“टीव्ही (दूरदर्शन संच) हे बहुतांशी घरात सर्वात जास्त वापरात येणारी वस्तू” असे चित्र घराघरातून दिसते. या टीव्हीने कोण्या एके काळी निखळ मनोरंजन दिले खरे परंतु कालपरत्वे याच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि या टीव्हीने जनसामान्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरकावच काय तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ढवळाढवळ सुरु केली. याचे नकारात्मक व समाजघातकी परिणाम एकूण समाज भोगतो आहे…!
जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या ओघात आणि स्पर्धेच्या धावपळीत नितीमत्ताच काय तर मानवतेला पणाशी लावून प्रत्येक वाहिनी (चैनल) स्वतःचे आस्तित्व जपण्यासाठी धडपडू लागल आणि यातच सर्वसामान्यांच्या सामान्य आयुष्याची पार राखरांगोळी झाली!
मनोरंजनाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे उदात्त दर्शन, अतिशयोक्तीचा भडीमार आणि अवास्तव जपली जाणारी तत्व पेरली जात आहेत. सामाजिकच काय तर कौटुंबिक एकतेचे वाभाडे काढण्याचे काम काही वाहिन्या व व्यक्तिविशेष ईमानऐताबरे पार पाडत आहे. त्यातून दुष्काळात तेरावा महिना या म्हणीस सार्थ ठरविणारा संथ प्रशासनाचा कागदी प्रपंच ही आग भडकाविण्यास पूरकच ठरतो आहे!!!!
विविध वाहिन्यांचे बोटांवर मोजण्याइतपत कार्यक्रम वगळता बाकी स्वैर-बेलगाम प्रसारणाचा धडाका लावला आहे. हे कमी काय तर कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येत असलेल्या जाहिरातीही भडक आणि आक्षेपार्ह आणि वादास कारणीभूत ठरतील अश्या रुपात बाजार मांडून आहेत.
कित्येक कार्यक्रमांच्या संकल्पना या उत्तम आहे पण सादरीकरणात त्या संकल्पनेची विल्हेवाट लावली जाते. यातून मनोरंजनाऐवजी कमाईचे लक्ष समोर ठेऊन कार्यक्रमाचाच कार्यक्रम केला जातो. जनकल्याणाच्या नावाने कल्याणकारी योजना जनतेला लुबाडून झुरत ठेवतात तसेच मनोरंजन व पब्लिक डिमांड च्या नावाने भडक सादरीकरण, अंगविक्षेप, अंगप्रदर्शन आणि अवास्तव-अतार्किक कल्पनेने एकूण कार्यक्रमचा उघड बट्ट्याबोळ होतो. म्हणजेच चुकीचे संदेश-उपदेश सर्वत्र पसरवून जनसामान्यांचे आणि समाजाचे अहित साधले जात आहे.
गुन्हा व गुन्हेगारीशी संबंधित अनेक कार्यक्रमांत गुन्ह्यास एक पराक्रम तर गुन्हेगारास एका नायक/नायिकेप्रमाणे सादर केले जाते – हे निश्चितच समाजघातकी कार्य आहे. अश्या प्रकारच्या समाजघातकी कल्पनांचे सादरीकरण “ब्रेकिंग न्यूज”च्या रुपाने क्षणोक्षणी होतच असते.
काही वाहिन्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांत, विविध स्पर्धा व इतर कार्यक्रमांत प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला परीक्षक म्हणून नेमले जाते. अश्या कार्यक्रमांत परीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीची परीक्षक बनण्याची लायकी आहे किंवा नाही ही बाबही अगदी सहजतेने दुर्लक्षित केली जाते. म्हणजेच “आनंदी आनंद गडे….” असाच काहीसा मूलमंत्र सर्वत्र नजरेस पडतो.
कौटुंबिक मालिकांचा तर काही नेमच नाही! कोण कधी काय लफडं करेल आणि मालिकेची कशी बोंबाबोंब होईल याचा पत्ताच नाही आणि बिच्चारी जनता “कधी तळयात- कधी मळयात तर कधी फास गळ्यात” यातच नष्ट होत आहे.
टिंगल-टवाळी पर्यंत तर ठीक होते परंतु वर्तमान परिस्थितीत तर अनेक कार्यक्रम/मालिका आदींत पक्षपात, जातीवाद आणि अन्य समाजघातकी तत्वाचा उघड प्रचार दिसून येतो, किंबहुना पक्षपात, जातीवाद, प्रांतवाद आदी समाजघातकी व देशघातकी घटकांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करून सामाजिक समतोल बिघडविण्यास हातभार लावत आहेत. “ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला…” या उक्तीस वास्तव ठरवीत जाहिरातीही असेच काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत.
त्यामुळे सहकुटुंब आणि सहपरिवार मनोरंजनाचा आस्वाद घेणे ही बाब दुरापास्तच काय तर इतिहासजमा झाली आहे.
ही एक बाजू मांडून होत नाही तोच आजघडीला महत्वपूर्ण असलेल्या बातम्या व माहिती देत असलेल्या विशेष वाहिन्यांचा विचार येतो. या वाहिन्याचे लक्ष बातमी व माहिती पुरविणे नसून “ब्रेकिंग न्यूज” देणे आहे आणि हे ही एकमेकांशी सर्वस्तरीय स्पर्धा करून! ही स्पर्धा इतकी टोकाची असते की नेमकी मूळ व विश्वासार्ह बातमी कोणती याचा उगम दर्शकाला बहुधा होतच नाही…..!?!
बहुतांशी वाहिन्या “ब्रेकिंग न्यूज” या शब्दाला शब्दशः घेऊनच काम करतात जणू! कारण बातमी वा माहितीची इतकी तोडफोड केली जाते की ती खरच “ब्रेकिंग न्यूज” बनून राहते!!!
सर्वात महत्वाचे ते असे की या सर्व प्रकार याचि देहि याचि डोळा पाहूनही तसेच याबाबत अनेक तक्रारी येऊनही यांवरील नियंत्रण यंत्रणेलाच काय तर कोणालाच काही करावेसे वाटत नाही याचे मूळ आहे विविध वाहिन्यांत/कार्यक्रमात गुंतलेला अफाट पैसा! तो पैसा जो कोण्या उद्योगपतीचा किंवा कोण्या राजकारण्याचा किंवा कोण्या प्रतिष्ठिताचा आहे आणि तो त्याने/तिने गुंतविला आहे फक्त अफाट कमाईसाठीच! त्याला/तिला समाजहित व देशहिताशी काहीच देणेघेणे नाही. समाज बिघडला-बुडाला तरी, मानवतेची अशीच विडंबना होत राहिली तरी, मानवी नीतिमूल्ये अशीच स्वाहा/राख होत असतील तरीही……!?! म्हणजेच हा धांगडधिंगा असाच चालत रहित – आपली सद्सदविवेकबुद्धी सक्रीय होऊन हे सर्व थांबवित नाही तोपर्यंत आणि वास्तवात एक कार्यक्षम यंत्रणा आस्तित्वात येऊन (आपण अस्तित्वात आणून) प्रत्यक्षात हे सर्व काही नियंत्रित करत नाही तोपर्यंत…….
द्वारा : <आय.एस.काझी
(मुक्त पत्रकार, उस्मानाबाद – महाराष्ट्र)
— आय एस काझी
Leave a Reply