अश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, अपराजिता देवी पूजन, शस्त्रपूजा करण्याचा रिवाज आहे. पूर्वी राजे या दिवशी युद्धात विजय मिळवण्यासाठी या दिवशी सीमोल्लंघन करून मुहूर्तकरीत असत. या दिवशी शमीचे पूजन करावयाचे असते. शमीपूजनाचा मंत्र असा – “शमी शमयते पापं शमी लोहितकष्टका। धारिण्यर्जुन बाणांना रामस्य प्रियवादिनी।। करिष्यमाण यात्रायां यथाकालं सुखं मम । तत्र निर्विघ्नकत्री त्वं भव श्रीरामपूजिते।।” शमी पापांचे शमन करते, शमीचे काटे लोखंडासारखे तीक्ष्ण असतात. तू रामाला प्रिय आहेस. मी यात्रेला निघणार आहे, ती यात्रा निर्विघ्न व सुखकर कर. अनेक लोक प्रवासाला जाण्यापूर्वी या मंत्राचा जप करतात. प्रवास निर्विघ्न पार पडतो असा समज आहे. पांडवांनी शमीच्या झाडावर आपली अस्त्रे, शस्त्रे ठेवली होती. त्याचे कारण शमी वृक्षामध्ये अग्नी आहे. अग्नीमुळे शस्त्रे गंजणार नाहीत याची त्यांना खात्री होती.
याच दिवशी आपट्याची पाने दिली जातात. हे एक प्रतीक आहे. या पानाचा आकार हृदयासारखा असतो. मी माझे हृदय तुला देतो असा अर्थ आहे. अशा कितीतरी गोष्टी आपल्या संस्कृतीत प्रतिकात्मक दिसतात. अपराजिता ही देवी विजय मिलवून देणारी असल्याने तिचे पूजन आजच करण्यास सांगितले आहे. या दिवशी सोनं लुटतात असे म्हणतात. याचे कारण वरतंतु ऋषींचा कौत्स नावाचा विद्यार्थी विद्या पूर्ण करून घरी जाण्यास निघाला. त्यावेळी त्याने गुरुजींना विचारले आपल्याला गुरुदक्षिणा काय देऊ? तेव्हा ऋषी म्हणाले मी तुला १४ विद्या शिकविल्या तेव्हा १४ कोटी सुवर्ण मुद्रा दे. पण त्या एकाच दात्याने दिलेल्या असाव्यात. त्यावेळी सिंहासनावर असलेल्या रघुराजाकडे कौत्स गेला. पण रघुराजाकडे संपत्ती नव्हती. सर्व यज्ञयागात दान केली होती. अर्थलाभ होणार नाही हे लक्षात येताच कौत्स परत निघाला. पण हे रघुराजाला पटले नाही. त्यांनी निश्चय केला, प्रत्यक्ष इंद्रावर स्वारी करुन कौत्साला धन द्यावे. हे इंद्राला कळताच इंद्राने शमी व आपटा वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. राजाने कौत्साला सांगितले सर्व मुद्रा घेऊन जा. कौत्स म्हणाला मला फक्त १४ कोटीच पाहिजेत. तेव्हढा घेऊन तो गेला. उरलेल्यांचे काय करावे कारण या सर्व खरें पाहता कौत्साच्या आहेत. मी घेऊ शकत नाही. म्हणून त्याने त्या लोकांना लुटुन नेण्यास सांगितले. तो दिवस विजया दशमी (दसरा) चा होता. म्हणून सोने लुटणे असा शब्द रुढ झाला. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी पुराणांत आहेत. या कथेतून विद्वान पंडीतांची चिंता दूर करणारा राजा दिसतो, जे आपले नाही त्याचा स्वीकार करण्यास राजा, कौत्स तयार होत नाहीत, तसेच गुरुचे ऋण फेडण्याची शिष्याची तळमळ, दिलेल्या ज्ञानाची पैशात किंमत होऊ शकत नाही हा गुरुचा तेजस्वी विचार यातून आपण सर्वांनीच काही तरी बोध घेण्याची आवशक्यता आहे.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply