राज्यातील इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) या संसर्गजन्य आजाराची शासनाने गंभीर दखल घेतली असून अंमलबजावणी यंत्रणेत सुसूत्रता, समन्वय आणि नियंत्रण ठेवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय कोअर ग्रुप’ची स्थापना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगितले.
राज्यातील स्वाईन फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री शोभा बच्छाव, मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ, मुख्य सचिव जॉनी जोसेफ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिव शर्वरी गोखले, वैद्यकीय शिक्षण सचिव भुषण गगराणी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच सातारा, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर या सबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
‘राज्यस्तरीय कोअर ग्रुप’मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिव, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्याबरोबर सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी, महासंचालक माहिती व जनसंपर्क, पुणे विभागीय आयुक्त यांचा समावेश राहील तर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय कोअर ग्रुपमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींचा समावेश राहील.
इन्फ्ल्यूएंझा ए (एच१एन१) हा आजार नियंत्रणात असून यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा तसेच मनुष्यबळ शासनाकडे उपलब्ध आहे. या आजाराचा संसर्ग झालेला रुग्ण, त्याच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि या रुग्णाच्या संपर्कात येणार्या व्यक्तींनी ‘एन-९५ मास्क’ वापरण्याची आवश्यकता असून इतर लोकांनी हातरुमाल किंवा साधा मास्क वापरला तरी चालू शकते, असे स्पष्ट करून सद्य परिस्थिती पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुंबईत कस्तुरबा रुग्णालयाबरोबर गोरेगाव येथील सिद्धार्थ तसेच मुलूंड येथील एम.टी अग्रवाल रुग्णालयात तपासणी तसेच विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय वांद्रे येथील भाभा रुग्णालय, बोरीवली येथील भगवती रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील विलगीकरण कक्षात उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या १४० इतकी असून गरज पडल्यास ती ५०० पर्यंत वाढविण्यात येईल. पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हॉयरॉलॉजी’ची सध्याची दररोजची तपासणी क्षमता ३०० वरून ४०० व मुंबईतील हाफकिन या संस्थेची क्षमता ४० वरुन १५० करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना रुग्ण तपासण्यास प्रतिबंध करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्याकडे आलेल्या रुग्णामध्ये इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) चा संसर्ग असण्याची शक्यता आढळल्यास त्यांनी शासनाने अधिकृत केलेल्या नमुना तपासणी केंद्राकडे त्यांना पाठवावे. त्याठिकाणी त्यांचा नमुना घेतला जाऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाईल. परंतु तिथे त्यांचा तपासणी अहवाल येण्याची वाट न पाहता तपासणी केंद्रामार्फत त्यांच्यावर इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) चे संशयित रुग्ण म्हणून औषधोपचार सुरु केला जाईल.
प्रत्येक जिल्ह्यातील मोठया खाजगी रुग्णालयाचा शोध घेण्यात येऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ज्या रुग्णालयात वैद्यकीय सोयी-सुविधा व इतर आवश्यक व्यवस्था असतील व ज्यांची या आजारावर उपचार करण्याची तयारी असेल त्यांना स्वाईन फ्ल्यूचा उपचार करण्यास मान्यता दिली जाईल. यासंबंधीची चर्चा करण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालय प्रतिनिधींची मुख्य सचिव सोमवारी बैठक घेतील. येत्या दोन दिवसांत यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. प्रारंभी निवडक खाजगी रुग्णालयांना परवानगी देऊन आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दहीहंडी तसेच गणेशोत्सवात होणारी गर्दी व सध्याची परिस्थिती पाहता करावयाच्या उपाययोजनांसंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, गोविंदा पथक, गणेशमंडळांचे काही प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य पोलीस भरतीसाठी होणार्या गर्दीचा विचार करुन ती तुर्त पुढे ढकलण्यात आली असून यासंबंधीच्या पुढील तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी यांनी घ्यावेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात होणार्या स्पर्धा, महोत्सव, खेळ यासारखे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात त्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.
साथरोग अधिनियम अधिक स्पष्ट करून काय करावे किंवा करू नये यासंबंधीच्या स्पष्ट सूचना मुख्य सचिवांनी संबंधितांना द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वाईन फ्ल्यूबाबत लोकांना तसेच माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी मंत्रालयात तसेच जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरु करण्याचे आदेशही त्यांनी दिले. हा आजार तसेच यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासंबंधीची माहिती माध्यमांना देण्यासाठी मंत्रालयात संध्याकाळी दररोज ४ वाजता तर जिल्हा स्तरावर संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली जाईल तसेच संबंधित रुग्णालयात रुग्णासंबंधीची माहिती देणारा फलक ठळक स्वरूपात लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यशासनाच्या उपाययोजनांबरोबरच केंद्र शासनाने पुण्यामध्ये चार तर सातार्यामध्ये २ वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पाठवले असून मुंबईसाठी असे पथक पाठविण्याची विनंती आपण केली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
— ‘महान्यूज’
Leave a Reply