हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्हेतर्हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे.
कंबरेच्या एक्स-रे साठी आदल्या दिवशी पोट साफ होण्याचे औषध घेऊन थोडेफार पाणी अथवा चहा पिऊन एक्स-रे क्लिनिकमध्ये गेल्यास हे एक्स-रे चांगले येतात. मानेचे, पाठीचे व मांडी हाडांचे एक्स-रे काढायचे असल्यास उपाशीपोटी जाण्याची अथवा जुलाबाचे औषधाची गरज नाही.
आजकाल पोर्टेबल एक्स-रे (घरी येऊन एक्स-रे) काढण्याची सुविधा सर्व मोठ्या एक्स-रे क्लिनिकमध्ये उपलब्ध असते व म्हणून रुग्ण घरात पडल्यास व त्याला हलता येत नसल्यास त्वरित क्ष-किरण तज्ञास बोलावून योग्य तो एक्स-रे घरातल्या घरातच निघू शकतो.
गुडघ्यांचे व टाचेचे एक्स-रे शक्यतो दोन्ही बाजूंचे काढणे योग्य होय. गुडघ्यांचे एक्स-रे आरथ्रायटीससाठी (सांध्यांची झीज) तर टाचेचे एक्स-रे वाढलेल्या हाडासाठी (स्पर) सांगितले जातात. गुडघ्यांचे एक्स-रे शक्यतो दोन्ही उभे राहूनच काढण्यास सांगावेत, कारण सांध्यांची गॅप दिसणे जरुरी आहे. हाडांचे जवळजवळ सर्वच एक्स-रे दोन अॅंगलमध्ये काढूनच निदान करता येते हे महत्वाचे. हाडांच्या एक्स-रे वरुन सांध्यांची झीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, डेफिशिअन्सी, हॉर्मोन्समधील खूप दिवसांची डेफिशिअन्सी, फ्रॅक्चर्स, तर्हेतर्हेचे संधिवात, मणक्यांचे सरकणे (लिसुथेसिस) हाडांचे ट्युमर, दुसरीकडे झालेल्या कॅन्सरचा स्प्रेड, स्पॉंडिलायटीस, हाडांचे इन्फेक्शन, लहान मुलांचे अचूक वय अशा गोष्टीचे निदान करता येते. हे स्वस्तात होते म्हणूनच हे एक्स-रे महत्वाचे ठरतात.
एक्स-रे मध्ये अचूक निदान होत नसले तर किंवा झालेल्या निदानाबद्दल आधिक माहितीसाठी पुढे सी.टी.स्कॅन, एम.आर.आय. अथवा आयसोटोप स्कॅन सांगितला जातो. हाडांमध्ये अल्ट्रासाऊंड बिम जात नसल्याने त्यांची सोनोग्राफी होत नाही.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply