आपल्या समाजात एकीकडे बर्याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो.
आपल्या समाजात पैसे खाणारा, गुंडगीरी करणारा, दारु पिऊन गटारात लोळाणारा, स्त्रीयांवर बलात्कार करणारा माणुस एकवेळ उजळ माथ्यानी फ़िरु शकतो तसच एखादा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण
जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.
वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही. मी या बाबतीत काही काम करतो म्हणल्यावर माझ्या अनेक मित्रांनी माझ्याशी संबंध तोडले. ऑरकुटवर अनेक मित्रांनी मला फ़्रेंड लिस्टमधुन डिलिट केलं. अर्थात अनेक नवीन मित्र मिळाले.
आपल्या सुशिक्षित समाजातसुद्धा ( अर्थात सुशिक्षित कोणाला म्हणायच हा प्रश्नच आहे ) हीच कल्पना आहे की या प्रकारचं काम करणारे कार्यकर्ते हे वेश्येकडे जात असलेच पाहिजेत. आपल्या समाजात कोणी नुसती कुजबुज केली की अमका अमका माणूस वाईट आहे, त्याच्या चारित्र्याबाबत बोलल की लगेच ऎकणार्याला खर वाट्तं, पण एखादा माणूस खुप चांगला आहे अस म्हणल. तर “काय सांगाव, खर खोट त्या प्रमेश्वरालाच माहिती” असा लगेच रिमार्क येतो.
एकीकडे लिव्ह-ईन रिलेशनस्ला व समलिंगी विवाहांना कायदा मान्यता देण्याच्या विचारात आहे. तृतिय पंथियांना कायद्यानी मतदानाचा हक्क मिळालय, रेशन कार्ड मिळालय. त्यांना लिंग बदलाचा हक्क मिळाला आहे. तर दूसरीकडे आजही विधवा, घटस्पोटीत व अनाथ व्यक्तींकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषीत दिसते. एखाद्या लग्न मोडलेल्या व्यक्तीबाबत वाटेल त्या वावड्या उठवल्या जातात. घटास्पोटित व्यक्तिंना अपमानीत वागणुक मिळते. एखाद्या मुलं न झालेल्या जोडप्याकडे समाज अशा नजरेनी बघतो की त्यांना मेल्याहुन मेल्यासारखं होतं. मला एक कार्यकर्ता माहीती आहे की
ज्याच लग्न, तो HIV ची माहिती तरुण वर्गापर्यंत नेण्याच काम करतो, या एकाच कारणास्तव मोडल आहे.
माझी एक विद्यार्थिनी आहे, ती एका वेश्येची मुलगी आहे. ही वेश्या हैद्राबादच्या खानदानी वेश्या कुटुंबातली आहे. (यात सुद्धा खानदानी हा प्रकार आहे बरं का ! ) त्यांचे संबंध पूर्वी राजे रजवाड्यांशीच असायचे, सध्या ते असतात मोठ्या उद्योगपतींशी. ही मुलगी अत्यंत सुंदर आहे, एक खानदानी सौन्दर्य आहे तीच्याजवळ. प्रचंड बुद्धीमत्ता आहे, नम्रता आहे, विचार करण्याची क्षमता आहे. या मुलीला ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. बरे दिवस आले आईनी वेश्याव्यवसाय बंद केला. या मुलीच्या प्रेमात मुलं नाही पडली तरच नवल. पण अनेकजण ती एक वेश्येची मुलगी आहे, तेव्हा तीची छेड काढायला आपल्याला पूर्ण परवानगी आहे, असाच अर्थ घेतात व तीच छेड काढायचा प्रयत्न करतात. कॉलेजचे प्रोफ़ेसरसुद्धा यात मागे नाहीत. आज ही समाजाची विचारसरणी आहे.
वेश्यागृहातुन सोडवलेल्या बाईला व तीच्या मुलांना कामं मिळत नाहीत. चांगल शिक्षण मिळत नाही. एखाद्या हिजड्याला भिक मागणं वा शरिर विक्रय करणं या शिवाय दूसरा कोणाता तरी उद्योग करावा अस वाटत असेल तर त्याला समाज उभा करत नाही. त्यांना जर शरिरविक्रय करायचा नसेल, भिक मागायची नसेल, तर एकमेव मार्ग उरतो व तो म्हणजे गुन्हेगारी वा गुन्हेगारांना मदत करणं. खर तर या लोकांच योग्य पद्दतीनी पुर्नवसन नाही केल तर ते आपल्या सर्वांसाठी फ़ार धोक्याच आहे.
वेश्या व त्यापेक्षाही हिजड्यांच पुर्नवसन किती कठीण आहे, ते या काही दिवसांमधे अनुभवल आहे. एक हिजडा आहे ग्रॅज्युएट आहे. त्याला भिक मागायची नाही व शरिरविक्रय करायची इच्छा नाही. त्याला साध सकाळी पेपर व दूध घरोघर टाकायच काम दिलं. तर लोकांना तो सकाळी सकाळी घरी आलेला नको आहे. हे एक तुमच्या आमच्या सारख व्यवस्थित बोलणारा व बर्यापैकी इंग्रजीत संभाषण करणार्या हिजड्याबाबत लिहिल. त्यापेक्षा कमी शिकलेल्या व तोंडात शिव्या असलेल्या हिजड्यांना तर कोणी समोर उभ करत नाही.
सर्वात जास्त दया येते ती वेश्यांच्या मुलांची. त्यांची काहीच चुक नसताना त्यांना एक अघोरी शिक्षा मिळत असते. मी त्याबाबत इथे लिहित नाही. त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळात नाही. शिक्षणासाठी पोषक वातावरण नसत. खर तर या मुलांना इतर मुलांपेक्षा शिक्षणाची जास्त गरज असते. एकतर त्यांच्या कुटुंबाला लागलेला काळिमा पुसायसाठी, जिवनात मिळालेला एकटेपणा दूर करण्यासाठी व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर पेलायसाठी. जेव्हा त्याला अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मुलभुत गरजा पुर्ण करता येत नाहीत तेव्हा हेच मुलं छोटे मोठे गुन्हे करायला लागत व मग ते आपल्या समाजाला तापदायक ठरत.
वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.
या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते. समुपदेशनानी जर दारू , जुगर व ड्रग सारखी व्यसन कमी होऊ शकतात तर वेश्यागमन का कमी नाही होणार ? नक्कीच होईल. काही देशांनि हा प्रयोग केला आहे व त्यात ते बर्याच प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. आज ऎड्स् बाबत जनजागृती झालेली आहे व त्यामुळे ऎड्स्च प्रमाण बरच
कमी झालेल आहे. ऎड्स्च्या जाहिराती या फ़क्त
“निरोध वापरा” अशाच असतात. पण असे संबंधच ठेवू नका अश्या जाहिरात केल्या जात नाहीत. घरांमधुन व शाळांमधुन या गोष्टींची वाच्चताच केली जात नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळलेल्या मनस्थितीत असतात. अश्यावेळी ते सल्ला घेतात तो नेमक्या चुकीच्या माणासाचा व चुकीच्या मार्गानी जातात. आज या मुलांना योग्य संस्कारांची गरज आहे.
नुसत मुलांचच नाही तर आज सर्वच समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे.
माझी विनंती आहे की खाली दिलेला व्हिडीओ आपण कृपाकरुन बघावा. मी यावर काहीच लिहिणार नाही
…….निरंजन प्रधान
— निरंजन प्रधान
Leave a Reply