30 ऑगस्ट 1926
शंभर धावा झाल्या की सलामीवीर म्हणून आपली जबाबदारी संपली आहे असेच जॅक हॉब्जला वाटत असावे. मोठ्या शतकांमध्ये त्याला बिलकुलच रस नसावा असे त्याच्या कारकिर्दीचे आकडे सुचवितात. हा दिवस मात्र त्याला अपवाद ठरला आणि सरधोपट नियम सिद्ध करून गेला. सरेच्या या सलामीवीराने मिडलसेक्सविरुद्ध नाबाद 316 धावा काढल्या. 1990मध्ये ग्रॅहम गूचने भारताविरुद्ध 333 धावा करण्यापूर्वी हा लॉर्ड्सवरील सर्वोत्तम डाव होता. पाच बाद 579वर सरेने डाव घोषित केला आणि डावाने विजय मिळवला. 60,000 प्रथमश्रेणी धावा जमविणारा हॉब्ज हा एकमेव फलंदाज आहे – मोठे डाव खेळलेला नसूनही. त्याला डॉन ब्रॅडमनसारखी मोठ्या डावांची ‘सवय’ असती तर हा आकडा किती फुगला असता याची कल्पनाही करवत नाही.
30 ऑगस्ट 1979 रोजी भारताविरुद्ध ओवल कसोटीच्या पहिल्या दिवशी इअन बोथमने 1,000 कसोटी धावा पूर्ण केल्या. शंभर बळी आणि हजार धावा अशी दुहेरी कामगिरी त्याने केवळ एकविसाव्या सामन्यात केली. यानंतर क्रमांक लागतो भारताच्या विनू मंकड यांचा – 23 सामने.
एक सहस्त्र धावा, शंभर बळी आणि शंभर झेल अशी तिहेरी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच खेळाडू ठरला. पहिला अर्थातच ‘भारी’ गॅरी सोबर्स.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply