२३ तारखेला सासवडजवळील एका गावात माझ्या कार्यक्रमासाठी पुण्यातून बाहेर पडताना टिळक स्मारक मंदिराकडे बघायचं नाही असं अगदी निक्षून मनाला बजावलं होतं. पण स्वारगेटच्या दिशेने जाताना टिळक स्मारकच्या प्रवेशद्वारासमोर ड्रायव्हरला एक क्षण गाडी थांबवायला सांगितलेच. अवघ्या काही तासांपूर्वीचा भरत नाट्य मंदिरातील सळसळता पदन्यास नाट्य परिषदेच्या कार्यालयासमोर निपचित पडलेला बघणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडली गोष्ट होती. दुरूनच तिला हात जोडून श्रध्दांजली अर्पण केली आणि माझ्या पाणावलेल्या डोळ्यांसमोर चार वर्षांपूर्वीची घटना उभी राहिली. माझा नागपूरचा एक जुना मित्र पुण्यात एका चित्रपटाचं दिग्दर्शन करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोसळला होता व काही सेकंदात सर्व काही संपलं होतं. आज तिचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी जिथे ठेवण्यात आला होता तिथेच चार वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या मृतदेहासमोर मी अश्रू ढाळत उभा होतो. त्यानंतर अनेक दिवस मी सैरभैर झालो होतो. आज पुन्हा तसं काही होऊ नये म्हणून मी अंत्यदर्शनापासून कटाक्षाने दूर राहिलो.
ती होती अश्विनी एकबोटे व तो होता संजय सूरकर.
— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply