स्वप्न आणि सत्य यांच्यात एकच ‘श्रेष्ठ कोण?’ यावरून भांडण सुरू झाले.
‘स्वप्न’ म्हणाले, मीच श्रेष्ठ. कारण कोणताही माणूस आधी स्वप्ने पाहातो आणि नंतर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
त्यावर ‘ सत्य’ म्हणाले, अनेकवेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही ( म्हणजेच स्वनापेक्षाही) अतिशय वास्तववादी असते. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
दोघांचे भांडण विकोपाला गेले. मात्र निर्णय काहीच होईना. म्हणून दोघेही जगन्नियंता असलेल्या परमेश्वराकडे गेले. परमेश्वराने दोघांचीही बाजू ऐकून घेतली व तो म्हणाला की, मला तुमच्या दोघांचीही परीक्षा घ्यायची आहे. जमिनीवर उभे राहून ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील तोच श्रेष्ठ ठरेल.
त्यामुळे दोघेही परीक्षेला तयार झाले.
प्रारंभी सत्याने प्रयत्न केला. त्याने जमिनीवर उभे राहून आभाळाला हात लावायचा प्रयत्न केला. मात्र कितीही प्रयत्न केले तरी त्याचे हात आभाळाला काही केल्या टेकेनात.
आता स्वप्नाची पाळी आली. त्याचे हात एकाच मिनिटात आभाळाला टेकले. मात्र त्याचे खालचे पाय मात्र जमिनीवर नव्हते. स्वप्न तसेच अधांतरी लोंबकळत राहिले.
थोडक्यात या परीक्षेत दोघेही नापास झाले. त्यावर परमेश्वर त्यांना म्हणाला, तुमच्यात श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण, याचे उत्तर देणे अवघड आहे. कारण तुम्ही दोघेही परस्परांना पूरक आहात त्यामुळे ‘श्रेष्ठ कोण’ असा वाद न घालता एकमेकांच्या संगतीने तुम्ही प्रवास केलात तर त्यात दोघांचेही हित आहे.
स्वप्न आणि सत्य या दोघांनाही हे उत्तर पटले व त्यांनी पुन्हा कधी वाद निर्माण केला नाही.
Leave a Reply