नवीन लेखन...

सार्वजनिक मंडळांची उधळपट्टी थांबवायला हवी



सार्वजनिक गणेश, युवा, क्रीडा अथवा अन्य महान व्यक्तिंच्या नावावर काढण्यात आलेल्या विविध मंडळांचा कारभार सध्या ‘रामभरोसे’ सुरू आहे. राष्ट्रीय अथवा लोकनेत्यांच्या नावावर, देवी- देवतांच्या नावावर देणग्या उखळल्या जाण्याचा फंडा काही आजचा नाही. अशा निमित्ताने मोठ्या प्रमाणात देणगी गोळा केली जाते. मात्र या देणग्यांचा हिशेब सार्वजिक केला जात नाही. किंवा धर्मादाय आयुक्तास सादर केला जात नाही. वास्तविक ज्यांच्याकडून वर्गणी गोळा केली जाते, त्यांना हिशेब मागण्याचा हक्क आहे. पण त्यांच्या तोंडाला कोण लागणार असे म्हणत सगळेच गप्प राहतात. काहीजणांना आपला चाललेला अवैध प्रकार उघड करायचा नसल्याने अशा मंडळांना हवी तशी मदत करीत असतात. स्वखुशीने, प्रेमाने अथवा जबरदस्तीने जमा झालेल्या पैशाचे काय केले, याचा पत्ता लागत नाही. काही मंडळांचा प्रामाणिक अपवाद वगळता ही वर्गणी चैनीत उडालेली असते. सार्वजनिक पैशाची ही नासाडी उपयोगाची नाही, याला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे.यासाठी शासनासह सगळ्यांनीच जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
दरवर्षी सार्वजनिक जयंती, पुण्यतिथी, गणेशोत्सव, तसेच नवरात्र उत्सव विविध मंडाळांच्यावतीने अमाप उत्साहात साजरा केला जातो. अर्थात हा अमाप उत्साह म्हणजे टोलेजंग मिरवणूक व त्यासमोर नशापान करून बीभत्स नाचण्या, धिंगाणा घालण्याला म्हटले जाते. हा असा किळस आणणारा प्रकार काही नवा नाही. उलट त्यात नवनव्या गोष्टींची, तंत्रांची भर पडत आहे. नाही म्हणायला यातला काही पैसा विधायक कामासाठी उपयोगात आणला जातो परंतु, ही रक्कम जमा झालेल्या रकमेपेक्षा खूपच कमी असल्याचा अनुभव आहे. वास्तविक थोर नेत्यांच्या नावावर जबरदस्ती करून , धाकधपटशा दाखवून वर्गणी गोळा केली जाते. त्यांच्या आदर्शतेची तरी बूज राखून मंडळांनी कार्य करायला हवे आहे. धागडधिंगा , नाचून अथवा अन्य लोकांना नाचवून आपण कुठला आदर्श घेणार आहोत आणि पुढच्या पिढीला देणार आहोत, याचा विचार व्हायला हवा. देवा-देवीच्या नावावर घातलेला गोंधळ खरेच माणसाला सुख -शांती देणार आहे का? घटकाभराच्या सुखासाठी हा खटाटोप चालवला जातो. यासाठी अमाप पैशाची नासाडी केली जाते. शेवटी डॉल्बीसारख्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. सध्या न्यायालयच देशाचा कारभार चालवत आहे, त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली म्हणायची. पण आपण स्वतः काही हिताचे निर्णय घेणार आहोत की नाही? आणि हे सण , उत्सव यांच्या पाठीमागचा उद्देश साक्षात आणणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. समाजातला प्रत्येक घटक, मंडळाचे कार्यकर्ते आणि शासन यांची काहीच का जबाबदारी नाही?
समाजात भ्रष्टाचार फोफावला आहे. त्याची चीडही आपल्याला येते आहे. पण तरीही या भ्रष्टाचाराला समाजाचीच साथ लाभत आहे. भ्रष्टाचार करणार्‍याला, अवैध धंदे करणार्‍याला ही सार्वजनिक मंडळे आपल्या वर्गणीचा हिस्सेदार बनवून त्याच्या कृतीला संमती देत असतात. त्यांना मिंदेपणात ठेवायला आवडते. मंडळांचे कार्यकर्ते तरुण असतात. त्यांना साहजिकच अशा फुकटच्या पैसाची सवय लागते. व असा पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक नेता, देव- देवता यांच्या जयंती-पुण्यतिथ्या आणि उत्सव साजरा करण्याचा फंडा तयार होतो. पण या सततच्या कटकटीने वर्गणी देणाराही वैतागून जातो. मग वाद होतात. त्याचे पर्यावसान हाणामारी, खून अशात व्हायला लागतात. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्या असल्याच्या पोलिस दप्तरी नोंदी आहेत.
काहींचे अशा पैसा वसुलीच्या आणि त्याच्या विल्हेवाटीच्या प्रकाराबाबत अजब मत, तर्क आहे. हरामचा पैसा हरामात घालवायला काय हरकत आहे, असे हे मत काहींना पटण्यासारखे आहे. पण मग हा पैसा समाजाला आदर्श घालून दिलेल्या आणि मनशांती देणार्‍या देवाच्या नावावर मागितला जाऊ नये. विनाकारण अशा थोर माणसांना बदनाम करू नका. देवांना असल्या घाणीत तरी ओढले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. कारण कोणतीच नीतीमत्ता राहिली नसलेल्याकडून अपेक्षा करणे मोठे कठीण काम असते. नीतीवंतांच्या दरबारात नीती मूल्येच शोभून दिसतात. अन्यथा नीतीवान माणसांनाही अन्रीतीवानाच्या पंक्तीला ओढले जाते. त्यामुळे कोणी कसा विचार करावा , हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
थोर माणसांचे स्मरण करताना त्यांच्या आदर्शानुसार चालण्याचा आपला इरादा असला पाहिजे. त्यांचा आदर्श घेऊन पुढील पिढीने वाटचाल केली पाहिजे. त्यांच्या स्मरणाच्यानिमित्ताने विविध कलागुणांना वाव देणार्‍या कलावृद्धीचे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. जेणेकरून यातून उपेक्षित कलाकाराला संधी मिळून त्याच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. कला वाढीला वाट मिळेल. अशा कर्यक्रमांची रेलचेल अशा निमित्तने व्हायला हवी आहे. भ्रष्टाचार आपल्याला नको आहे. भ्रष्टाचाराने सगळ्यांची मने विटली आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. पण समाजासाठी आपण काही चांगले काम करत असू तर आपणही चोख राहिले पाहिजे, याची जाणीव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. सार्वजनिक मंडळे मोठ्या प्रमाणात वर्गणीच्यारुपाने पैसा गोळा करतात. पण त्या पैशाचे काय करतात, याचा साधा हिशोब ठेवला जात नाही की सारवजनिक केले जात नाही. हजारो मंडळे ही तत्कालीन स्वरुपाची असतात. मंडळांची सरकार दरबारी नोंद नसते. अशा मंडळांच्या या फसवेगिरीला कोण जबाबदार आहेत ? समाजातीलच आपण सारे याला जबाबदार आहोत. मंडळाचे रजिस्ट्रेशन नसेल तर वर्गणी का द्यायची? शिवाय दिलेली वर्गणी आयकर सूटसाठी लागू असल्याने पावती मागणे आवश्यक आहे. पण आता याही पुढचा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक मंडळांनी अनेक वर्षे उत्सवावर खर्च केलेल्या पैशाचे ऍडिट न केल्याचे व हिशोब सादर न केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. म्हणजे या मंडळाचा कारभार सगळा ‘रामभरोसे’ सुरू आहे.
मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कलम 41 (क) नुसार सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. अशी नोंदणी केल्यानंतरच या मंडळांनी सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा करावी असा नियम सांगतो. नोंदणी न करता उत्सव साजरा करणे व उत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी गोळा करणे गुन्हा आहे. त्यामुळे दरवर्षी धर्मादाय कार्यालयात मोठ्या प्रमाणात मंडळांची नोंदणी होत आहे; परंतु ही मंडळे भरमसाठ वर्गणी गोळा करण्यासाठीच नोंदणी करतात. नोंदणी केल्यानंतर या मंडळांनी उत्सवासाठी जमा केलेल्या वर्गणीचा हिशेब पंधरा दिवसांत धर्मादाय कार्यालयात देणे बंधनकारक आहे. मात्र नोंदणी केलेल्या मंडळांकडून उत्सवानंतर वर्गणीचा हिशेब धर्मादाय कार्यालयात दिला जात नाही. असा प्रकार सर्वत्रच उघडकीस आला आहे. वास्तविक याची दखल धर्मदाय आयुक्त आणि शासनानेही घ्यायला हवी आहे. तरच सार्वजनिक पैशाची उधळपट्टी थांबणार आहे.
थोर नेत्यांच्या नावावर, देवी-देवतांच्या नावावर गोळा केलेला पैसा सत्कारणी , विधायक कामासाठी लागला आहे, की नाही , हे वर्गणी देणार्‍याने पाहायला हवे. शासनानेही यासाठी खास पथकाची नियुक्ती करायला हवी. उत्सवाच्यानिमित्ताने होणारा अनाठायी खर्च थांबवायला हवा. मिरवणुकीच्या खर्चावर नियंत्रण असायला हवे. शिवाय मंडळांनी केलेल्या विधायक प्रगतीचा आलेख तपासायला हवा व त्यानुसारच त्यांची नोंदणी कायम ठेवावी अन्यथा त्यांच्या नोंदण्या रद्द करण्यात याव्यात. त्यामुळे भरमसाठ वाढत चाललेल्या पावसाळातल्या छत्र्यांसारख्या अशा मंडळांवर नियंत्रण राहील आणि आळा बसे. —
मच्छिंद्र ऐनापुरे

— मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..