१२ सप्टेंबर १९०१ रोजी सलग ६ प्रथमश्रेणी शतकांच्या क्रमातील अखेरचे शतक आले. लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. त्याची तब्बल दोन वेळा बरोबरी मात्र झालेली आहे. डॉन ब्रॅडमन १९३८-३९ चा हंगाम आणि माईक प्रॉक्टर १९७०-७१ चा हंगाम हे ते मानकरी.
चार्ल्स फ्रायच्या आयुष्याकडे पाहिल्यास मात्र त्यांचे वर्णन बहुमुखी प्रतिभेचा अवलिया असेच करावे लागेल. १८९३ मध्ये त्यांनी लांब उडीतील तत्कालीन विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. इंग्लंडच्या संघाकडून ते फुटबॉलही खेळले. प्रथमश्रेणीमधून फ्राय निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर ५० हून अधिकच्या सरासरीने ३०,००० धावा होत्या. त्या काळच्या सामन्यांमधील कमी धावसंख्या पाहता ही सरासरी प्रशंसनीयच ठरते. केवळ रणजीच त्यांच्याहून अधिक सरासरी राखून निवृत्त झाले.
१९१२ साली इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी त्यांची निवड झाली. १९२१ साली वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांना पुन्हा कप्तानीची कमान सांभाळण्याची विनंती करण्यात आली पण त्यांनी त्यास नकार दिला.
रणजी हे लेग ग्लान्ससाठी आणि नव्या फटक्यांसाठी प्रसिद्ध होते तर फ्राय पारंपरिक, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी. ससेक्स आणि इंग्लंडकडूनही रणजी-फ्राय ही सलामीची जोडी गाजली. रणजी आणि फ्राय यांची सलामीची जोडी जशी विख्यात आहे तशीच त्यांची दोस्तीही. फ्राय यांनी काही काळ रणजींसाठी भाषणांचा लेखक म्हणूनही काम केले.
१२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले. त्याचा धावपट्टा (रन-अप) इतिहासातील मोठ्या धावपट्ट्यांपैकी एक होता. फलंदाजांचे जिणे मुश्किल करण्याच्या पारंगत उद्योगात
त्याला नंतर चार्ली ग्रिफिथची साथ
लाभली आणि वेस – चार्ली या जोडगोळीने अनेकदा ‘फळकूटवीरां’ना भंडावून सोडले. कसोटी इतिहासात फारच थोड्या कसोट्या बरोबरीत सुटलेल्या आहेत. अशा एका कसोटीचे – ब्रिस्बेन, १९६०-६१ – अंतिम षटक वेस हॉलने टाकले होते. दोन-कमी-पन्नास सामन्यांमधून त्याने दर सामन्यागणिक ४ या दराने बळी मिळविले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply