एक गरीब विणकर होता. त्याची त्याच्या कामावर अतिशय श्रद्धा होती. अतिशय मन लावून तो त्याच्या मागावर वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे तयार करायचा. थंडीचे दिवस आले म्हणून त्या विणकराने अतिशय परिश्रम घेऊन दोन कांबळ्या ( धोंगडीचा प्रकार) तयार केल्या. त्याच गावात एक अतिशय लबाड सावकार राहत होता. तो एकदा विणकराच्या घरावरून जात असताना त्याला त्या दोन कांबळ्या दिसल्या. त्याला त्या आवडल्या म्हणून त्याने विणकराकडून त्या खरेदी केल्या. मात्र ‘ आता माझ्याजवळ पैसे नाहीत उद्या घरी येऊन पैसे घेऊन जा’ असे त्याला सांगून तो त्या कांबळ्या घेऊन गेला.दुसरे दिवशी विणकर पैसे मागण्यासाठी सावकाराच्या घरी गेला. मात्र सावकाराला त्याचे पैसे बुडवायचे होते म्हणून सावकाराने त्याला खोटेच सांगितले. ‘ अरे काय सांगू, कांबळ्या ज्या खोलीत ठेवल्या होत्या तेथे अचानक आग लागली व त्या आगीत कांबळ्या जळून गेल्या ‘ मात्र विणकराचा त्याच्यावर विश्वास बसला नाही तो म्हणाला, ‘ आगीत कांबळ्या जळून जाणे शक्यच नाही. ‘
त्यावर लबाड सावकार म्हणाला, ‘ अरे त्या कांबळ्यावर रॉकेलचा डबा सांडला होता. त्यामुळे त्या जळाल्या. ‘ त्यांचा हा वादविवाद चालू असताना व्यापाऱ्याच्या समर झेक जमले. विणकर जातानाच आणखी एक कांबळे खांद्यावर घेऊन आला होता तो व्यापाऱ्याला म्हणाला, ‘रॉकेल सांडले असते तरी माझ्या कांबळ्या जळणे शक्य नाही. तुमचा विश्वास नसेल तर माझ्या या नव्या कांबळ्यावर रॉकेल टाकून त्याला आग लावा. ‘ लोकांनीही व्यापाऱ्यालाच आग्रह केला त्यामुळे व्यापाऱ्याने रॉकेल आणून त्या कांबळ्यावर टाकले व काडी पेटविली. क्षणार्धात आग लागली मात्र थोड्यावेळाने आग विझली. कारण कांबळ्यावरील केरूच फक्त जळाले होते. कांबळे शाबूत राहिले होते. ते पाहून लोकांनी विणकराची बाजू घेतली व त्या लबाड सावकाराला त्या दोन कांबळ्यांचे पैसे द्यायला लावले. सावकाराने खजिल होऊन विणकराला पैसे दिले. विणकराच्या प्रामाणिकपणाचा व सत्याचा विजय झाला होता.
Leave a Reply