निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ॥
उपकाराचीया राशी। उदंड घडती जयासी
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैसी ॥
यशवंत! कीर्तिवंत! सामर्थ्यवंत! वरदवंत!पुण्यवंत! नीतिवंत!। जाणता राजा ॥
आचारशील! विचारशील! दानशील! धर्मशील!सर्वज्ञपणे सुशील। सकळा ठायी ॥
धीर, उदार, गंभीर। शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर। तुच्छ केले ॥
तीर्थक्षेत्रे मोडिली। ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥
देवधर्म गो ब्राह्मण। यांचे करावया संरक्षण
हृदयस्त झाला नारायण। प्रेरणा केली ॥
उदंड पंडित पुराणिक। कवीश्वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक। तुमचे ठायी ॥
या भूमंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हा कारणे ॥
आणिकही धर्मसत्रे चालती।
आश्रित होवून कित्येक राहती
धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली ॥
कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले
कित्येकास आश्रय झाले। शिवकल्याण राजा ॥
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
जय श्रीराम.
स्वामीनी राजाना लिहिलेले पत्र अतिशय बोलके आहे,
महाराष्ट्र धर्म,जानता राजा,यातु राजाचे कर्त्रत्व आणि राजाची महती मोजक्या शब्दात रेखाटली आहे .
परंतु गो-ब्राह्मन या शब्दातून मात्र थोडासा प्रश्न मनात येतो .
नमस्कार.
रामदास स्वामींचें पत्र वाचकांसाठी आपण उद्धृत केलें ही उत्तम गोष्ट झाली.
– यातील ‘शिव कल्याणराजा’ या शब्दाबद्दल थोडेसें. संदर्भ : इतिहासाचार्य राजवाडे.
राजवाडे म्हणतात की शिवरायांनी कल्याण शहर घेतल्यानंतरचें हें पत्र आहे. कल्याणराजा म्हणजे कल्याण शहराचा राजा.
– यातील दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे ‘महाराष्ट्रधर्म’ . एक वेगळा लेख लिण्यासारखा तो विषय आहे ( व मी मागेंच तसा लेख लिहिलाही आहे. तो लवकरच मराठीसृष्टीवर टाकेन). मुख्य म्हणजे महाराष्ट्रधर्म याचा अर्थ आजच्या भाषेत, ‘महाराष्ट्रीयत्व’ असा करता होईल.
न्यायमूर्ती रानडे यांनी त्यातील धर्म या शब्दाचा religion शी संबंध जोडला होता. राजवाडे यांनी त्यावर आक्षेप घेऊन योग्य तो अर्थ दाखवून दिला. तो रानड्यांनी मान्यही केला. त्यांच्या मृत्यूनंतर रमाबाई रानडे यांच्या लिखाणात तसा उल्लेख आहे, असे राजवाड्यांनी सांगितलेलें आहे.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक