नवीन लेखन...

हवाई दलाची युद्धसज्जता एक महाचिंतेचा विषय: लढाऊ विमानांच्या ताफ्यात सातत्याने घट

लाहोरमध्ये ०२/११/२०१४ ला झालेल्या स्फोटात ६१ जण ठार, तर १०० जण जखमी झाले. वाघा सीमेपासून फक्त ५०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पॅँगाँग लेक परिसरात चीनने अलीकडेच घुसखोरी ०२/११/२०१४ ला समोर आली. याच भागात खुष्कीच्या मार्गानेही पाच किलोमीटर अंतरापर्यंत आपले सैन्य घुसविले.भारताच्या तीव्र आक्षेपास न जुमानता चीनच्या आणखी एका पाणबुडीसाठी कोलंबो येथील बंदराची जागा देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे. व्हिएतनामचे पंतप्रधान ग्युएन तान दंग यांच्या भारत भेटीनंतर हा निर्णय जाहीर झाला आहे.

४४ स्क्वाड्रन ऐवजी केवळ ३१ उपलब्ध
सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत, परंतु मागच्या सरकारच्या हलगर्जीपणाने १९९० पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याची संख्या सातत्याने घटत गेलेली आहे. परिणामी अपेक्षित ४४ स्क्वाड्रन ऐवजी सध्या केवळ ३१ उपलब्ध आहेत. त्यातही ४० ते ६० वर्षे जुन्या विमानांचा भरणाच अधिक आहे.

हवाई दलाच्या ताफ्यातल्या लढाऊ विमानांच्या कमी होणार्‍या संख्येबद्दल ८ ऑक्टो्बर २०१४ रोजी ८२ वा वर्धापनदिन साजरा करतांना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप रहा यांनी चिंता व्यक्त केली.भारतीय हवाई दल या जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु हे काम २०१७ पर्यंत रेंगाळेल.

काल बाह्य विमाने
मिग २१ १९६० साली सेवेत दाखल झालेले सर्वांत जुने विमान आहे. सध्या १२५ विमाने सेवेत आहे. ही विमाने काल बाह्य झाली आहेत. म्हणुन २०१७ पर्यंत त्यांना सेवानिवृत्त करून त्यांच्या जागी भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने आणण्याचा मनोदय आहे. ४८ तेजस विमाने ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ बनवणार आहे.१०० मिग २७ (बहादूर) सध्या सेवेत आहे. ती पण ५० ते ५५ वर्षे जुनी आहेत. विमानांचे आयुष्य साधारण प्रमाणे १५-२० वर्षे असते. आधुनिकीकरण करुन ते अजुन १०-१५ वर्षे वाढवता येते. ही सारी विमाने काल बाह्य झाली आहेत.

मागे पडलेले आधुनिकीकरण
सध्या १३९ जॅग्वार (समशेर), ६६ मिग २९ (बाझ) सेवेत आहेत. ही विमाने चाळीस वर्षे जुनी असून, त्यांचे आधुनिकीकरण चालू आहे. जॅग्वार जमिनीवर व जहाजांवर हल्ला करण्यास उपयुक्त आहेत. मिग २९, जमिनीवर मारा करण्यासाठी किंवा शत्रूच्या विमानांवर हवेत हल्ला करण्यासाठी उपयुक्त आहेत. सध्या ५१ मिराज (वज्र) सेवेत आहेत. हवाई संरक्षण किंवा जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता आहे. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे. यामुळे त्यांचे आयुष्य १०-१५ वर्षे वाढेल.

सुखोई ३१ एम के आय सर्वांत आधुनिक विमान
सुखोई ३१ एमकेआय हे हवाई दलातील सर्वांत आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त विमान आहे. सध्या अशी २०४ विमाने हवाई दलात आहेत, आणखी ६८ पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहेत.

कालबाह्य होत चाललेल्या विमानांच्या जागी फ्रेंच बनावटीची ‘रॅफेल’ ही बहुउद्देशीय विमाने प्राप्त करण्याचे सरकारने मान्य केले असून, अशा १२६ विमानांची मागणी यापूर्वीच नोंदविली गेली आहे. ही मागणी २०२० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पण तो पर्यंत चीनी वाट पाहतिल का?

सुखोई ३०–एम के आय चे अपघात
भारताने १९९० साली रशियाशी या विमानासाठी करार केला आणि २००२ पासून भारतीय हवाई दलामध्ये या विमानाचा शिरकाव झाला. या विमानाचे तंत्रज्ञान रशियाने विकसित केलेले आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतामध्ये हे विमान बांधले जाते. २००२ सालापासून सुखोई ६० विमाने देशातच तयार करून भारतीय नौदलात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सुखोई ३०-एमकेआय या लढाऊ विमानाला १४/१०/२०१४ला पुण्याजवळ अपघात झाला. हे विमान प्रशिक्षणार्थी वैमानिकाकडून चालवले जात होते. हवाई दलाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून या अपघाताची चौकशी सुरु आहे.

सुखोई विमान सुरक्षित मानले जाते; परंतु या विमानांना अलीकडे अपघात होऊ लागला आहे. या घटनांमुळे हवाई दल चिंताग्रस्त आहे. दुसर्‍या अपघातावेळी तत्कालीन हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी या पुण्याजवळच्या लोहेगाव येथे असलेल्या विमानतळाला भेट दिली. त्यांनी स्वत: हे विमान चालवले. हे विमान तांत्रिकदृष्टय़ा सक्षम आणि निर्दोष आहे; अपघात झाला म्हणून पूर्ण विमानावरचा विश्वास उडण्याची काही गरज नाही. झालेले अपघात विमान उड्डाण सुरू असताना अचानक, अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे किंवा वैमानिकांच्या चुकीमुळे झाले असावेत. म्हणून याची कसून चौकशी झाली पाहिजे. भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या ‘सुखोई ३०’ या लढाऊ विमानांपैकी पाचव्या विमानाला झालेल्या अपघातानंतर या २०४ विमानांचे उड्डाण तूर्तास थांबविण्यात आले आहे.

वैमानिकांची, विमानांची आणि हवाई दलाची युद्धसज्जता
हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्लेषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणार्‍या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहीजे.

हवाई दलाची क्षमता आणि त्याचं आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे. मागच्या सरकारने संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण पूर्णपणे थांबवले होते.१९४७-४८ च्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या युद्धानंतर हवाई दलाची मारक क्षमता सिद्ध झाली; पण त्यानंतर ही युद्धक्षमता वाढवण्याचे, विविध आयुधांचं भारतात उत्पादन करण्याचे प्रयत्न कमी पडले. १९६२ च्या चीनविरुद्च्या युद्धात हवाई दलाचा वापर केला नाही. १९६४ मध्ये जे. आर. डी. टाटा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं, देशाच्या पूर्व आणि पश्चिम सीमांच्या संरक्षणासाठी हवाई दलात लढाऊ विमानांची ६४ स्क्वाड्रन आवश्यक आहे, असा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. १९७१ मध्ये भारतीय हवाई दलाने स्क्वाड्रनची संख्या ४० पर्यंत वाढवली होती. मात्र, त्यानंतर हवाई दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत सातत्यानं खंड पडला.

कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही पीछेहाट
भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचे प्रकल्प वर्षानुवर्षं रेंगाळत राहिले. त्यामुळं फक्त तंत्रज्ञानाच्या आघाडीवरच नव्हे; तर कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही पीछेहाट झाली. रखडलेल्या प्रकल्पांमुळं तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्सुक असणारे देशातले तज्ज्ञ प्रकल्प सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरित होऊ लागले.

१५ वर्षांपूर्वी सुखोई भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं. ‘सुखोई’ हे प्रथम रशियाकडून आपण सरावासाठी विकत घेतले. त्यानंतर रशियाच्या सुखोई आणि भारताच्या “हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड” या कंपन्यांनी ‘सुखोई एमकेआय ३०’ हे बहुउद्देशीय लढाऊ विमान तयार केलं आहे. पूर्ण भारतीय बनावटीचे संगणक, संगणक प्रणाली असे तंत्रज्ञानही त्यात बसविले आहे. एकाच वेळी अनेकविध जबाबदार्‍या मोठ्या चपळतेनं आणि अचूकतेनं पार पाडण्याची क्षमता ‘सु-३० एमकेआय’मध्ये आहे.

रेंगाळलेले करार,रखडलेले प्रकल्पांना चालना द्या
नौदलासाठी डॉर्नियर जातीची १२ विमाने बनवण्याचे काम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी उपक्रमातील कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी १८५0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हवाई दलाला पुन्हा आधुनिकतेच्या मार्गावर आणत असताना विमानांची संख्या वाढवण्यावरही भर दिला पाहिजे. आता थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४९ टक्यांपर्यंत वाढवली आहे. संरक्षण क्षेत्रातलं स्वावलंबन वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यातून खासगी कंपन्यांच्या मदतीनं भारतातच लढाऊ विमानांचं उत्पादन करणं शक्य होणार आहे. रेंगाळलेले करार आणि रखडलेले प्रकल्प यांना चालना मिळाल्यास हवाई दलाच्या कमी होणारी स्क्वॅड्रनची संख्या रोखता येईल. या शिवाय कुशल मनुष्यबळाकरता आधुनिक ट्रेनींग विमांनाची तातडीने गरज आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..