हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते
मी हासत हासत रडलो मी दुख पचविले होते
मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया
मी प्रेम म्हणालो आणिक जग प्रेमळ बनले होते
मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली
मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते
मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित गेलो
मी रोज गात अंगाई चंद्राला निजवले होते
मी गगन झुकविले खाली अन् त्यावर लिहिली गाणी
मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते
मज शब्द समजले कोठे? मज अर्थ उमगला कोठे?
पण तुझा स्पर्श झाला अन् मज सारे कळले होते
देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती
मी गझल लिहावी म्हणुनी त्यानेच ढकलले होते
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply