श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता. त्या दिवशी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे सदू झोपायला बिस्तारावर पडला. तेवढ्यात त्याचा मोबईल वाजला. ‘च्यायला रात्रीच का लोकांना फोन करायची आठवण येते, मनातल्या मनात दोन शिव्या हाणत त्याने फोन उचलला’, दुसरी कडून आवाज आला, मी भारतीय क्रिकेट बोर्डाचा सचिव बोलतो आहे, अभिनंदन सुखात्मे, भारतीय क्रिकेट टीम मध्ये प्रारंभिक फलंदाज म्हणून पहिल्या वन डे मॅच साठी तुमचे सिलेक्शन झाले आहे. ‘रात्री-अपरात्री थट्टा-मस्करी करायला आणिक कोणी सापडलं नाही का’? सदू ओरडला. ‘शांत व्हा, थट्टा-मस्करी करायला मला वेड नाही लागले आहे आणि मजजवळ तेवढा वेळ ही नाही. विश्वास नसेल तर टीवी उघडून बघा, तो पर्यंत मी होल्ड करतो. सदूने टीवी उघडला, ब्रेकिंग न्यूज सुरु होती. भारतीय क्रिकेट बोर्डचा नवा अभिनव प्रयोग. देशातील लोकांचे मोबईल कम्प्युटर मध्ये फीड करून, एक नंबर काढला, तो मुंबईचा सदानंद सुखात्मे यांचा आहे, त्यांची निवड इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅच साठी झाली आहे. त्यांना या एका मॅच साठी १ कोटी रुपये पारिश्रमिक ही मिळेल. पाहू या ते भोपळा फोडण्यात यशस्वी होतात कि नाही. बातमी पाहताच सदूची बोबडीच वळली, बेंबीच्या देठाने सर्व बळ एकत्र करून एका दमात ओरडला, ‘अहो, मला क्रिकेट खेळता येत नाही. चेंडूची ही भीती वाटते, उगाच हात-पाय तुटले माझ जे होईल ते होईल पण जग तुमच्यावर हसेल, एक कोटी ही पाण्यात जातील. शिवाय माझ्या जवळ पासपोर्ट वैगरे ही नाही. त्या साठी सरकारी परमिशन घ्यावी लागते’. (च्यायला, सदूची मराठी मानसिकता बाहेर पडलीच, एखादा पंजाबी माणूस असता, तर १ कोटी साठी मंगळावर ही जायला तैयार झाला असता, ते ही कुठला प्रश्न न विचारता). दुसरी कडून आवाज आला, ‘तुमची भीती व्यर्थ आहे सुखात्मे साहेब, चेंडू लागला तरी तुम्हाला इजा होणार नाही याची खात्री देतो. कोट्यावधी रुपये घेऊन स्टार खेडाळूना भोपळा फोडता आला नाही ही सद्य परिस्थिती आहे, तुम्ही निश्चित त्यांच्यापेक्षा चांगले खेळाल, पासपोर्ट विजा सर्वांचा बंदोबस्त आम्ही बघून घेऊ. उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे. तुम्ही फक्त तैयार राहा’ आणि त्याने फोन खाली ठेवला. अश्यारितीने सदू इंग्लंड विरुद्ध पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला.
भारताने नाणेफेक (टॅास) जिंकली. धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन सोबत आपला सदू मैदानात उतरला. पहिला ओवर त्याला खेळायचा होता तो ही एन्डरसनचा. खरं म्हणाल तर, सदूचे सर्वांग थरथर कापत होते, मनोमन रामरक्षा म्हणत सदू एन्डरसनचा पहिला चेंडू खेळण्यास तैयार झाला. एन्डरसनने पहिला चेंडू फेकला. सदूने डोळे बंद केले आणि बॅट हवेत फिरवला. चेंडू बॅटचा कार्नर वर लागला आणि स्लीपच्या वरून बाउन्डरीच्या बाहेर गेला. दुसर्या चेंडू वर ही असेच झाले. एन्डरसनने रागाने एक बाउन्सर टाकला. चेंडू सरळ येताना पाहून सदूने डोळे बंद करून संगकारा जसा बॅट वर करून खेळतो जवळपास तशीच बॅट सदूने वर केली. चेंडू बॅट वर लागला आणि विकेटकीपरच्या डोक्या वरून ६ रन साठी बाउन्डरीच्या बाहेर गेला. पहिला ओवर संपला. तीन चौकार आणि एक षटकार असे १८ रन सदूच्या खात्यात जमा झाले. एन्डरसनला एवढा मार कधीच पडला नसेल. दैवाला दोष देण्या व्यतिरिक्त तो काही ही करू शकत नव्हता. दुसर्या ओवर मध्ये शिखर धवन ने ही जोश मध्ये येऊन दोन चौकार हाणले. तिसरा ओवर सुरु झाला, पुन्हा एन्डरसन समोर होता. पहिला चेंडू नेहमीप्रमाणे ऑफ स्टंप वरून बाहेर उसळला, बाहेर जाणारा चेंडू बॅट लागला आणि दोन स्लीपच्या मधून मैदानाबाहेर गेला. कप्तान कुकने एन्डरसनला काही निर्देश दिले. दुसरा चेंडू त्याने इनस्वींगर टाकला, चेंडू आपल्या दिशेने यातना पाहून भीतीने सदूने बॅट समोर केली, एक जोरदार झटका त्याला लागला, चेंडू बॅटला लागून पुढच्या पायाच्या चाटून फाईनलेगच्या दिशेने मैदानाच्या बाहेर गेला. तिसरा चेंडू एन्डरसनने ऑफ स्टम्पच्या दिशेने सरळ फेकला, साहजिक सदू लेग साईडला मागे सरकला पण त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला, चेंडू हवेत उडाला पण विकेटकीपरच्या मागे एक टप्पा पडून चेंडू पुन्हा मैदाना बाहेर गेला. सदूच्या खात्यात आतापर्यंत ३० रन जमा झाले. हा प्रकार बघून एन्डरसन भयंकर वैतागला होता. म्हणतातना ‘बकरे कि माँ कब तक खैर मनाएगी’. आता त्याने सरळ स्टंपच्या दिशेने यार्कर फेकला. चेंडूने सदूचा त्रिफळा उडविला. एन्डरसन आणि सदू दोघांनी सुटकेच्या निश्वास टाकला. सदू पेवेलीअन मध्ये परतला. सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत गेले. इंग्लंड मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीमला एक चांगली सुरुवात मिळाली होती. पेवेलीअन मध्ये बसून मॅच पाहणारा भारतीय संघाचा एक अधिकारी दुसर्याला म्हणाला, हा प्रयोग तर यशस्वी झाला. आता सिलेक्शन क्राईटेरीयात थोड बदल करू या. लोकांकडून मोबाइलवर मेसेज मागवू, जे मेसेज पाठवतील त्यांचे नाव सिलेक्शन करता कन्सिडर करू. रेट १० रु. प्रती मेसेज ठेऊ या. सहज २०-२५ कोटी रुपये एकत्र होतील.चांगला आईडिया आहे, दुसरा अधिकारी उतरला.
नेहमीप्रमाणे भारतीय स्टार क्रिकेटपटू, मैदानात उतरण्याची रस्म अदायगी करून भोपळा न फोडताच पेवेलीअन मध्ये परतले. १०० रनांच्या टीम ऑल ऑउट झाली. सदू सर्वात जास्त रन बनविणारा क्रिकेटवीर ठरला. आता इंग्लंडची टीम मैदानात उतरली. सदू विकेट कीपर धोनी जवळ पहिल्या स्लीप वर उभा होता. भुवनेश्वर कुमारने टाकलेला पहिलाच चेंडू इंग्लंडच्या खेडाळूच्या बॅटच्या बाह्य किनार्याला लागून सरळ सदूच्या दिशेने उसळला. चेंडूला आपल्या दिशेने येताना पाहून सदू भीतीने किंचाळला. अहो, केवढ्या जोरात ओरडता, दोन थेंब पाणीच तर अंगावर टाकले, काही स्वप्न वैगरेह पाहत होता काय? सौ.चा आवाज ऐकून, सदू ताडकन बिछान्यावरून उठला. डोळे चोळून समोर पहिले, सौ. समोर उभी होती. सदूचे स्वप्न भंग झाले होते. तो चिडून म्हणाला, सकाळी-सकाळी तुझ्या मुळे किती नुकसान झाले आहे, माहित आहे का? तब्बल एक कोटी रुपयांचे. सौ. आ! वासून सदू कडे पाहतच राहिली.
— विवेक पटाईत
१९ ऑगस्ट २०१४
Leave a Reply