विजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही. कोणतीही गोष्ट कोणाकडूनही हट्ट करून मिळविण्यापेक्षा ती स्वः कर्तुत्वावर आणि मेहनतीने मिळविण्यावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याने जर ठरविले असते तर त्याला त्याच्या आयुष्यात बर्याच गोष्टी आयत्या अगदी सहज मिळविता आल्या असत्या, त्या प्रकारच्या अनेक संध्या त्याला अगदी काल परवा पर्यतही चालत आल्या होत्या पण त्याने त्यांचा स्विकार केला नाही. विजयने त्याच्या मित्र-परिवाराने आणि कुटूंबातील व्यक्तींनी त्याच्याकडे केलेले हट्ट बर्याचदा त्याच्या मनाविरूध्द ही पूर्ण केले. विजय शाळेत असताना त्याचे चित्रकार होण्याचे स्वप्न पाहिले होते पण त्यासाठी लागणार्या रंग व इतर साहित्याचा हट्ट त्याने आपल्या कुटूंबाकडे कधीच धरला नाही कारण त्या अजाणत्या वयातही त्याला आपल्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीची जाण होती. त्यामुळे त्याने आपले चित्रकार होण्याचे स्वप्न गुंडाळून ठेवले.
विजय अभ्यासात अतिशय हुशार होता पण शाळेय स्पर्धेत अग्रक्रमी राहण्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य आणि शिकवण्या वगैरे घेण्याची त्याची ऐपत नसल्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून त्याच्यावर वयाच्या अवघ्या सोळाव्यावर्षी नोकरी करण्याची वेळ आली तेंव्हा ही तो दुःखी झाला नाही. कुटूंबातील इतर व्यक्तींचे हट्ट पुरवावेत म्ह्णून तो प्रयत्नशील राहिला. सर्वांचे हट्ट पुरविता- पुरविता तो हट्ट करणेच विसरून गेला. जिच्यावर त्याचे लहानपणापासून प्रेम होते तिच्याकडे ही त्याने तिच्या प्रेमासाठी हट्ट केला नाही. तिनेही त्याच्याकडे त्याच्या प्रेमाचा हट्ट न केल्यामुळे तो आपले प्रेमही गमावून बसला. त्यानंतर जिने जिने त्याच्याकडे प्रेमाचा हट्ट केला त्याने तिला तिच्या वाट्याचे प्रेम दिले अगदी त्याची प्रेमाची झोळी रिकामी होई पर्यंत. पण त्यापैकी एकीकडे ही त्याने त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला नाही. सर्वांचे हट्ट पुरविता- पुरविता विजयच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची वर्षे भराभर निघून गेली कशी ते त्यालाही कळले नाही. सर्वांचे हट्ट पुरविण्याच्या नादात जेंव्हा तो कफल्लक झाला तेंव्हा एके दिवशी त्याने मागे वळून पाहिले असता त्याच्या लक्षात आले आता आपण जीवनाच्या अशा वळणावर उभे आहोत जेथून माघारी फिरणे शक्य नाही. आता जर आपण इतरांचे हट्ट पुरवू शकलो नाही तर आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही यापूढील आयुष्य आपल्या निरर्थक जागावे लागेल अथवा हे जीवन संपवून सारेच कायमचे संपवावे लागेल. पण का कोणास जाणे दुसर्याच क्षणी त्याने मनात विचार केला हे जीवन संपवून काय मिळणार त्या पेक्षा आपले ते जीवन संपले असे गृहीत धरूनच आपण नव्याने जगायला सुरूवात केली तर ? त्यानंतर विजयने कोणाचाच कोणताच हट्ट न पुरविण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याच्या लक्षात आले आपल्या सभोवतालचा माणसांचा घोळका हळू-हळू कमी होतोय. त्याला अतिशय साधा- भोळा समजणार्यांच त्याचा बाबतच मत बदलतयं. त्याच्या लक्षात आले आपण आणि आपल्या सभोवताळचा घोळका यांना जोडणार माध्यम म्ह्णजे मी पुरवित असणारे त्यांचे हट्ट होते. जे आई-वडिल आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवितात ते आई- वडिल त्या मुलांच्या मते प्रेमळ असतात आणि म्हातारपणी जी मुलं आपल्या आई- वडिलांचे हट्ट पुरवितात ती मुलं आदर्श मुलं ठरतात. विजयच्या मनात असा ही विचार येवून गेला की इतरांचे हट्ट पुरविण्यापेक्षा मी माझेच हट्ट पुरविले असते तर मी एक उत्तम उच्चशिक्षीत चित्रकार झालो असतो समाजात मला मान-सन्मान मिळाला असता माझ्या सभोवताळ्चा घोळका कायमच असाच राहिला असता पण इतरांचे हट्ट पूर्ण करून मोठेपणा मिळविण्याच्या नादात मी इतरांची आयुष्ये घडविली ही असतील पण माझे स्वतःचे आयुष्य उध्वस्त केले होते असा विचार न राहून त्याच्या मनात येत होता. पण काही दिवसानंतर विजयच्या लक्षात आले त्याने इतरांसाठी केलेल्या त्यागाचे फळ त्याला वेगवेगळ्या माध्यमातून अचानक मिळू लागले ज्यामुळे तो पून्हा इतरांचे ह्ट्ट पूर्ण करण्याकरीता पूर्वी पेक्षाही अधिक सक्षम झाला. त्याने स्वप्नातही विचार न केलेल्या गोष्टी अचानक त्याच्या आयुष्यात घडू लागल्या. यश त्याच्या पायाशी लोळ्ण घेऊ लागले तेंव्हा त्याच्या मनात पुन्हा इतरांचे हट्ट पुरविण्याची हुक्की येऊ लागली आणि तो स्वतःशीच म्ह्णाला ,’’ माझा जन्मच कदाचित हट्ट करण्यासाठी नाही तर जगाचे हट्ट पुरविण्यासाठीच झालाय…या जगात.’’
— निलेश बामणे
Leave a Reply