डोळ्यांनी खुणवत होती, ओठांशी खेळत होती
ही कविता जन्माआधी भलतेच सतावत होती
स्पर्शाच्या झाडाखाली मज भेटायाचे होते
शब्दांच्या आडोशाला ती मला पुकारत होती
कुठलाही सण तो नव्हता येणार घरी मी म्हणुनी
ती पणत्या लावत होती, रांगोळी काढत होती
बोलल्याविना माझ्याशी तिजलाही करमत नव्हते
ही माझ्या आवाजाची भलतीच करामत होती
देहाच्या राजमहाली ताटवे फुलांचे फुलले
ती गुलाब समजत माझ्या हदयाला तोडत होती
गझलेची ओळ निघाली यायला मजकडे जेव्हा
नेमके मला ही दुनिया कामाला लावत होती
मी जमिनीवरती होतो, मी जमिनीवरती आहे
डोक्यात हवा गेल्याची अफवा घोंघावत होती
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply