हे तुझे गीत गाताना मी दिसते इतकी सुंदर
माझ्यावर मोहित होते ही धरती अन् ते अंबर
ही तुझी आठवण येता मी मोहरते, मी फुलते
तू दिसल्यावर लखलखते नयनांचे माझ्या झुंबर
मी मला भेटते कोठे तू येण्याच्याही आधी
मी माझी उरते कोठे तू निघून गेल्यानंतर
तू ठेव तुझ्या अधरांनी गालावर माझ्या लाली
तू तुझ्या स्वरांनी माझे हे अवघे कुंतल विंचर
प्रत्येक तुझ्या भासाला मी प्राशन केले आहे
सत्यात उतरण्यासाठी स्वप्नांनी कसली कंबर
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply