स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात? बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो. मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे.
बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल. जनता म्हणजे वासुकी नाग, ज्याला देव आणि दानव दोन्ही मिळून पिळून काढतील. मी म्हणालो बाबा, आपण काय म्हणत आहे, मज अज्ञानीला काहीच बोध होत नाही. शिवाय या घटीला देव कोण, दानव कोण, मित्र कोण, शत्रू कोण काहीच कळत नाही आहे.
बाबा म्हणाले, बच्चा, तुला ठाऊकच असेल आकाशात, पाताळात आणि पृथ्वी तिन्ही लोकांत दानवांचे वेगवेगळे राजे असतात. अमृत वाटण्याच्या अधिकार ज्याच्या कडे राहिलं तोच राक्षसांचा राजा, राक्षसेंद्र ठरेल. समुद्र मंथनाच्याआधी राक्षसेंद्र कोण, हे ठरणे गरजेचे.
तिन्ही लोकांत देवतांची संख्या भारीच, कुणी पर्वतांचे देवता, कुणी जलाचे, कुणी जंगलांचे, कुणी वृक्षांचे, प्रत्येकाला अमृतात वाटा पाहिजे. या शिवाय कित्येक दानव देवतांचे रूप घेऊन केवळ अमृतासाठी राहू-केतू प्रमाणे यंदा ही देवगणात शामिल झाले आहेत. देवतांचे दोन प्रमुख देवता शिव आणि विष्णू दोन्ही स्वत:ला जगाचे उद्धारक समजतात. या कलयुगात समुद्र मंथनातून निघणारे विष पचवायला शिव तैयार नाही त्याला ही अमृतकुंभ पाहिजे. यक्ष, गंधर्व, भूत-पिशाच सारख्यांनी ही आपला वेगळा मोर्चा तैयार केला आहेत. ऐन वेळी ज्या देवता किंवा राक्षसाला अमृतकुंभ मिळण्याची संभावना दिसेल, त्यांची ते मदत करतील, म्हणत बाबा थांबले.
मी पुन्हा विचारले, बाबा आपण सर्वज्ञानी आहात, एक सांगा अमृतकुंभ कुणाला मिळेल? बाबा म्हणाले बच्चा, सत्ययुगाप्रमाणे जो देव आणि दानव मोहिनी रूप धारण करण्यात यशस्वी होईल, तोच अमृतकुंभाच अधिकारी ठरेल म्हणत स्वामी त्रिकाळदर्शीनी डोळे बंद केले आणि ते पुन्हा ध्यानमग्न झाले.
माझ्या समोर दृश्य तरळले, देव-दानव वासुकी नागाच्या मिळेल त्या अंगाला पकडून समुद्र मंथन करीत आहेत, वासुकी नागाचे हाल-हाल होत आहेत. रागाने बेफाम झालेला हा नाग कुणाला डसेल, काहीच सांगता येत नाही. पण एक मात्र खंर, अमृत कुणाला ही मिळो. पिळवणूक ही वासुकी नागाचीच होणार शिवाय त्याला नाग असल्यामुळे अमृत ही मिळणार नाही, विष पचविणेच त्याच्या नशिबी येणार.
— विवेक पटाईत
Leave a Reply