निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे ‘नको तो उन्हाळा’असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते.
निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी सहसा समतोल राखण्याचाच त्वाचा प्रयत्न असतो.
निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनातही समतोल राखण्याची नितांत गरज आहे. कारण मानवी जीवन ही तारेवरची कसरत आहे याची प्रचिती अनेकदा येते. अनेक वेळा थोडासा तरी ‘तोल’ गेला, की कधीही कोसळण्याची शक्यता असते.
डोंबारी लोक त्यांच्या खेळामध्ये तारेवरील संतुलन सांभाळण्यासाठी काठीचा वापर करतात. तशीच सद्सद्विवेकबुध्दीची व सारासार विचाराची काठी घेऊन त्याच्या मदतीने ही तारेवरची कसरत केली तर जीवनात कुठे खाली कोसळता येणार नाही.
‘तारेवरील कसरत’ करण्यात तरबेज असणाऱ्या एका डोंबाऱ्याच्या पोराला एकदा गर्व झाला, की मी काठीशिवाय तारेवरची कसरत करून दाखवितो. या खेळात अनुभवी असलेला त्याचा बाप त्याला म्हणाला, तू या खेळात जरूर तरबेज असशील, मात्र काठीशिवाय ही कसरत खेळण्याचे धाडस करू नकोस, मात्र पोराने बापाचे ऐकले नाही. तो काठीशिवाय तारेवर चढून कसरत करायला गेला. मात्र दोन-तीन पावले टाकली नाही तोच तो खाली कोसळला. त्याला बापाच्या म्हणण्याचे प्रत्यंतर आले होते.
Leave a Reply