साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला.
साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’’ पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. प्रत्येकाची आई `श्यामची आई’प्रमाणेच असावी, असे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटते. दिग्दर्शक मा.आचार्य अत्रे यांचे सृजनशील दिग्दर्शन, तर वनमाला, दामूअण्णा जोशी, माधव वझे, हे सर्वच कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्यावर श्यामच्या आईच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. मराठीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटापैकी एक असणाऱ्या श्यामची आई मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. प्रेमळ पण योग्यवेळी कडक असणाऱ्या श्यामच्या आईची भूमिका अभिनेत्री वनमाला यांनी चपखलतेने बजावली की त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही अभिनेत्रीचा विचार करत येणार नाही. अवखळ, पण गोंडस आणि आईवर मनस्वी प्रेम करणाऱ्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी लीलया साकारली. आई-मुलाचे निःस्वार्थी प्रेम, शिकवण, संस्कार, त्याग या सर्व भावना दिग्दर्शक मा. आचार्य अत्रे यांनी सुंदरतेने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मा.वसंत देसाई यांचे छडी लागे छम छम… आणि भरजरी ग पितांबर… ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर असतात. श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
या चित्रपटाची लिंक
https://www.youtube.com/shared?ci=WZnZCqE5Jg8
Leave a Reply