नवीन लेखन...

संस्कार…..

प्रसंग पहिला….
माधव उठला आणि आईच्या रूम मध्ये गेला.. तिच्या कपाळाला हाथ लावून पाहीला तर अंग चांगलच तापल होत… रात्रभर खोकल्याची उबळ तिची चालु होती.. त्याच्या मागे मालतीही आली.
तिला बघुन तो म्हणाला “मालती मी आज ऑफिसला जात नाही.. आईला घेवून दवाखान्यात जातो.. तू चिन्मयला तयार कर.. जाता जाता त्यालाही शाळेत सोडून जाईल..”
” मी ही थांबू का?..मी पण नाही जात ऑफिसला” मालती म्हणाली.
तसा माधव म्हणाला “अग असे दोघांना घरात थांबायची आवश्यकता नाही … तू जा ऑफिसला… आईचे खायचे प्यायचे बघुन जा आणि तशी गरज लागल्यास मी तुला बोलावून घेईन..”
नुकताच उठलेला चिन्मय दारात उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत होता.. त्याला पाहुन मालती उठली आणि पुढच्या तयारीला लागली…
माधवने आईला उठवले…तिची पांघरून आवरता आवरता तिथेच उभ्या असलेल्या चिन्मयला म्हणाला “चिन्मय, आज आज्जीला बर नाही तिला त्रास द्यायचा नाही… चल आवर लवकर मी तुला शाळेत सोडतो आणि हो आईला सांग आज्जी उठलीय तिचा चहा आण म्हणाव…”
चिन्मय आईला निरोप द्यायला गेला तस त्याने आईला म्हंटल
“तुझा ताप आणि खोकला अजुन कमी नाही झालाय… तू आटप आवर… आपण सकाळी सकाळी दवाखान्यात जावुन येवू .. ”
आई ने फक्त बर म्हंटल आणि आपल आवरायला घेतल.
इकडे मालतीने स्वतःची, चिन्मयची तयारी केली… डबे भरले… माधवचे, आईचे खायचे तयार करून ठेवले… माधवला फळ, ज्यूस आणि इतर आईचे पथ्याचे कुठे ठेवले ते सांगितले..आणि ती ऑफिसला निघाली…
जाता जाता आईच्या रूम मध्ये डोकावून तिला म्हणाली “आई, काहीही लागल तर फोन करा… येते मी..”
चिन्मय तयारच होता …
माधव आईच्या रूम मध्ये गेला… तिला हलकेच हाथाने धरून गाडीपाशी आणले..चिन्मयला गाडीचे मागचे दार उघडायला लावले..
आईला मागच्या सिट वर बसवले… खालीवाकुन तिचे पाय हाथाने उचलून अलगद गाडीत ठेवले आणि गाडीचा दरवाजा बंद करता करता चिन्मयला म्हणाला
“जा आज्जीची पाण्याची आणि औषधाची पिशवी आत टेबलावर ठेवली आहे ती घेवून ये…तसा चिन्मय पळत जावून ते घेवून आला, तोपर्यंत माधवने गाडी बंगल्याच्या दरवाजात आणून उभी केली होती..
चिन्मय आल्यावर तो म्हणाला “चिन्मय आज पुढे नाही बसायच … आज आज्जी शेजारी मागे बस..”
एरवी पुढे बसण्यासाठी हट्ट करणारा चिन्मय आज चुपचाप मागे बसला आणि ते रवाना झाले..
दुपारी चिन्मय शाळेतून घरी आला तेंव्हा माधव आईच्याच रूम मध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत बसला होता..
चिन्मयच्या मागे लगोलग मालतीही आली… तिला इतक्या लवकर बघुन दोघांनाही आच्छार्य वाटले.
पण ती म्हणाली.
” काय करू माझ ऑफिसात लक्ष्यच लागत नव्हतं म्हणून आले लवकर.. ”
तिने आईच्या कपाळाला हाथ लावून पाहिला … ताप कमी झाला होता… खोकलाही आता नव्हता.
थोड्या वेळात आईही उठली… थोड़ी फ्रेश वाटत होती.. तिचा नेहमीच्या हसरा प्रसन्न चेहरा बघुन सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसु पसरले..
चिन्मयला बघुन आज्जीने त्याला जवळ बोलावले; तसा तो टुणकन उडी मारून आज्जीच्या मांडीवर जावून बसला… आज सकाळ पासून पहिल्यांदा आज्जीने त्याला जवळ घेतले होते.
तो आज्जीला बिलगला तसे सगळे प्रसन्न खुदकन हसले..
आता प्रसंग दूसरा………………….
सहा महिन्यानंतर,
माधव कामानिम्मित्त दिल्लीला गेला होता… त्याची आई गावी गेली होती…
घरात फक्त चिन्मय आणि मालती दोघच…
त्यादिवशी सकाळी सकाळी चिन्मयला जाग आली, ‘अरे सहा वाजून गेले अजुन आई कशी उठली नाही..’
तो मनातल्या मनात म्हणाला..
आईला उठवण्यासाठी त्याने तिला हाथ लावला तर तो चपापलाच… तिला जाम ताप होता…
त्याला काय करावे सूचना.. कसबस आईला त्याने उठवल… तिला म्हणाला “आई तुला ताप आहे….चल मी तुला दवाखान्यात घेवून जातो..”
तशी मालती म्हणाली “चिन्मय राहु दे, मी जाईन थोड्यावेळाने, तू आटोप लवकर.. मी रामभाऊंना सांगते तुला सोडायला शाळेत…”
“नाही आई मी आज शाळेत नाही जाणार… बाबा पण नाहीत… तूच आटोप आपण दवाखान्यात जावू… मी डॉक्टरांना फोन करतो..”
अस म्हणत तीच पुढच काही ऐकण्याच्या आत तो बाहेर पळाला… आईच्या फोन मधून डॉक्टरांना फोन लावला… दूसरा फोन बाबांना केला…
तसा माधव चिंतित झाला… त्याने फोन मालतीला द्यायला सांगितला..
“काय ग, काय झाल..?”
“काही नाही कणकण आहे… रात्री गोळी घेतलीय होईल ठीक.. पण आज ऑफिसल नाही जात..” मालती क्षीण आवाजात म्हणाली.
“कणकण नाही बाबा, चांगला ताप आहे…” मालतीच्या अंथरुणाच्या घड्या घालता घालता तो माधवाला फोन वर ऐकू जाव म्हणून जोरात ओरडला..
“ठीक आहे एक काम कर, मी रामभाऊंना सांगतो ते तुला दवाखान्यात घेवून जातील आणि तसेच चिन्मयलाही शाळेत सोडतील… तू तयार रहा…डॉक्टरांना ही फोन करतो… आणि तसाही मी संध्याकाळच्या फ्लाईटने परत येतोच आहे…आणि ऐक ज़रा चिन्मयला फोन दे…” माधव म्हणाला.
चिन्मयने फोन घेतला आणि माधव काही म्हणायच्या आत चिन्मय म्हणाला ” बाबा मी शाळेत जात नाहीये.. आईला घेवून दवाखान्यात जातो… आणि ड़ॉक्टर काकांना मघाशीच फोन करून सांगितलय मी…”
माधव फक्त एवढच म्हणाला “बर ठीक आहे, आईची काळजी घे … दंगा करू नको..”
माधवने मग त्याचा ड्राइव्हर रामभाऊ, डॉक्टर यांना फोन करून सांगितले आणि आपल्याला कामाला लागला..
संध्याकाळी तो घरी आला…
घर निटनेटके स्वच्छ होते… चिन्मयने कुठलाही पसारा केलेला दिसत नव्हता, दिवा बत्ती झाली होती…मालती डोळे मिटुन आपल्या रूम मध्ये पडली होती आणि चिन्मय तिथेच तिच्या शेजारी अभ्यास करत बसला होता…
त्याची चाहुल लागताच मालतीने डोळे उघडले… चिन्मय पळत माधवला बिलगला…
माधवने मालतीच्या कपाळाला हाथ लावून पाहिले ताप कमी होता..
एवढा वेळ हिरमुसलेला चिन्मय आईचा हसरा चेहरा पाहिल्यावर खुदकन हसला आणि आईच्या कुशीत जावून बसला..
माधवने मग त्याला खेळायला पाठवले आणि तो मालती शेजारी येवून बसला..
मालतीने मग सकाळ पासूनच सगळ माधवला डिटेल मध्ये सांगितल..
चिन्मयने पहिल डॉक्टरला फोन केला.. मग रामभाऊंना फोन करून गाडी तयार करायला सांगितली..
स्वत:च आपल आपल आवरल…आईसाठी घरकामाच्या मावशी कडून चहा करून आणून दिला.
मला हाथाला धरून गाडी पर्यंत घेवून गेला….गाडीत बसायच तर म्हणाला मागच्या सिट वर बस….
स्वतः दरवाजा लावला आणि पुढे न बसता माझ्याशेजारी मागे येवून बसला..
Vडॉक्टर कडून निघाल्यावर रस्त्यात गाडी थांबवायला लावून डॉक्टरांनी दिलेली औषध रामभाऊंना जावून आणायला लावली…
घरी आल्यावर, बिलकुल दंगा नाही,टीवी नाही… स्वयंपाकवाल्या मावशींनी जे दिले ते चुपचाप खाल्ल आणि दुपारी माझ्यापाशीच झोपला..
उठल्यावर दूधही आपल आपल घेतल… मला चहा औषध आणून दिली आणि येथेच अभ्यास करत बसला.
ते सांगताना मालतीच्या डोळ्यात पाणी येत होत..
तसा तिला जवळ घेत माधव म्हणाला..
“मालती, मी तुला म्हणाला होतो ना, संस्कार करावे लागत नाही ते पेरावे लागतात…ते आपोआप उगवतात… आपण जे पेरू ते संस्कार महत्वाचे…नाही का?”

संस्कार हे संस्कार असतात

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..