होन्सफील्ड या शास्त्रज्ञाने संगणकाचा व क्ष किरण शास्त्राचा उपयोग करुन हाडे व फुफ्फुसे या व्यतिरीक्त क्ष-किरणांनी प्रतिमा निर्माण करुन व नुसत्प्रतिमाच नव्हे तर अतिसूक्ष्म फरक कळू शकणारे स्वच्छ व अचूक प्रतिमाशास्त्र मानव जातीला देऊन या क्षेत्रात क्रांतीच केली.
मानवाचा मेंदू, स्पायनल कॉर्ड, छातीतील छोट्या लिंफ नोड्स पोटातील इंद्रिये इतकी स्वच्छ व अतिसुक्ष्म कधीही दिसू शकतील. असे स्वप्नातसुद्धा मानवाने व वैज्ञानिकांने चिंतिले नसेल आणि हे शास्त्र पुढे प्रगत होऊन मेंदूचे वगैरे विकार लवकरात लवकर समजू लागले.
या शास्त्राचे खरे वरदान ठरले ते म्हणजे डोक्याच्या मारामध्ये जेव्हा डॉक्टर कवटी उघडूनच आत बघून तपासत असत त्यांना या शास्त्राने मेंदूच्या इजा छोट्या अथवा मोठ्या आधीच कळून ऑपरेशन करायचे की नाही हे ठरवता येऊ लागले. डोक्याला ज्या बाजूला मार लागतो त्याच्या विरुद्ध दिशेला रक्त साठू शकते (काऊंटरकूप) अशा परिस्थितीत मार लागल्याच्या विरुद्ध दिशेला ऑपरेशन करावगे लागते ! हे सर्व गोंधळ या शास्त्राने संपुष्टात आणले.
डोक्याच्या मारामध्ये C.T. स्कॅन रुग्णाचा प्राण वाचवू शकते. या तपासात दोन प्रकार असतात. एक साधा किंवा प्लेन सि.टी. स्कॅन व दुसरा प्लेन आणि कॉंट्रास्ट ज्यामध्ये दुसर्या पायरीत एक औषध शिरेतून देऊन इंद्रियांची आधिक माहिती समजली जाते. दिलेले औषध त्या त्या रोगात शिरुन तो रोग अजून स्पष्ट दाखवते याला एनहान्समेंट असे म्हणतात. मेंदूतला रक्तस्त्राव पांढरा दिसतो म्हणून एकदा का रक्तस्त्रावाचे निदान साध्या स्कॅनवर झाले की कॉंट्रास्ट इंजेक्शन जरुरी नाही.
या तपासासाठी रुग्णाला २ ते अडीच तास पाणी न पिता राहावे लागते. उपाशी गेलेलेही बरे. हे मशिन मोठ्ठे असते व बरेच रुग्ण याला बघून भितात, पण यात घाबरण्यासारखे अजिबात काही नाही. या मशिनच्या टेबलवर आपणास झोपवून डोके थोडे घट्ट बांधले जाते कारण आपण कारण आपण डोक्याची थोडी देखील हालचाल केली तरी प्रतिमा अस्पष्ट येतात. दुसरे असे की आपला डोक्याचा स्कॅन सुरु झाला की बाजूला मशिनमधून एक चक्र फिरल्याचा आवाज येतो, जे आपल्या मेंदुची प्रतिमा काढण्यात मग्न असते. म्हणून आवाज आल्याने गोंधळून जाऊ नये. या तपासाला पूर्वी पाच मिनिटे लागत परंतु या क्षेत्रातही जेट युग आले असून हल्ली एक मिनिटात हा तपास पूर्ण होतो.
हे मशिन महागडे असल्याने व तपासही महागडा असल्याने साध्या डोकेदुखीसाठी स्कॅन सांगणे योग्य नव्हे. परंतु फिट्स येणे, चक्कर येणे, वागणुकीत झालेला एकदम बदल या गोष्टीत हा तपास लवकरात लवकर केलाच पाहिजे. मेंदूला कमी होणारा रक्तपुरवठा, मेंदुतील रक्तस्त्राव (स्ट्रोक), ट्युबरक्युलोसिस (टी.बी.), ब्रेन ट्युमर, जन्मत: मेंदूत असणारे बिघाड, म्हातारपणी अकुंचन पावलेला मेंदू व त्याला कमी रक्तपुरवठ्याचे होणारे रोग यांचे त्वरीत निदान करुन योग्य उपाय सांगितल्यास रुग्णाचे जीवन सुधारते.
स्ट्रोकमध्ये पूर्वीची ट्रिटमेंट म्हणजे छापा की काटा अशी होती. उदा. रक्तस्त्राव / रक्तपुरवठ्यात कमतरता ? एक समजून दुसरी दिली व चूकली की रुग्ण दगावलाच ! हा सर्व गोंधळ सिटी स्कॅन ने संपुष्टात आणला आहे.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply