तुला पाहिले चार भिंतीच आड
मुकपणे अंधार गिळताना
जन्म सौभाग्य राखण्यासाठी
जळत्या चित्तेवर चढताना
जन्मभर तशी तु जळतच होतीस म्हणा
त्याला मरणाचे सौभाग्य लाभु दिले नाहिस इतकेच !
त्यानंतर…
जिवंत रुपात दिसलीस खरी
पण नजर मेलेली बावचळलेली काहीशी भेसूरही
त्यापेक्षा देवत्व बकाल करणारे
ते दिव्य मरण किती बरे होते !
दुरवरुन खोल पाणी खरवडताना
शेतात राबताना,धुणी-भांडी करतानाही
तुला पाहिले कधीच तक्रार नाही केलीस तु
पण तुझ्या धट्टे असलेल्या हातांचा स्पर्श
माझ्या पायांना कळतच नव्हता
असे का वाटते तुला?
बुरख्याआड चेहरा झाकलेला तुला पाहिले
तेव्हा व्यथित झालो मीही क्षणभर
तोंड लपवणे तसे सोपे असते
पण भावना लपविणे सारेच किती अवघड !
पाटीवर गिरवताना तुला पाहिले
तेव्हा तर गंमतच वाटली
गिरवण्या करता तुझ्यासाठी
अक्षरेच नव्हती उरली …
मला त्यावेळी अक्षर घेता आले असते तर..
असो…
आज मात्र तुझ्यापेक्षाही
अलिये माझ्यात म्हणूनच तर
धरणे मोर्च्यातून,सभा परिसंवादातून धीटपणे
माझा उघड निषेध करताना दिसू लागलियेस तू
त्यावेळी
तुझ्या परतीच्या वाटेकडे
डोळे लावून बसलेला असतो मी!
— दिनेश अडावदकर
Leave a Reply