जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या भारतीय कलावंतांना ओळखले जाते, जगभरातील रसिकांवर ज्यांच्या कलाविष्काराची मोहिनी आहे त्यामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, थोर कलावंत हाही अखेरीस माणूसच असतो, त्याच्या हातूनही अक्षम्य प्रमाद घडू शकतात, याची प्रचिती या पुस्तकातून येते.
पंडितजींचे थोरले पुत्र राघवेंद्र यांच्या मराठी पुस्तकाचा हा नेटका अनुवाद आहे. पंडितजींनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे आपल्या आईची कशी फसवणूक, आबाळ झाली, दुसऱ्या संसारात रमलेल्या पंडितजींनी दोन पत्नींमध्ये, मुलांमध्ये कसा पक्षपात केला याचे प्रसंगानुरूप दाखले राघवेंद्र यांनी दिले आहेत.
राघवेंद्र यांची आई सुनंदा व पंडितजी ही आते-मामे भावंडं. सुनंदासारख्या गृहकृत्यदक्ष व प्रेमळ पत्नीमुळे भीमूची संगीतसाधना बहरली, त्याला स्थैर्य लाभले, अशी मोहोर पंडितजींच्या वडिलांनीच उमटवली होती. जोशींच्या घरी सोवळेओवळे कटाक्षाने पाळले जात असल्याने पंडितजींच्या पत्नीला विहीरीवरून ओलेत्याने पाणी भरावे लागत असे. घरात शिष्यांचा वावर असल्याने पंडितजींना हे खटकले. त्यांनी वडिलांना सांगितले की, माझी पत्नी हे सर्व करणार नाही, तुम्ही दुसरी व्यवस्था करा…
स्वतंत्र, बंडखोर विचारांचे पंडितजी नामोहरम झाले ते दुसऱ्या लग्नामुळे. एका नाटकाच्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या वत्सला मुधोळकर यांच्यासह त्यांनी दुसरा संसार थाटला, तोही पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन. विशेष म्हणजे, मी केवळ त्यांच्याकडे गाणे शिकायला आले आहे. माझ्या मनात दुसरा हेतू नाही, असे या बाईंनी सुनंदाबाईंच्या पाया पडून सांगितले होते. कालांतराने पंडितजींची दोन्ही कुटुंबे पुण्यात स्थायिक झाली. तरीही, दुसरे कुटुंब ऐश्वर्यात व पहिले कुटुंब जुनाट वाड्यातील एका खोलीत अशी तफावत होती. पहिल्या पत्नीवर व मुलांवर आपण फार मोठा अन्याय केला आहे, याचा गंड मनात असल्याने पंडितजी पहिल्या कुटुंबाला जमेल तशी मदत, हौसमौज करत असत.
राघवेंद्र यांनी एकलव्यी बाण्याने वडिलांचं गाणं आत्मसात केलं. पंडितजींना ते ठाऊकही होतं. परंतु बाईंची खप्पामर्जी स्वीकारून आपल्याला गाणं शिकवण्याचं धाडस ते करू शकले नाहीत. दुसऱ्या संसारात पंडितजींना खरं प्रेम लाभलं नाही. मानसिक अस्थैर्यामुळे त्यांचं व्यसन वाढलं. अचानक गायब होण्याचे प्रकार सुरू झाले. ते कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी घरीच मदिरापान केल्यास हरकत नसावी, असे राघवेंद्र यांनी वत्सलाबाईंना सुचवून पाहिले. परंतु, कला वगैरे काही नाही, हा केवळ धंदा आहे, असे धक्कादायक उत्तर त्यांच्याकडून मिळाले. प्रत्येक मैफलीनंतर मिळणारे मानधनाचे पाकिट ही मंडळी काढून घेत असत. एवढंच नाही, तर सत्तरीनंतरही पंडितजींना मैफली कराव्या लागल्या, ते कुटुंबीयांच्या हव्यासापायीच. मी गायलो नाही तर ही मंडळी मला डॉबरमॅनसारखं बांधून ठेवतील, अशी व्यथा पंडितजींनीच सहकाऱ्यांजवळ बोलून दाखवली होती.
अर्थात, या धक्कादायक चित्रणाव्यतिरिक्त पंडितजींचं लखलखतं व्यक्तिमत्त्वही या पुस्तकातून समोर येतं. लहानपणी सायकलच्या हँडलला जिवंत विंचवांची माळ लावून फिरणारा तसेच अंथरुणात जिवंत साप पडल्यानंतरही न डगमगणारा भीमू, ऐन तारुण्यात हाताने लोखंडी कांब वाकवणारा, उपद्रवी हुप्याचा पाठलाग करून त्याला चोप देणारा बलदंड भीमण्णा, ताटभर लाडू फस्त करणारा खवय्या, सुनंदाबाईंना ‘अलबेला’तील नृत्य हुबेहूब करून दाखवणारा, पं. बिरजू महाराजांसह भान हरपून कथ्थक नृत्य करणारा उपजत नर्तक, कुठेही न शिकता कारची दुरुस्ती करणारा, मैफलींसाठी हजारो किमी.चे ड्रायव्हिंग स्वत: करणारा स्वरभास्कर आणि ऐन सत्तरीतही खड्ड्यात अडकलेले कारचे चाक ताकद लावून बाहेर काढणारा अवलिया… ही पंडितजींची रूपे थक्क करतात.
हा अवलिया मोहाच्या एका क्षणी परतीचे दोर कापून बसला. ‘कसा मला टाकूनी गेला राम’ हा आपणच गायलेला अभंग कदाचित अखेरपर्यंत त्यांचा पाठलाग करत असेल, असं वाटून जातं.
– अनिरुद्ध भातखंडे
भीमसेन जोशीः माय फादर, लेः राघवेंद्र जोशी, अनुवादः शिरीष चिंधडे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पानेः २१९, किंमतः ५५० रु.
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
Leave a Reply