“प्रत्येक घराचा पाया मजबूत असावा लागतो. आपल्या वैश्विक निवासाचा पाया मजबूत असावा लागतो. आपल्या वैश्विक निवासाचा पाया म्हणजे लहान मुले. पण जगात एक कोटी लहान मुले कुपोषणामुळे मृत्युमूखी पडतात. आपल्याला ते टाळता आले पाहिजे, ही अवघ्या
विश्वाची सामुहिक जबाबदारी आहे. जगातील सर्वच मुलांचे आरोग्य व त्यांना मिळणारे शिक्षण यांच्या दर्जावर आपल्या घराचा पाया भक्कम होणे अवलंबून आहे. या घरातील अर्थव्यवस्थेत काही हुशार व्यक्तीच श्रीमंत होउन चालणार नाही; तर जगातील गरिबांचे अश्रू पुसले जातील व बेकारांना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था असणे जरूरीचे आहे. या अर्थव्यवस्थेत युवकवर्ग समाधानी असेल व गैरमार्गाने जाउन गुन्हेगारी करणार नाही. घराचे छत आधूनिक शास्त्र व ज्ञानाने बांधले पाहिजे. त्यासाठी जगातील सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन हातभार लावला पाहिजे. विज्ञान देशांतील सीमा ओळखत नाही. कोणताही नवीन शोध विश्वभर पसरतो. चौथी औद्योगिक क्रांती ही आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक मोठे उदाहरण होउन मानवतेच्या डोक्यावरील छत बनली पाहिजे.
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.
कालच टि.व्हीवर मी लहान मुलांची एक जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीत शाळेतला एक शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी घेत असतो. हजेरी घेताना हजेरी क्रमांक उच्चारल्यावर काही मुले वर्गात तर काही मुले शाळेऐवजी चहाच्या टपरीवर, काही अंगमेहनतीचे काम करताना आणि एक कुमारिका लिपस्टीक लावताना दाखवली आहे. ती जाहिरात पाहून मला फार अस्वस्थ व्हायला झालं. शिकण्याच्या वयात लहान मुलांना मजबूरीमुळे शिक्षणाऐवजी नको ती कामे करायला लागतात. खरं तर आपल्या देशाचा पाया ही लहान मुले आहेत. जर आपणच त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी विसरत असू तर आपण आपल्याच देशाचा पाया पोकळ करायला कारणीभूत असू. पुढे हीच मुले आपल्या कर्तॄत्त्वाबाबत असमाधानी होउन चूकीच्या मार्गाला लागतात. याची उदाहरणे आपल्यासमोर आहेतच. यासाठी महत्त्वाचे म्हणजे शिक्षण,
ते या मुलांना मिळायलाच हवे. त्यावरच ते आपल्या देशाचा पाया आणि देशाची बांधणी करणार आहेत. या विषयावर संदिप वासलेकर यांनी आपल्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात विवेचन केले आहे.
याविषयी तुम्ही फेसबूकवरही माहिती वाचू आणि चर्चा करु शकता. विषय आवडल्यास “Like”वर जरूर क्लिक करा. http://www.facebook.com/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
— तुषार भामरे
Leave a Reply