होकार तिने देताना मानेस वळविले झटकन
पण मीही जिद्दी होतो शब्दास बदलले झटकन्
हे यश ही कीर्ती माझी हे घर हा पैसा
हे कोणी सांगा मजला मी काय मिळविले झटकन्
भर उन्हात गेलो होतो घर शोधत शोधत त्याचे
गर्वाचे तोरण दिसता मी पाय वळविले झटकन्
शिक्षा न यमाला काही ही चालू त्याची हिसा
मी फक्त मारली मुंगी नरकात ढकलले झटकन्
प्रत्येक ऋतुचे स्वागत करण्याची खोडच मजला
मी कूक ऐकली पहिली खोलीस सजविले झटकन्
वार्धक्य जसे हे आले तारुण्य मागण्यासाठी
मी तारुण्याला माझ्या गझलेत लपविले झटकन्
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply