राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुन नतमस्तक होत. ह्याचमुळे अहंकाराच खतपाणी त्याला मिळत होत. त्याची घोडदौड चालू होती.
अचानक त्याची नजर एका फकीरावर (साधूवर ) पडली. तो एका झाडाखाली दगडावर बसला होता. दोघांची नजरा नजर झाली. फकीराच्या चेहऱ्यावर एक अविचल, शांत, निर्भय, भाव होता. इतके सैन्य बघून देखील त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता वा भिती दिसून आली नाही. सिकंदरने आपला घोडा त्याच्या पुढ्यांत नेऊन थांबवला. सारे घोडेस्वार थांबले. सिकंदर घोड्यावरुन उतरला. फकीरासमोर गेला. दोघानी एकमेकाना बघीतले. सिकंदर फकीरास आपला परिचय देऊ लागला.
” मी अँलेक्झॉंडर अर्थात सिकंदर युनानहून भारतात आलो आहे. ”
फकीर उठून शांतपणे त्याच्याकडे टक लाऊन बघत होता. थोड्या वेळाने फकीराने चौफेर नजर टाकली. सर्व सेनिकांचे अवलोकन केले. तो सिकंदरकडे वळून विचारु लागला.
” राजा तू येथे कशासाठी आलांस ? ”
सिकंदर छद्मीपणाने हसला. ” मी सम्राट आहे. येथील प्रदेश जिंकून घेणार. संपत्ती लूटणार .” फकीराने हलके व शांतपणे विचारले ” त्या नंतर पुढे काय करणार ? ”
सिकंदर उत्तरला ” पुढे काय ? हे लुटलेले धन युनानला घेऊन जाणार ”
” त्यानंतर काय करणार ? ” फकीराने थोडेसे कुत्सीकतेने विचारले.
” काय करणार त्यानंतर ? कांहीही नाही. शांतपणे जगण्याचा प्रयत्न करीत, उर्वरीत सार आयुष्य व्यतीत करणार ” सिकंदर मोठ्या गर्वाने उत्तरला.
फकीर हसला. तो सिकंदरकडे एक नजर लाऊन बघू लागला. ” राजा हे सारे करुन, इतका उपद्वाप करुन, शेवटी शांततेच्याच मार्गाचा विचार करणार आहेस ना ? मला हसू येत ते याच की तू हे सार झाल्यानंतर, जे करु इच्छीतोस, ते तर मी आजच करीत आहे. – – – –
एका शांततेचा शोध. अनुभव जाणीव ,ज्यात फक्त असेल समाधान, प्रेम आणि नितांत आनंद. “
राजा गंभीर होऊन सारे ऐकत होता. ” राजा तुझ्या बाबतीत एक सत्य परीणाम मला
दूरदृष्टीने दिसतो. तुझ्या शांततेच्या अंतीम प्रयोगांत, एक जाणीव तुला सदैव बेचैनी करील. तुझ्या मनाची होणारी तगमग, उत्सुकता, आशा-निराशेचे झोके, केलेल्या शक्तीप्रयोगाचा पश्चाताप, दुखावलेल्या आत्म्यांचा अक्रोश, आणि तुझा बनलेला अहंकार. हे सारे भावनिक अविष्कार, तुझ्या मनाला त्या शांततेच्या जवळच येऊ देणार नाहीत. आनंदापासून वंच्छीत करतील ”
राजाचे डोळे पाणावले होते. कसल्याश्या अनामिक आंतरीक शक्तीने त्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर फुंकार घातल्याची त्याला जाण आली. जवळची कांही फळे फकीरापूढे ठेवीत, त्याने फकीरास अभिवादन केले. खंतावलेल्या मनाने तो पुढे निघून गेला.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply