आज दिनांक २१ नोव्हेंबर २०१३.. आजच आमच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. काळ कसा जातो ते कळतंच नाही.. कधी प्रेम जडले, कधी लग्न झाले, एका इवल्याशा पाहूण्याने कधी आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि पाहत पाहता दोन वर्षे कधी सरली.. कळलंच नाही.. खरंच कळलं नाहीच.. काही वर्षांपूर्वी एकांकिका करत असताना आमची ओळख झाली.. एकांकिकेमध्ये एकत्र काम केले, चांगली मैत्री झाली, पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आज आमचा चार काटक्यांचा इवलासा संसार आहे.. आई, बाबा, मी, रेशमा आणि जयोस्तु (आमचा मुलगा)…
तसं पहायला गेलं तर आम्ही परस्परविरोधी आहोत.. म्हणजे मी तसा अबोल, मला बोलायला विषयाची गरज लागते आणि आमच्या सौ म्हणजे बोलायला लागल्या की थांबायचं नावंच घेत नाही. ती सहज कुणामध्येही मिसळते.. मी मात्र कुणाच्यात मिसळताना दहादा विचार करतो. तिला सतत माणसांमध्ये राहायला आवडतं.. मी मात्र तसा एकांतप्रिय. माणसं आवडत नाही असं नाही.. पण आयुष्यात एकांत हवा, या मताचा मी.. अजून बर्याच वेगवेगळ्या छटा आहेत.. तरीही आमचं चांगलंच जुळलं.. छोटे-मोठे वाद प्रत्येकाच्याच आयुष्यात होतात.. परंतु तुमच्या प्रेमावर तुमची श्रद्धा हवी.. नव्हे नव्हे उलट अंधश्रद्धाच हवी (अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांना याविषयी हरकत नसावी असे गृहित धरतो, असल्यास मु. पो. मुंबई) असो..
नेहमी अव्यक्त असणारा मी प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीतही अव्यक्तच राहिलो.. तेव्हा कवितेनेच जवळ केले..
गोजिर्या रे माझ्या फुला,
सांगु कसे रे मी तुला.
न कळे तुला नयनांची भाषा.
न येते मला अधरांची भाषा.
मग सांगणे मज जमेल का?
न सांगता तुज कळेल का?
का हे दिवस असेच सरतील.
कुशीत माझ्या लाडके दुःख उरतील.
आणि हासत मी हा विरह प्राशिला.
गोजिर्या रे माझ्या फुला.
पण कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही कविता चांगलीच
ाठ होती.. लग्नाची मागणी घालताना या कवितेचा आधार वाटला. “तुला पाहिलं की वाटतं देव खुप श्रिमंत असेल.. त्याच्याकडची सगळी दौलत तुझ्यावरच उधळली असेल” अशा अनेक कवितांचा भडिमार करत इंप्रेशन मजबूत होत गेलं. तिला माझ्या कविता आवडायच्या.. आवडतात..
पण सावरकरांचे नाव घेऊन शस्त्राने राष्ट्राचे रक्षण करावे अशी छाती वर काढून घोषणा देणारा मी.. प्रेमाच्या बाबतीत मात्र थंडच पडलो.. तिला प्रपोज करताना हात-पाय चांगलेच थरथरत होते.. एकदाचा तो “प्रपोज” सोहळा कसाबसा पार पडला आणि तिने होकार दिला.. नंतर काय??? ठरवलं.. कोणी कितीही विरोध केला तरी लग्न करणार म्हणजे करणार. जगाशीही लढण्याची तयारी होती.. जगाशी लढावे लागले नाही.. पण छोट्या मोठ्या लढाया जिंकत अखेर लग्न झालेच.. कृष्ण हा माझा आवडता देव.. त्यामुळे जिंकण्यासाठी साम, दाम, दंड भेद याचा यथायोग्य वापर कसा करावा हे चांगलेच ठाऊक होते… अखेर लग्न झाले…
या सुमधूर प्रेमाच्या संगीतात विरहाचीही सतार वाजली.. तेव्हा माझ्यासारख्या एकांतप्रिय असणार्यालाही एकांत बोचू लागला.. तेव्हाही कवितेनेच साथ दिली..
“थरथरणारा अंधार
घोंगावणारा वारा
फडफडणारे डोळे
हुरहुरणारे मन
बुडालेला सुर्य
वांझोटे आभाळ
हरवलेला चंद्र
डोळ्यांमध्ये फेसाळणारा,
तुझ्या.. आठवणींचा समूद्र….आय मिस यू…..
अशा कविताही स्फुरल्या.. प्रेमात पडल्यावर “मुझे निंद ना आये,.. करवटे बदलते रहे”…. याचाही चांगलाच अनुभव आला.. तेव्हा.. सुद्धा अशा प्रसंगात कवितेनेच उत्तम साथ दिली..
“ये निद्रे मज बिलगून घे.
तिच्या-माझ्या मिलनाची एकची जागा.
स्वप्न-नगरीच्या त्या सुंदर फ़ुलबागा.
मज प्रिये मिलन होऊ दे.
ये निद्रे मज बिलगून घे.”
मी नेहमी कवितेचा आश्रय घेतला.. पण कधी असा विचार केला नव्हता की रेशमा माझ्या आयुष्यात कविता बनून येईल.. होय ती माझी जिवंत कविताच… आमच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण म्हणजे आमचा जयोस्तुचा जन्म. पहिल्यांदा जेव्हा त्याला पाहिलं आणि डोळ्यात नकळत अश्रू दाटले.. आनंदाश्रू.. तो अगदी त्याच्या आईसारखाच दिसतो. पण स्वभाव आणि गुण माझ्यासारखे वाटतात.. पाहता पाहता जयोस्तुला एक वर्ष पूर्ण झाले.. आणि आज आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस.. त्या निमित्ताने असंच काहीतरी मनातलं.. हा आमच्या प्रेमाचा ग्रंथ.. जो मनाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवला होता.. आज तो या स्वर्णदिनानिमित्त आपल्या समोर ठेवला.. हा ग्रंथ अपूर्ण आहे.. देवाकडे प्रार्थना करतो की हा ग्रंथ कधीच पूर्ण होवू नये.. पिढ्यानपिढ्या लिहिला जावा.. हा प्रेमाचा ग्रंथ… तुम्हा सर्व लहान-थोरांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत, याची खात्री बाळगतो.. जाता जाता एक कविता..
जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,
दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.
कळले मला न काही.
कळले तुला न काही.
कळण्यासारखे आणि,
उरले आता न काही.
भर उन्हात कशी ही पावसाची सर आली
दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.
धन्यवाद, आपला जयेश शत्रुघ्न मेस्त्री
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply