नवीन लेखन...

सावली

लहान मुलांची चित्रकला स्पर्धा होती. मुलांचा वयोगट होता 6 ते 10. सुमारे 400 मुलं शाळेतल्या वर्गात, व्हरांड्यात किंवा मैदानात कुठेही बसून, त्यांना आवडेल ते चित्र काढत होती. पालकांना मात्र शाळेच्या बाहेर रस्त्यावरच कोंडून ठेवलं होतं. पालकांची धुसफूस सुरू होती पण मुले आनंदात होती.

या स्पर्धेसाठी काही खास विषय असा नव्हता. जेव्हा मुलांना सांगितलं कि, “तुम्हाला आवडेल ते चित्र काढाठ तेव्हा काही मुलांना चित्रच काढता येईना. ती मुले अस्वस्थ होत म्हणाली,’काहीतरी विषय सांगा नाहीतर आम्ही आमच्या बाबांना तरी विचारतो.”मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवा,’त्या मुलांनी आत्तापर्यंत त्यांच्या आवडीचं चित्र कधी काढलंच नव्हतं! बाबा सांगतील तेव्हा व बाबा सांगतील तेच चित्र त्यांनी काढलं होतं.’ ‘इथे तुम्हाला कुणी रागावणार नाही, तुमचं चित्र चुकलं असं कुणी म्हणणार नाही, तुम्ही हव्या त्या रंगात, तुम्हाला हवं ते चित्र काढा’ असं त्या अस्वस्थ मुलांना समजावून सांगताना नाकीनऊ आले. कारण हे ‘निर्भय विश्व’ त्यांच्यासाठी नवीनच होतं. त्यातल्या एकाने माझा हात गच्चं धरत अविश्वासाने विचारलं, “ही सगळी मुलं पण कुठलंही चित्र काढणार?” त्याला जवळ घेऊन थोपटत म्हणालो, “हो कुठलंही चित्र काढणार..त्यांना आवडेल ते काढणार..”माझा हात झटकत तो म्हणाला, “मी पण कुठलंही..आवडेल ते..” कानात वारा शिरल्यासारखी ती मुलं उधळली आणि मैदानातल्या मुलांत मिसळली.

मुलांनी आपापले रंग आणले होते. मुलांची रंगांची देवाणघेवाण सुरू होती. मुले मन लावून काम करत होती. संपूर्ण शाळेत आणि मैदानात अथांग रंगीत शांतता तुडूंब भरली होती.400 मुलं गोंधळ करतील, उगाचच इकडे तिकडे नाचानाच करतील असा आम्हा मोठ्या माणसांचा समज होता. पण, “चित्र काढता-काढता ही मुले चित्रातच गेली कि काय?” असं वाटावं असा सर्जनशील सन्नाटा शाळेत! आणि समजदार पालकांचा कलकलाट शाळेबाहेर! मुले रांगेत बसली नव्हती आणि ताठ ही बसली नव्हती. ती त्यांना हव्या त्या ठिाकाणी हवी तशी बसली होती. मुलांना काही हवं-नको पाहण्यासाठी आम्ही काहीजणं मुलांमधून फिरत होतो. पण कटाक्षाने त्यांना कुठलीही सूचना करत नव्हतो. याचवेळी मला भेटली,इयत्ता पहिलीतली प्रिया.

प्रियाचं चित्र पाहून क्षणभर मला वाइट वाटलं. तिला मदत करण्याची व तिला सल्ला देण्याची अनिवार उबळ मला आली. तिने चित्रात संपूर्ण पानभर पसरलेलं हिरवं झाड काढलं होतं. त्या झाडाखाली काही मुले खेळत होती, काही खात होती, काही मुले लोळत वाचत होती. पण त्या सर्व मुलांचे कपडे, त्याची खेळणी व त्यांची पुस्तकं प्रियाने हिरव्याच रंगात रंगवली होती. आणि तिचं हे हिरवा रंग देण्याचं काम सुरूच होतं. मला वाटलं एक तर प्रिया आळशी असेल, एकच हिरवा खडू घेऊन तिने तो सगळीकडे घासला असेल. किंवा तिच्याकडे दोनच खडू असतील. हिरवा आणि चॉकलेटी.

मी प्रियाच्या बाजूला मांडी घालून बसलो. आणि माझ्या आवाजाला उसन्या प्रेमाची झालर लावत तिला म्हणालो, “अगं तुला आणखी खडू हवेत का? वेगवेगळ्या रंगात रंगव की, या मुलांचे कपडे,त्यांची खेळणी आणि पुस्तकं. बघ ना आजूबाजूला.. मुलांनी किती सुंदर रंगीबेरंगी कपडे घातले आहेत ना? काय? हा घे रंगीत खडूंचा नवीन बॉक्स.”

माझ्या या चमकदार बोलण्याने आणि मी देत असलेल्या नवीन बॉक्सने ती भारावून जाईल, असं मला वाटलं होतं. पण मी ज्या हातात बॉक्स धरला होता तो बाजूला सारत ती वज्रासनात बसल्यासारखी बसली. तिने दोन हातात चित्र घेऊन मला दाखवलं. एकदा त्या अपूर्ण चित्राकडे व एकदा माझ्याकडे पाहात ती हळूच हसली.

माझी कीव करत प्रिया म्हणाली, “काका, तुम्हाला या चित्रातली सावली दिसली नाही ना?”

आता माझ्या साक्षात्काराचा क्षण जवळ आल्याची मला जाणीव झाली. मी मनापासून माझी हार कबूल करत मान डोलावली.

मला समजावत प्रिया म्हणाली, “काका, या मुलांच्या कपड्यावर,त्यांच्या खेळण्यावर आणि सर्वांवरच किनई या हिरव्या झाडाची सावली पडली आहे.. हिरवीगार सावली! पाहा नं नीट.. .. अहो काका, माझ्याकडे तर तुमच्यापेक्षा मोठा रंगीत बॉक्स आहे. पण त्याचा काय उपयोग इथे?” तिच्या नजरेतून त्या चित्राकडे पाहताना मी अवाक झालो. मुलांच्या चित्राकडे पाहण्याची एक नवी थृष्टीच मला प्रियाने दिली होती.

मोठ्यांच्या विश्वात झाडांच्या सावल्या काळ्या पडतात, म्हणून मोठ्या माणसांना झाडाच्या सावलीत गेलं की थंडगार वाटतं.

पण मुलांच्या विश्वात झाडांच्या सावल्या हिरव्या पडतात. त्यामुळे मुलांना झाडाखाली गेलं की हिरवंगार तर वाटतंच! पण त्याचं अवघं विश्वंही हिरवंगार होतं!! मी उत्सुकता म्हणून ते प्रियाचं चित्र बाजूलाच बसलेल्या चार-पाच मुलांना दाखवलं. पण त्यात कुणालाच काही खटकलं नाही. त्यांनी चित्र पाहून “सही..सही..” असं म्हणत एकमेकांना टाळ्या पण दिल्या. मी मोठा असल्यामुळे फक्त मलाच ते चित्र प्रथम विचित्र वाटलं होतं.

मुलांनी आपल्या समजतील अशीच चित्रं काढली पाहिजे असं नाही तर मुलांनी काढलेली चित्र आपण त्यांच्याकडूनं समजून घेतली पाहिजेत, असा एकनवीन शोध मला तेव्हा लागला. “मुलांच्या चित्रातलं मर्म ओळखण्यासाठी चित्रकाराची नव्हे तर तुमच्या ह्रदयातल्या प्रेमाची गरज आहे” ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..