थोर तत्त्वज्ञ कन्फ्युनिअस याची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे खास वैशिष्ट्य होते. त्याला बासरी वाजवायचा फार नाद होता. अनेकदा तो बासरी वाजवत एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असे. पैसा आणि संपत्तीपेक्षा त्याला मानवता जास्त प्रिय होती. त्यामुळे साहजिकच त्याच्याजवळ फारसा पैसा नव्हता. त्याची त्यालाही कधी खंत वाटली नाही.
एकदा कन्फ्युनिअस असाच एके ठिकाणी बासरी वाजवत उभा असताना तेथे एक भिकारी आला व त्याला म्हणाला, ‘ ‘मला काहीतरी खायला द्या. मी दोन-तीन दिवस उपाशी आहे. ” त्याची स्थिती पाहून कन्फ्युनिअसला दया आली आणि त्याने आपल्या सदर्याचे खिसे चाचपले. खिशात अर्थातच काहीही नव्हते.
कन्फ्युनिअस विचारात पडला. त्या भिकार्याला घरी घेऊन जावं व जेवू घालावं असे एकदा त्याला वाटले. मात्र घर खूपच लांब होते आणि त्या भिकार्याची अवस्था पाहता तो घरापर्यंत चालत कसा येईल हाही प्रश्रच होता.
कन्फ्युनिअसने त्या भिकार्याचा हात हातात घेतला व तो त्याला म्हणाला, ” हे मित्रा, मला माफ कर. तुला द्यायला आत्ता माझ्याजवळ काहीही नाही. तुझी अवस्था माझ्या घरी येण्यासारखी नाही. त्यामुळे तू येथेच थांब. मी आता लगेच घरी जाऊन येतो व तुझ्यासाठी काही तरी खायला घेऊन येतो. ”
त्या भिकार्याला कन्फ्युनिअसच्या स्पर्शाची थोरवी जाणवली. तो व्याकूळ नजरेने त्याला म्हणाला, “तुझी सहृदयता मला जाणवली. त्यामुळे माझे पोट केव्हाच भरले. मला पैसे कोणीही देतं मात्र तुझ्यासारखी सहृदयता मला अद्याप कोणीही दिलेली नाही. त्यामुळे इतरांच्या दानापेक्षा तुझे हे दान केव्हाही श्रेष्ठ आहे. माझी भूक भागली.”
असे म्हणून तो भिकारी तेधून आनंदाने निघून गेला.
Leave a Reply