अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे रंगभूमीच्या निरलस सेवेचा सन्मान आहे. बालपणीच नाट्यवेडाने झपाटलेल्या जाधव यांनी अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. नाट्य चळवळीची परंपरा असणार्या अकोल्यात ही चळवळ अधिक रूजवण्यात आणि त्याद्वारे नाट्य व्यवसायाला बळकटी प्राप्त करुन देण्यात जाधवांचे
योगदान मोलाचे आहे.साहित्य संमेलनाप्रमाणेच आता रसिकांना नाट्य संमेलनाचेही वेध लागले आहेत. रत्नागिरी येथे होणार्या या 91 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची निवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे अकोल्यातील नाट्य चळवळीची धुरा सांभाळणार्या राम जाधवांना मिळालेला हा सन्मान उचितच म्हणावा लागेल. तशी या अकोल्यातील या चळवळीला मोठा इतिहास आहे. बालगंधर्वांची नाट्य संस्था कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यानंतर याच परिसरातील नाट्यवेड्यांनी पुढाकार घेऊन कर्जाची रक्कम चुकती केली.अशी पार्श्वभूमी असणार्या अकोला शहरात राम जाधव गेल्या अनेक वर्षांपासून रंगदेवतेची सेवा करत आहेत. जाधव यांनी 1960 मध्ये ‘रसिकाश्रय’ ही नाट्यचळवळ सुरू केली. योगायोग म्हणजे याच डिसेंबर ही संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या राम जाधव यांची अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा नाट्य क्षेत्रातील सुवर्णक्षण ठरेल.
मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील राम जाधव शिक्षणासाठी अकोल्याला आहे आणि या शहराशी खर्या अर्थाने एकरुप होऊन गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर रेल्वेत तिकीट निरिक्षक म्हणून नोकरीला लागल्यामुळे त्यांना सतत फिरत करावी लागे. पण नोकरी आणि रंगभूमीची सेवा या दोन्ही आघाड्या जाधव यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. कायद्याची पदवी संपादन केलेल्या राम जाधव यांनी 1950 च्या दशकात आंतरधर्मीय विवाह केला. त्या काळातील ते मोठे धाडस होते. साहजिकच या निर्णयाने मोठी खळबळ माजली. पण अशा परिस्थितीत ते जरासेही विचलित झाले नाहीत.
राम जाधव यांना कोणत्याही पदाची किंवा मान-सन्मानाची आसक्ती न बाळगता रंगभूमीचा उपासक म्हणून कार्यकर्त्याची भूमिका निभावण्यात स्वारस्य आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती यात मोलाची कामगिरी बजावताना नाट्य चळवळीला उभारी मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. किबहुना हाच अखंड ध्यास असतो. आजवर जाधव यांनी दहा नाटकांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या तीन संगीत नाटके आणि चार हिदी नाटकांचा समावेश आहे. या शिवाय विविध अडचणींवर मात करत पाऊणशेहून अधिक नाटके रंगभूमवर सादर केली. 1982 मध्ये अकोल्यात झालेल्या नाट्य संमेलनात राम जाधव यांनी सादर केलेले चि. त्र्य. खानोलकरांचे ‘दोन पिकली, दोन हिरवी’हे नाटक चिरस्मरणीय ठरले. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच तत्पर असतात. या उपजत आवडीमुळे त्यांनी आजवर अनेक नाट्य प्रशिक्षण शिबिरांमधून प्रशिक्षण म्हणून मोलाची जबाबदारी पार पाडली आहे. विशेष म्हणजे अशा जबाबदार्या पार पाडताना किवा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना आपण नाट्यक्षेत्रात फार मोठे काम केले आहे याचा किंचितही वृथा अभिमान त्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. साधेपणा हे त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य.
राम जाधव यांना बालपणापासून नाट्यकलेची आवड आहे. पाचवीत असतानाच त्यांनी दिवाकरांची ‘ओन्ली टू मार्कस’ ही नाट्यछटा सादर केली होती. दहावीत असताना त्यांना ‘लग्नाची बेडी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याच कालावधीत त्यांनी ‘लक्षाधीश’, ‘योगायोग’, ‘देवमाणूस’ अशी अनेक नाटके सादर केली. प्रा. बनोडकरांच्या बोराळाच्या एकांकिकेपासून जाधव यांनी प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी आजवर ‘कवडीचुंबक’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘मी जिंकलो-मी हरलो’ या सारख्या वेगळ्या विचारांच्या नाटकांच्या निर्मितीद्वारे रंगभूमीवर आपले वेगळेपण सिध्द केले. ‘अक्षांश-रेखांश’ या नाटकातील मामाची भूमिका इतकी प्रभावी ठरली की तेव्हापासून राम जाधव ‘मामा’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. राम जाधव यांनी अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वत:कडे ठेवले. 2001 मध्ये कलादान पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा गौरव केला. राम जाधव यांनी आजवर अनेक नाट्य स्पर्धांमध्ये परिक्षक म्हणून मोलाची कामगिरी बाजावली आहे. त्यांच्याच पुढाकाराने विदर्भातील स्त्री नाट्य कलावंतांचा मेळावा यशस्वीपणे पार पडला.
नाट्य चळवळीची धुरा वाहतानाच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये राम जाधव यांचा आपल्या सहकार्यांसह उत्स्फूर्त सहभाग असतो. कोयना रिलीफ फंड तसेच चीन, पाकिस्तान युध्दाच्या वेळी त्यांनी नाट्यप्रयोगाद्वारे राष्ट्रीय निधीच्या उभारणीस हातभार लावला होता. वृध्द कलावंतांचा योग्य सन्मान आणि त्यांना वेळोवेळी मदत मिळवून देण्यासही ते तत्पर असतात. मराठी नाट्यक्षेत्रात आपला नावलौकीक आणि वेगळेपण कायम ठेवणार्या ‘नटसम्राट’ नाटकाच्या संक्षिप्तीकरणाचे आव्हान जाधव यांनी यशस्वीपणे पेलले. वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी जाधवांची ही सारी धडपड अखंड सुरू आहे. अशा नाट्यप्रेम हाडा-मासातभिनलेल्या राम जाधवांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मिळालेला बहुमान उल्लेखनीय ठरतो. यापूर्वी विदर्भातील पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या वाट्याला हा बहुमान लाभला होता. त्यांच्यानंतर 40 वर्षांनी राम जाधवांच्या रुपाने विदर्भाच्या वाट्याला हा गौरव आला आहे. जाधव यांना आजवर अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले असून सध्या ते महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे सदस्य आहेत. या बरोबरच वृध्द कलावंत आणि साहित्यिक अनुदान जिल्हा समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत.
अलीकडे नाट्य संमेलन असो वा साहित्य संमेलन त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे नाट्य रंगते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी नाट्य रसिकांची अपेक्षा असली तरी ती प्रत्येक वेळी पूर्ण होतेच असे नाही. त्यामुळे अखेर रितसर निवडणूक पार पडते. मग अशा निवडणुकीतील प्रचारानिमित्त आरोप-प्रत्यारोप, त्याला मिळणारी प्रसिध्दी याचा गदारोळ असतो. या पार्श्वभूमीवर जानेवारीत होणार्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची बिनविरोध निवड होणे यातच त्यांच्या कार्याचे खरे यश सामावले आहे.
(अद्वैत फीचर्स)
— अभय देशपांडे
Leave a Reply