आज १ नोव्हेंबर.. मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर दाभोलकर यांची जयंती.
त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव.
अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. बाबा आढाव यांच्या एक गाव – एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता. भारत सरकारने दाभोळकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३ सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे निधन २० ऑगस्ट २०१३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply