स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही
करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची
धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत.
त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक
मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती
संस्कृती ठरते.
या व्यापक अर्थाने सुसंस्कृत कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्याचा परिपाक म्हणूनच की काय, आपल्याकडे
‘स्वेच्छा-मातृत्व’ हा नवा विचार रुजू पाहत आहे. ‘स्वेच्छा-मातृत्व’ अद्यापि अपवादात्मक असले तरीसुद्धा ‘स्वेच्छा-मातृत्व’ म्हणजे
नेमके काय, ते स्वीकारण्यामागची निश्चित भूमिका काय असू शकते, ते स्वीकारण्याची कारणे काय असू शकतात, याचा
सांगोपांग विचार झाला पाहिजे. आज जरी काही तुरळक स्त्तिया ‘स्वेच्छा-मातृत्व’ स्वीकारताना दिसत असल्या तरी उद्या कदाचित
ही संख्या वाढू शकते आणि त्याचे बरे-वाईट परिणाम समाजावर होऊ शकतात.
स्त्रीला निसर्गाने मातृत्वाचा अधिकार दिला आहे. आजची स्त्री स्वतंत्र आहे. मिळवती आहे. समर्थ आहे. अनेक तडजोडी करत
लग्नसंस्था स्वीकारण्यापेक्षा ती मोडीत काढून थेट मातृत्वाचाच अधिकार का मागू नये, असा विचार तिच्या मनात येऊ शकतो.
अशा वेळी ‘स्वेच्छा-मातृत्वा’च्या तिच्या निर्णयामुळे तथाकथित नैतिक चौकटींना हादरे बसणार, हे निर्विवाद. याआधीही अशा हादरे बसविणार्या घटना घडल्या आहेत.
त्यांची योग्यायोग्यता पडताळून
समाजाने त्या पचवल्यादेखील आहेत.
उदा. कुमारी मातेला बाळंतपणाची भरपगारी रजा व औषधांच्या सोयी मिळाव्यात, अशी मागणी झाली. पुढे ही रजा व सोयी
कायदेसंमत झाल्या.
एकेरी पालकत्व (सिगल पेरेन्ट) ही संकल्पना आता आपल्याकडे नवीन राहिलेली नाही. अनेक तडजोडी करत सतत प्रचंड मानसिक तणावाखाली जगण्यापेक्षा लग्न मोडून एकेरी पालकत्व स्वीकारण्याची संकल्पना समाजात मूळ धरू
लागली. अनेक घटस्फोटित, विधवा आया आज समर्थपणे मुलांना वाढवत असल्याची उदाहरणे आहेत. तसेच एकटे किवा विधुर
वडीलही मुलांना यशस्वीपणे मोठे करताना अभावाने का होईना, पण आढळतात.
नवीन विचार, नवीन कल्पना समाजाला नेहमीच पुढे नेत असतात. किबहुना समाज ‘जिवंत’ असल्याची ती खूण आहे. समाजाला
पुढे नेणारे नवे विचारच टिकून राहतात आणि उर्वरित कालबाह्य होतात.
कुटुंबव्यवस्था टिकून राहण्यासाठी जबाबदार असलेला प्रमुख घटक म्हणजे मूल. मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची, संरक्षणाची
दीर्घकाळ आवश्यकता असते. माणसाचे मूल प्रारंभीची 15 ते 18 वर्षे आई-वडिलांवर अवलंबून असल्याने ही अनादि काळापासून
चालत आलेली ही कुटुंबव्यवस्था निदान पौर्वात्य देशांत तरी शतकानुशतके टिकून राहिली आहे.
आजची सुशिक्षित, मिळवती स्त्री जेव्हा स्वेच्छा-मातृत्वाचा अधिकार मागते, तेव्हा ती एकटी परिपूर्ण व मुलाला वाढवण्यास समर्थ
आहे, असा विश्वास तिला वाटतो. आणि तो बर्याच अंशी सार्थही असू शकतो. पण स्त्री एकटीच काही आई होऊ शकत नाही, हे
‘जीवशास्त्रीय’ सत्य नाकारता येत नाही. मग स्वेच्छा-मातृत्वासाठी तिच्याकडे दोन पर्याय असतात- एक म्हणजे ‘वीर्य बँक.’ हा
पर्याय सर्वसाधारण नोकरी करणार्या स्त्रीला परवडू शकत नाही. दुसरा पर्याय म्हणजे कोणत्या तरी दातृत्ववान पुरुषावर अवलंबून
राहणे.
दुसरा पर्याय विरोधाभासी आहे. कारण एकीकडे ही स्त्री मातृत्वासाठी पुरुषावर अवलंबून न राहण्यासाठी पर्याय शोधते, आणि
दुसरीकडे तिला पुरुषावर अवलंबून राहण्याचाच मार्ग स्वीकारावा लागतो.
पितृत्वाच्या जबाबदारीचा त्याग करणारे अनेक पुरुष सापडतील. कारण असे ‘त्यागी’ आपल्याला कमी-अधिक फरकाने सर्वत्रच
आढळतात. त्यांना पिता होण्यात पुरुषार्थ वाटतो; पण पिता म्हणून कायमची पालकत्वाची जबाबदारी नको असते. पण अशा
पुरुषांकडून मातृत्व मिळवून आपण त्यांच्या अनिर्बंध शरीरसंबंधांना मुभा दिल्यासारखेच होईल.
स्वेच्छा-मातृत्व किवा एकटे मातृत्व हा व्यभिचार नाही. त्यात अनैतिकताही नाही. पण त्यातील वैचारिक आणि व्यावहारिक
दोन्ही भूमिका पडताळून पाहण्याची गरज आहे.
एक काळ असा होता की, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी…’ वगैरेसारख्या सु(!)वचनांना आपण तिलांजली दिली. केवळ आई
होण्यात परिपूर्णता नाही, असे जगाला ठणकावून सांगितले. स्वकर्तृत्वाने ते सिद्धही केले. आता परत मागे जात आपण आई
होण्यात धन्यता का मानू पाहतोय, असाही प्रश्न उपस्थित होतो.
स्वत:च्या आई-वडिलांच्या बाबतीत लग्नसंस्था यशस्वी झाली नाही, हे पाहिलेल्या मुलांना आपलेही लग्न यशस्वी होणार नाही,
असे वाटू शकते. अत्यंत नकारात्मक भूमिका घेऊन, लग्नसंस्था नाकारून काही मुली हल्ली स्वेच्छा-मातृत्वाचा विचार करतात. येथे एका परिचित इंग्रजी वचनाची आठवण येते. त्याचा मथितार्थ असा की, सर्व सुखी कुटुंबे सारख्याच पद्धतीने सुखी असतात,
पण दु:खी कुटुंबांची स्वत:ची वैयक्तिक वेगवेगळी अशी कारणे असू शकतात. त्यामुळे एखाद्या कुटुंबात एकमेकांसाठी खूप त्याग
करावा लागला, तडजोडी स्वीकाराव्या लागल्या, ओढाताण सहन करावी लागली, म्हणजे सर्वच कुटुंबांत हे असेच असते असे नाही.
दोघांनी एकमेकांच्या सहवासात सुख मिळवले, त्यांनी एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतली, आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदात
ते एकत्र सहभागी झाले, एकत्र आल्याने त्यांनी एकमेकांचे जीवन अधिक समृद्ध केले, अशीही अनेक उदाहरणे आहेत. ती आपण
का बघू नये? आणि अशी उदाहरणे समजा नसली पाहण्यात, तर आपण ती का निर्माण करू नये? स्वेच्छा-मातृत्वामुळे एखाद्या स्त्रीची मातृत्वाची तहान भागेलही; पण जन्माला आलेल्या मुलाचे काय? त्याला वडीलही हवे
असण्याच्या हक्काचे काय? एकट्या आईचे प्रेम मिळण्यापेक्षा आई आणि वडील- दोघांचेही प्रेम मिळणे हा मुलाचा अधिकार नाही
का? ते मूल अजाण, निरागस, सर्वस्वी दुसकर्यावर अवलंबून असणारे जन्माला आले, हा त्या बाळाचा दोष आहे का? त्याला जर
पर्याय दिला तर ते कशावरून पित्याला प्राधान्य देणार नाहीत? आईची महती, तिचा मुलांच्या वाढीतील सिहाचा वाटा वगैरे सर्व
मान्य करूनही पित्याची भूमिका उरतेच.
स्त्रीने सतत तडजोडी कराव्यात किंवा पुरुष नेहमीच कणखर असतो असे नाही. पण सर्वसाधारणपणे असे चित्र दिसते की,
स्त्रियांमध्ये संवेदनशीलता, तडजोडी करण्याचा स्वभाव, थोडी पडखाऊ वृत्ती अशा स्त्रीसुलभ भावना असतातच. मूल सतत फक्त
आईच्याच सहवासात राहिल्यामुळे त्याला पुढे समाजात वावरताना अडचणी येऊ शकतात. कारण फक्त मातेच्या छत्राखाली झालेली
वाढ एकांगी ठरू शकते.
समाजात राहण्याचे शिक्षण मुलाला कुटुंबातूनच मिळते. फक्त आईच्याच व्यक्तिमत्त्वाची छाप मुलांची वाढ जशी एकांगी करू शकते,
तसेच फक्त वडिलांच्या बाबतीतही होतेच. पण त्याला जर दोन्ही पालक एकाच वेळी मिळाले तर त्याची वाढ निकोप होऊ शकते.
म्हणून तर या प्रक्रियेला ‘पालकत्व’ म्हणायचे. दुर्दैवाने आई-वडिलांपैकी कोणी हयात नसतील किवा घटस्फोटित असतील तर
गोष्ट वेगळी. मात्र, स्वत:हून विचारपूर्वक स्वेच्छा-मातृत्वाचा निर्णय घेऊन, मुलांच्या निकोप वाढीचा विचार न करता त्यांना
एकटीने जन्माला घालणे, ही बाब अनाकलनीय आहे. तो मुलगा असेल तर कदाचित त्याच्यावर मुळातच असा संस्कार होऊ
शकेल की, बायका मुले वाढवायला समर्थ असताना पुरुषांनी जबाबदारी घेण्याची गरजच काय? आणि मी तरी ‘वडील’ (सर्वार्थाने)
का होऊ? (आणि याउलटही घडू शकतं. तो कदाचित त्याच्या ‘संस्कारा’ला न जुमानता कुटुंबव्यवस्था स्वीकारील.) आणि ती
मुलगी असेल तर ती आईच्याही पुढे जाऊन कदाचित मातृत्वही झुगारून फक्त देहधर्माचा हक्क मिळवू पाहील, वा अशा मुलांनी
भिन्नलिगी आकर्षण पाहिलेच नसल्याने ते समलिंगी संबंधांकडे वळू शकतील. अशा अनेक शक्यता आहेत.
या समस्या असणारी मुले सर्वसाधारण कुटुंबांत नसतात असे नाही; पण ‘अशा’ कुटुंबात ही शक्यता अधिक आहे, हे सूक्ष्म विचार
करता पटावे. ‘स्वेच्छा-मातृत्व’ हा विचार म्हणून अनाठायी किवा तोकडा असला, तरी असा विचार करायला स्त्रिया प्रवृत्त का
होतात, याचाही विचार पुरुषांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्रिया ‘पुरुष नकोच’, असे का म्हणू लागल्या आहेत? पुरुष
मात्र कधी असे म्हणताना दिसत नाहीत. त्यांना अगदी बायको नको असली तरी निदान आई किवा बहीण तरी हवी असते. पण
काही स्त्रिया मात्र पुरुषांचे अस्तित्वच नाकारू लागल्या आहेत. असे का?
— भालचंद्र हादगे
Leave a Reply