सुरुवातीला काही वर्षे सी.टी. स्कॅन मशिन्स ही फक्त डोक्याचेच स्कॅन करीत असत; परंतु विज्ञानातील व मुख्यत: संगणक शास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे स्कॅनिंग होऊ लागले. सी.टी. स्कॅनमध्ये कांदा कापल्यावर जशा चकत्या होतात, तशाच मेंदूच्या अथवा शरीरातल्या इंद्रियांच्या प्रतिमा चकत्यांच्या रुपाने स्क्रीनवर दिसतात. पोटाच्या स्कॅनमध्ये यकृत, प्लिहा, स्वादुग्रंथी, पोट, मूत्रपिंड, पोटातील धमन्या,
नीला, लिंफनोड्स यांचे अतिसूक्ष्म व काळ्या-पांढर्या शेडस् (ग्रेस्केल) मध्ये चकत्यांच्या प्रतिमा येतात. पोटाच्या इंद्रियांच्या प्रतिमा यामध्ये सोनोग्राफी प्रतिमांपेक्षा जास्त स्पष्ट दिसतात. परंतु सी.टी. स्कॅन महागडा असल्याने पोटासाठीदेखील सोनोग्राफी जास्त प्रमाणात केले जाते. या प्रतिमांचे फोटो फिल्मवर काढून सी.टी. स्कॅन तज्ञ यांचा अभ्यास करुन आपला रिपोर्ट देतात.सी.टी. स्कॅन (बॉडी) करायला जाताना रुग्णांनी ३ तास उपाशीपोटी जावे; कारण या तपासात ९९ टक्के कॉंट्रास्ट इंजेक्शन द्यावे लागतेच. कारण आतील इंद्रिये व मुख्यत: धमन्या व नीला व इंद्रियांना झालेले रोग जास्त पांढरे दिसून लगेच कळून येतात. (चोर पकडला जातो) छोट्यात छोटा रोग, छोट्यातला छोटा लिंफ नोड पकडला जाऊन रोगाचे निदान लवकर होते. या स्कॅनचा मुख्य उपयोग कॅंसरमधील स्टेजिंग करण्यात होतो. म्हणजेच कॅंसरचा झालेला लिव्हर व नोडल स्प्रेड. पॅन्क्रीयाज (स्वादुग्रंथी) च्या रोगात हा तपास फारच महत्वाचा ठरतो; कारण हे इंद्रिय या तपासात व्यवस्थित व स्पष्ट दिसते. फुफ्फुसाचे सूक्ष्म परीक्षण करण्यात व फुफ्फुसांत पसरलेल्या कर्करोगात हा तपास महत्वाचा असतो.लिव्हर, फुफ्फुसे यामधील रोगांमध्ये एक सुई घालून त्याची बायोप्सी करणे पूर्वी अवघड असे; परंतु सि.टी. स्कॅनमुळे अगदी अचूक नेम धरुन सुई आत टाकता येते. व झ
ेला रोग साधा आहे की, कॅन्सरचा आहे हे हिस्टो पॅथॉलॉजिकल निदान होऊन रुग्णाला फायदा होतो. हल्ली हार्टच्या ब्लड व्हेसल्सची अॅंजिओग्राफी ही सी.टी. स्कॅनवर करुन किंवा हार्ट व्हेसल्समध्ये झालेल्या कॅल्शिअम डिपॉझिशन्स यांचे निदान
करुन हृदय रोगांच्या मदतीला हा तपास आलेला आहे; परंतु हे मशीन जास्त महागडे व मोठे असते. आजकाल पोटात नळी न घालता सी.टी. स्कॅनमधील सॉफ्टवेअर्समुळे एंडोस्कोपी होऊ लागली आहे; परंतु हे सर्व तपास महागडे असल्याने सर्व रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत. फास्ट मशीन्स उपलब्ध असल्याने पूर्वी ज्या तपासांना अर्धा तास लागत असे, त्याच तपासांना आज फक्त पाच मिनिटेच लागतात. सी.टी. स्कॅनचा उपयोग क्वचितच पाठीचे मणके व डिस्क (स्लिपडिस्क) मध्येही केला जातो; परंतु एमआरआय जास्त स्पष्ट प्रतिमा देत असल्याने जेथे एमआरआय उपलब्ध असेल तेथे तो केला जातो.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply