिनिटांच्या भूमिकेतून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत स्टारडम ही संकल्पना त्याकाळात नुकतीच रुजू झालेली होती. राजेश खन्ना हा बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार समोर आला. तर‘एंग्री यंग मॅन’च्या रूपात अमिताभ बच्चनने सामान्य माणसांच्या समस्या आणि संघर्षाला वाचा फोडली. आणि त्यांच्याही आधी देव आनंद या पहिल्या स्टाइल गुरुचा बॉलीवूडमध्ये समावेश झाला होता. अशा संक्रमणाच्या काळात संजीव कुमार या सर्वांपेक्षा वेगळे ठरत, शांतपणे आपल्या मार्गाने जात आपल्या एका वेगळ्या स्थानी जाऊन पोचले. व्यावसायिक आणि ‘ऑफ बीट’ चित्रपटातील भेद मिटवून आपला वेगळा प्रेक्षक बनवित आपले स्थान पक्के करत होते. अभिनयाच्या बळावर त्यांनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला जो नेहमीच त्यांच्या वेगळ्या भूमिकांतील चित्रपटाची प्रतीक्षा करणारा होता. कोशिश’ चित्रपटापासून त्यांची गुलजारशी जोडी जमली. या जोडीने अनेक चांगले चित्रपट दिले. ‘कोशिश’ मध्ये त्यांनी एका मूक-बधिर व्यक्तीची केलेल्या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी हे सिद्ध करून दाखविले की अभिनयासाठी संवादांची आवश्यकता नसते. केवळ डोळे आणि चेह-याच्या हावभावावरून त्यांनी जोरदार अभिनय करून दाखविला. कोशिश, परिचय, मौसम, आँधी, नमकीन आणि अँगूर हे त्यांचे उत्कृष्ट चित्रपट आहेत. संजीव कुमार यांनी कुठल्याही भूमिकेला त्यांनी कमी न लेखता त्यात प्राण ओतले. मग ती कोशिशमधली मुक-बधिराची भूमिका असो, ‘अँगूर’मधला कॉमिक डबल रोल, ‘शोले’चा लाचार ठाकुर असो किंवा ‘आँधी’मधल्या महत्त्वाकांक्षी पत्नीचा लो प्रोफाइल पती. हिंदी चित्रपटात पहिल्यांदा संजीव कुमार यांनी ‘नया दिन नई रात’एकाच चित्रपटात नऊ रसांची संकल्पना स्पष्ट करणा-या नऊ भूमिका केल्या. पडद्यावर आपली प्रत्येक भूमिका शब्दशः जगणा-या या कलाकाराचे व्यक्तीगत आयुष्य मात्र दुःखद होते. हेमा मालिनीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने संजीवकुमार नंतर एकाकीच राहिले.
आपण ५० वर्षांपेक्षा जास्त जगूच शकणार नाही या गोष्टीची त्यांना पूर्ण खात्री होती. कारण त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणाही पुरुष ५० वर्षांपेक्षा जास्त जगू शकला नव्हता. संजीव कुमार यांचे ६ नोव्हेंबर १९८५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply