२४ जानेवारी….सकाळ उजाडली आणि बाहेरची काहीतरी कामे करायची ह्याची तयारी करून मी बाहेरच पडणार होतो तेवढ्यात बाबानी “भीमसेन जोशी ” गेले अशी बातमी सांगितली आणि अश्रूंचा बांध फुटला.असंख्य आठवणी मनात दाटून आल्या….. बातमी कधीतरी येणारच होती कारण बरेच दिवस तब्येत बरीच नव्हती. माणूस आलेय म्हणल्यावर जाणारही आहे हे नक्की…
मला आठवतंय तेव्हा सी.डी. नवीन होत्या आणि आम्ही सी.डी प्लेयर घेतला पहिली सीडी :अभांगवाणीची” घेतली.
पांढरा शुभ्र सदरा ..लेंगा ..खांद्यावर शाल असा साधासा पोशाख असलेले भीमसेन जोशी सवाईच्या मंडपात जेव्हा सगळीकडे नजर ठेवून असत तेव्हा दरारा वाटे. अनेक छोट्या मोठ्या कलाकारांबरोबर चहा प्यायला आलेले ,,कोणीतरी पायावर डोकं ठेवत आशीर्वाद घेत असायचे… कोणाला तरी सही घ्यायची असायची.. अत्यंत आदर वाटावे असे व्यक्तिमत्व..
रविवारी काय गाणार ह्याकडे लक्ष लागलेले असायचे.. कान आतुर झालेले असायचे…मंडपात शांतता असायची.. कानावर पडणारे स्वर्गीय सूर मनात,हृदयात साठवून ठेवायला सगळेच उत्सुक असायचे..अतिशय औपचारिक वातावरण असायचे..धुंद…रम्य..सात्विक असे भारावलेले वातावरण…
मग कधी “मिया की तोंडी” कधी “रामकली” कधी “भैरव” कधी “आसावरी तोंडी” सगळंच स्वर्गीय असायचे.. अप्रतिम असायचे.. खरं तर मी वर्णन करणे चुकीचे आहे..
पण अजुनही दिवसाची सुरुवात “आसावरी तोंडी” किवा ” ललत ” ने होते… तेव्हा खऱ्या अर्थाने दिवसाची सुरुवात झाली असे वाटते..
एखादी हुरहुरती संध्याकाळ “मारव्याने किंवा पुरिया धनश्रीने साजरी होते…”
मावळतीला सूर्य अस्ताला निघालाय आणि तळजाईच्या टेकडीवर मस्त “मारवा” ऐकावा… ह्यासारखे सुख दुनियेत नाही..
मस्त झोपाळ्यावर बसावे…झाडावर पक्षी किलबिलाट करत असावेत आणि आपण धुंद..होऊन “यमन ” ऐकावा..
खर म्हणजे दिवसाच्या कुठल्याही प्रहराला कुठलाही राग ऐकावा तो मनाला शांतीच देतो..
शास्त्रीय संगीत ऐकण्याची गोडी भीमसेन जोशींनी लावली… मी तर असंख्य मैफिली ऐकल्या.. चार चार तास चालणारी अभांगवाणी ऐकली.त्यात तल्लीन होऊन “जय जय राम कृष्ण हरी” म्हणणारी त्यांची मूर्ती अजूनही डोळ्यासमोर येते…
मला सांगा माणसाला जगायला काय लागते ह्या शिवाय…
अजूनही त्यांच्या घरासमोरून जाताना मान आपोआप झुकते डोळे दोन क्षण मिटतात…
खर तर ह्या लोकांनी आपली आयुष्य उजळून टाकली.. समृद्ध केली..
अशाश्वत, स्वार्थाने आणि दुःखाने भरलेल्या या जगात शास्वत काय असेल तर तो फक्त सूर आहे.. आणि त्यात भीमसेन जोशींचे स्थान कायमच वरचे आहे.. गेली १३ वर्ष सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे मी करत असलेले काम ही स्वरभास्कराला सर्वात मोठी आदरांजली आहे असे मला वाटते…
~ अमरेंद्र श्रीकांत काळे
( कार्यकारी सदस्य , आर्य संगीत प्रसारक मंडळ )
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित
पंडितजींबद्दल छान माहिती!