१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला.
९ मेला सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आयएनएस सरदार पटेल हा नाविक तळ गुजरात पोरबंदर येथे कार्यान्वित झाला. गुजरातची १६०० किलोमीटरची समूद्र किनारपट्टी या नाविक तळामुळे आता सुरक्षित झाली आहे, असा विश्वास नोदलप्रमुख यांनी व्यक्त केला.मे च्या पहिल्या आठवड्यात ६०० कोटी रुपयांचे अफू, गांजा आणि चरस घेऊन येणारी एक पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत भारतीय कोस्टगार्डने एका जोईन्ट ऑपरेशनमध्ये पकडली. त्या बोटीमध्ये असणार्या आठ पाकिस्तानी नागरिकांना सुद्धा पकडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात अफू गांजा चरस भारतात पोहचविला असता, तर किती भारतीय युवक नशेच्या आहारी गेले असते याची आपण कल्पना करू शकतो.
सागरी सुरक्षेच्या संदर्भात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तानच्या आपल्या भेटीमध्ये पाकिस्तानला आठ मोठ्या पाणबुड्या देण्याची घोषणा केली. यामुळे पाकिस्तानी पाणबुड्यांची संख्या भारतीय पाणबुड्यांहून जास्त होण्याची शक्यता आहे. या पाणबुड्यातून क्षेपणास्त्र(Missile) सुद्धा फायर करता येतात. क्षेपणास्त्रांवर अणुबॉम्ब किंवा नुसती साधी स्फोटके असलेले वॉरहेड ठेवता येईल. तेहेरिके तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी गटाने स्वत:चे क्षेपणास्त्र बनवले आहे. याविषयीचा व्हिडीओही जारी करण्यात आलेला आहे. पाकिस्तानी दहशतवादी गट समुद्राच्या बाजूने येऊन समुद्र किनार्याजवळ असलेल्या टार्गेटवर किंवा समुद्राच्या आत असलेली टार्गेटस् वर जसे की बॉम्बे हाय यांचे तेल प्लॅट फॉर्म किंवा तेल घेऊन जाणार्या पाईपलाईन्सवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतील का?
शंभरहून जास्त वेळा समुद्राकडून हल्ला होईल अश्या सुचना
२०१४ मध्ये शंभरहून जास्त वेळा गुप्तहेर संस्थांनी समुद्राकडून हल्ला होईल अश्या सुचना दिल्या होत्या. सुदैवाने हल्ले झाले नाही. म्हणूनच समुद्रमार्गे असलेल्या धोक्याची पुन्हा एकदा समिक्षा करणे गरजेचे आहे. समुद्र किनार्यापासून २०० नोटिकल मैलपर्यंत असलेल्या समुद्र हा आपला असतो. यामधून मिळणारे गॅस, तेल किंवा खनिज पदार्थ ही आपली असतात. आज आपल्या किनार्यावर १२ मोठी आणि २०० छोटी बंदरे आहेत. मोठ्या बंदरांचे रक्षण बर्यापैकी केले जाते, पण छोट्या बंदरांचे रक्षण वाढवण्याची नक्कीच गरज आहे. समुद्रकिनार्यावर अनेक ठिकाणी स्पेशल इकोनॉमिक झोन आहेत. मुंबईच्या जवळ, गुजरातमध्ये कांडला येथे, विशाखापट्टनम, चेन्नई अश्या अनेक ठिकाणी समुद्रकिनार्यावर स्पेशल इकोनॉमिक झोन आहेत.तेथे मोठे कारखाने आहेत.
रक्षण क्षेपणास्त्र फायरपासून
आपल्या बहुतेक रिफायनरीज़् या समुद्र किनार्यावर आहेत. याशिवाय अणुशक्तीने वीज तयार करणारी केंद्र ही तारापूर, जैतपूर अशा ठिकाणी आहेत. या सगळ्यांचे संरक्षण दहशतवादी संघटनांनी केलेल्या क्षेपणास्त्र फायरपासून अणुभट्टी,रिफायनरीज़्,मोठ्या कारखान्यांचे रक्षण आपण कसे करू शकतो?.
अजून एक धोका समुद्राकडून होतो तो म्हणजे समुद्रामधून होणारी तस्करी. ही अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माध्यमात आलेल्या बातम्यांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर डिझेल हे भारतामध्ये स्मगल केले जाते. याशिवाय खोटया नोटा, अफू, गांजा, चरस, सोने आणि चांदी तसेच इतर अनेक गोष्टींची तस्करी केली गेलेली आहे. प्रत्येक वर्षी कोस्टगार्ड शेकडो कोटी रुपयांचे तस्करी केलेले सामान पकडत असते. पकडलेल्या सामानापेक्षा न पकडल्या गेलेल्या सामानाची किंमत ही कमीत कमी दहा पटीने जास्त असते.
तस्करी कशी थांबवता येईल
काही बातम्यांप्रमाणे माओवाद्यांना अॅम्युनिशन आणि हत्यारे ही आंध्रप्रदेश किनार पट्टीकडून दिले जात असावेत. बांगलादेशी हे समुद्रमार्गाने सुंदरबन,ओरिसा आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर घुसखोरी करत आहेत. म्हणजे समुद्राकडून माओवाद्यांना मदत होते आहे, बांगलादेशींची घुसखोरी होते आहे आणि याशिवाय तामिळनाडमधल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये पकडण्यात आलेले दहशतवादी हे समुद्राकडून श्रीलंकेच्या बाजूने भारताच्या किनार्याकडून तामिळनाडूमध्ये आलेले होते. समुद्राकडून होणारी ही घुसखोरी आपण का थांबवु शकत नाही?ही तस्करी होते आहे पाकिस्तानकडून आणि पुष्कळशी तस्करी ही आखाती देशांमधूनही होत असते. याशिवाय साऊथ ईस्ट आशियामधले अनेक गुन्हेगारी गट अशाप्रकारची तस्करी ही समुद्राकडून करत असतात.
समुद्राकडून रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची?
तसे म्हटले तर हे थांबवण्याची जबाबदारी ही सरकारच्या अनेक डिपार्टमेंटची आहे. सुरक्षेची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी ही भारतीय नौदल, कोस्टगार्ड, पोलीस, कस्टमडिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या गुप्तहेर संस्था यांची आहे. सध्या वाढलेल्या जबाबदारीप्रमाणे किनार्यापासून १२ नॉटीकल माईलपर्यंत जबाबदारी ही पोलीसांची आहे. १२ नॉटीकल माईल पासून २०० नॉटीकल माईलपर्यंतची जबाबदारी ही कोस्टगार्डची आहे आणि २०० नॉटीकल माईलच्या पुढे जबाबदारी ही भारतीय नौदलाची आहे. २६/११ च्या तुलनेमध्ये कोस्टगार्डचे सामर्थ आता बर्यापैकी वाढलेले आहे. सध्या कोस्टगार्डची भारतामध्ये ४० सेंटर्स आहेत आणि त्यांच्याकडे ८० ते १०० पेट्रोलिंग/टेहाळणी करणार्या बोटी आहेत. समुद्र किनार्यावर असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या ही देखील वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या ७६० किनार्यावर ८ पोलीस ठाणी पहिलेच प्रस्थापित झाली आहेत. याशिवाय नौदलाकडे टेहाळणी करण्याकरिता असलेली विमाने आणि जहाजे यांची संख्याही वाढलेली आहे.
म्हणजेच आपले गेल्या सहा वर्षांमध्ये आपल्याकडे असलेल्या बोटी रडार यांची संख्या ही वाढलेली आहे. याशिवाय सरकारने सगळ्या वेगवेगळ्या संस्थांना एका हेडकॉर्टरच्या खाली आणण्याकरिता जॉइन्ट ऑपरेशन सेंटर हे मुंबई, विशाखापट्टनम, कोची आणि पोर्ट ब्लेयरमध्ये तयार केलेले आहेत. यामध्ये समुद्र सुरक्षेकरिता असलेले सगळे घटक एका ठिकाणी येऊन काम केले जाते. तसेच वेगवेगळ्या गुप्तहेर संस्थांकडून त्यांना गुप्तहेर माहिती प्रत्येक आठवड्याला आणि महिन्याला गोळा करून ती सगळ्यांना संघटीतपणे दिली जाते. याशिवाय प्रत्येक वर्षी कमीत कमी दोन वेळा हे सगळे घटक एकत्र सराव करून, आपली क्षमता किती आहे हे तपासतात.
किनार पट्टीचे सिक्यूरिटी ऑडीट करण्याची गरज
सागरी सुरक्षेत पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत. पण आजच्या घडीला सुद्धा जास्त बोटी,रडार व गुणात्मक सुधारणांची गरज आहे. अजूनसुद्धा छोटी बंदरे आणि अनेक किनार्यावर असलेली अणुशक्ती निर्माण करणारी केंद्रे किंवा रिफायनरीची बाह्य सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. याकरिता कोस्टगार्ड, पोलीस आणि नौदल यांनी एकत्र मिळून अशा किनार्यावर असलेल्या संस्थांना अजून किती साधनाची गरज आहे, याकरिता एक सिक्यूरिटी ऑडीट जरुरी आहे.कोस्टगार्ड, पोलीस आणि नौदल,कस्ट्मंना या क्षेत्रामध्ये आपल्या स्वत:चे इंटिलिजंन्स तयार करण्याची खूप जास्त गरज आहे. आतापर्यंत गेल्या २० वर्षांमध्ये कोस्टगार्डने थोडेफार तस्करी थांबवण्यामध्ये यश मिळालेले आहे. त्यांनी दिलेल्या आकड्यांप्रमाणे गेल्या २० वर्षांत ९२० परकीय फिशिंग बोटस् आपल्या समुद्रामध्ये पकडल्या आहे. त्यांच्याकडून पकडलेल्या मत्शी उत्पादनाची किंमत जवळ जवळ २४ कोटी आहे.तस्करी केलेल्या सामानाची किंमत ५०३ कोटींहून जास्त आहे.
आपल्या किनारपट्टीजवळ अनेक अशी छोटी बेटे आहेत, त्यावर आपले कोळी बांधव हे दिवसा राहतात आणि रात्रीच्या वेळी तिकडून परत येतात. अशा किनारपट्टीजवळ असलेल्या छोट्या बेटांवर कोणी जर तिथे तस्करीचे सामान उतरवले आणि नंतर घेऊन गेले तर ते थांबवण्याकरिता सध्या यंत्रणा नाही. थोडक्यात सुरक्षेमध्ये जिथे जिथे आपल्याला कमजोरी दिसत आहे त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे. कोळी बांधव जर सुरक्षा कर्म्यांचे कान आणी डोळे बनले तर आपली सागरी सुरक्षा मजबुत होइल.
Leave a Reply