नवीन लेखन...

स्तोत्रपठणाचं महत्त्व

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.

आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला ‘गीर्वाणभाषा’ म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. ‘रामरक्षा स्तोत्र’, ‘व्यंकटेश स्तोत्र’, ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’ आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून ‘लघुरूद्र’ करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.

डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ ‘रामरक्षा’ स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने ‘राम’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. ‘र’काराला मंत्रशास्त्रात ‘अग्नीबीज’ मानतात. ‘र’ काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. ‘र’काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.

आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. ‘अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स’ या अमेरिकन पुस्तकातल्या ‘अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट’ या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.

संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?

आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.

ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.

तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.

आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.

शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल।

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..