या सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय. क्वचितच या तपासाने नलिका उघडल्या जाऊन पेशंटना फायदा होऊ शकतो. हा तपास ज्या स्त्रियांना मूल होत नसेल अशा स्त्रियांमध्ये केला जातो. बर्याचदा गर्भाशयाच्या नलिका ब्लॉक असतात व या नलिका हा तपास स्पष्टपणे दाखवतो. हा तपास मासिक पाळी सुरु झाल्यापासून १० दिवसांच्या आत व ३-४ दिवसांनी रक्तस्त्राव बंद झाल्यावर केला जातो. १० दिवसांतच का? कारण त्यानंतर जर गर्भधारणा झाली असेल तर गर्भपात होऊ शकतो. हा तपास उपाशीपोटी करावा लागत नाही, म्हणून कोणत्याही वेळेस होतो. यासाठी स्वत: क्ष-किरण तज्ञ अथवा स्त्रीरोगतज्ञ गर्भाच्या तोंडाकडून एक रेडिओपेक इंजेक्शन देतात, जे विशेष कळ देणारे नसते. म्हणून तपासाला भिऊ नये.
हा तपास काळोखात स्क्रिनिंगखाली केला जातो व दोन एक्स-रे काढले जातात. यात गर्भाशय व फॅलोपियन ट्यूब दिसतात व जर त्या नॉर्मल असतील तर औषध ओटीपोटाच्या आत पडताना दिसते. हा एकमेव तपास असा आहे की, याचे फोटो उपलब्ध होतात व कितीही स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला आपणास घेता येतो. या तपासानंतर थोडा काळ औषध बाहेर येते म्हणून सॅनेटरी पॅड दिले जाते. नंतर अॅंटिबायोटिक दिले जाते.
आता दुसरा स्पेशल एक्स-रे फिसच्युलोग्राफी पाहू या. यामध्ये रुग्णाला गुद्दद्वाराभोवती सतत त्रास देणारा (पू येणारा) सायनस झालेला असतो. बाहेरुन साधा व छोटा दिसणारा हा रोग आतमध्ये पराक्रम करत असतो. म्हणजेच मोठा होऊन मोठ्या आतड्यापर्यंत घुसतो व हळूहळू या तोंडातून शौच बाहेर येऊ लागते. म्हणूनच हा तपास करुन रोग आतपर्यंत किती खोल गेला आहे व हा आतड्यात शिरला आहे का हा तपास सांगतो. या तपासात रुग्णाला पालथे झोपवून २-३ सीसी इंजेक्शन या रोगाच्या तोंडापासून दिले जाते. हे औषध रेडिओपेक (एक्स-रेवर स्पष्ट दिसणारे) असते व त्यामुळे फिसच्युलाची लांबी कळून येते.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply