आय.व्ही.पी. हा स्पेशल एक्स-रे मूत्रपिंडाचा त्रास असणार्या बर्याच रुग्णांस माहीत आहे. या एक्स-रेमुळे मूत्रपिंडे कार्य करतात की नाही हे समजते. अर्थात दोन्ही मूत्रपिंडे निकामी असतील, तर हा तपास केलाच जात नाही. म्हणजे फक्त एकच बाजू निकामी झाली असेल तर या तपासावरून समजते. एकच मूत्रपिंड निकामी होण्याची अनेक कारणे आहेत. उदा.: जन्मत: होणारे आजार, पायलोनेफ्रयटीस, फुगलेली किडनी, किडनीचे कॅंसर, किडनी स्टोन (खडे), एक मूत्रपिंड निकामी असले, तर दुसरे कार्य कसे करते आहे हे या तपासावरुन पाहणे महत्वाचे. कारण एका मूत्रपिंडावर मानव संपूर्ण आयुष्य जगू शकतो व तपास हाच दिलासा देतो.
या तपासाआधी रुग्णाचे ब्लड युरिया व क्रियाटिनीन होणे फारच जरुरी आहे; कारण दोन्ही मूत्रपिंडे, निकामी झाल्यास युरिया, क्रियाटीनीन वाढते व अशा परिस्थितीत हा तपास करणेच अयोग्य होय.
या तपासाआधी रात्रीच्या जेवणानंतर अजिबात पाणी पिऊ नये व सकाळी अनशेपोटी, पोट साफ झाल्यावरच क्लिनिकमध्ये जावे (आदल्या दिवशी जुलाबाचे औषध घेऊन) या तपासामध्ये आपणास शिरेमधून इंजेक्शन दिले जाते, जे आपल्या मूत्रपिंडात हळूहळू शिरते व मू४पिंडाचे ५-६ एक्स-रे काढले जाते, जातात. हे इंजेक्शन देण्याअगोदर डॉक्टर आपली कन्सेंट घेतात (फॉर्मवर सही) कारण फारच क्वचित या औषधाची रिअॅक्शन येऊ शकते. परंतु आज आधुनिक औषधांनी व इमर्जन्सी स्पेशालिस्ट बाजूला उभा असल्याने या तपासाला अजिबात भिऊ नये; कारण याचे फायदे अनेक आहेत. आज मूत्रपिंड विकारांत सोनोग्राफी जास्त उपयोगात आणली असली तरीही या तपासामध्ये किडनीची कार्यक्षमता कळते व किडनी आणि खालील युरेटर्स जास्त स्पष्ट दिसतात.
या तपासात रुग्णास पोटाला एक पट्टा अगदी घट्ट बांधावा लागतो, कारण याने किडनीमध्ये येणारे औषध हळूहळू अडवले जाते आणि मगच ते स्पष्ट दिसू लागते यासाठी थोडे सहन करावे आणि पट्टा सोडायला लावण्याची घाई करु नये. चूक झाल्यास पूर्ण तपास परत करावा लागतो ! या तपासात इंजेक्शन देताना तोंड कडू होणे व मळमळ होते. परंतु थोडे लांब श्वास घेताच हे आपोआप हळूहळू कमी होते. शिरेतून ५० सी.सी. दिलेले औषध पूर्णपणे ताबडतोब निघून जाते (मूत्र मार्गानेच). प्राथमिक तपासात एक किडनी दिसलीच नाही, तर रुग्णाने ८ तासांनंतर व क्वचित २४ तासांनंतर पुन्हा एक्स-रेला जाण्याच्या तयारीत रहावे, कारण कधी कधी किडनी हळूहळू औषध सोडते (डिलेड.फंक्शन). क्लिनिकमधून जाण्याआधी रुग्णाने औषध दिलेली सुई डॉक्टरांकडून काडून टाकायला सांगण्यास विसरु नये.
युरेटरमध्ये अडकलेल्या स्टोनचे (मुतखडा) निदान करण्यास हा तपास खूप प्रमाणात केला जातो. कारण युरेटर्स इतक्या स्वच्छ दुसरा कोणताही तपास दाखवू् शकत नाही.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply