सृष्टीकर्त्याने पृथ्वीवर प्रथम समुद्र आणि धरतीची निर्मिती केली. पृथ्वीवर चैतन्य रहाव म्हणून त्यांचा हृदयात प्रेम आणि काम भावना ही निर्माण केली. हीच प्रेम आणि काम भावना आजही पृथ्वीवरील समस्त चराचरात भरलेली आहे. अनादी काळापासून समुद्र आणि धरती एकत्र चालत आले आहे. साहजिकच आहे एकत्र चालणार्या दोन जीवांमध्ये प्रेम भावनेने एकत्र येणारच. पण त्यांचे मीलन म्हणजे पृथ्वीवर प्रलय. म्हणून सृष्टीकर्त्याने समुद्राकडून वचन घेतले – युगांत पर्यंत दूर राहणे. प्रेम आणि कामभावने अभावी पृथ्वीवर जीवन निर्मिती ही अशक्य होती. पण जिथे प्रेम आहे तिथे मार्ग ही आहे.
वसंतात धरती फुलांनी शृंगार करते वातावरणात कामगंध दरवळू लागतो. समुद्राच्या हृदयात ही काम भावना जागृत होते. तो मीलना साठी उत्सुक होतो. पण सृष्टीकार्त्याला दिलेले वचन आठवून तो विवश होतो. विरहाग्नीत जळण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यापाशी नाही. तीच दशा धरतीची ही होते. ग्रीष्माच्या तापामुळे प्रेमाच्या (पाण्याच्या) अभावी पृथ्वीवरील जीवसृष्टीत ही हाहाकार माजतो. समस्त जीवसृष्टी आकाशाकडे टकलावून मेघांची वाट बघू लागते. प्राण्यांची ही दशा धरतीला बघवत नाही. ती समुद्राकडे याचना करते- माझ्यासाठी नव्हे पण माझ्या हृदयावर बागडणार्या या जीवांवर तरी दया करा. काहीतरी मार्ग काढा!
विरहाग्नीत जळणाऱ्या धरतीची ही दशा समुद्राला बघवत नाही. अखेर त्याला मार्ग सापडतो. समुद्राचे काळीज वितळते व नभात शिरून तो मेघांचे स्वरूप धारण करतो. वर्षा ऋतुत हे मेघ धरतीवर प्रेमाच्या वर्षाव करतात. धरतीवरील समस्त प्राणी या प्रेमवर्षावात चिंब भिजतात व सर्वत्र नवचैतन्य बहरते.
समुद्र आणि धरतीचे असे अद्भुत मीलन पाहून कवींनी मेघ आणि धरतीच्या प्रेमावर लांखो कविता रचल्या असतील पण त्यांना काय माहित मेघांमध्ये असते समुद्राचे काळीज.
— विवेक पटाईत
Leave a Reply