१० ऑक्टोबर १९८७ रोजी भारतात हैदराबादच्या मैदानावर एक उच्चकोटीची एकदिवसीय खेळी झाली. झिंबाब्वेचा कर्णधार डेव हटनने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात १३७ चेंडूंमध्ये १४२ धावा चोपल्या. १३ चौकार आणि ६ षटकारांसह. त्याच्या संघाचा मात्र २४३ धावांच्या आव्हानासमोर एका चौकाराने पराभव झाला.
हा सामना संपेपर्यंत हॉटनचे वजन सुमारे साडेचार किलोने घटले होते आणि पेटक्यांनी बेजार झाल्याने सरतेशेवटी त्याला चालणेही मुश्किल झाले होते. क्रिकेटमधील कामगिरी लक्षात घेता मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो झिंबाब्वेच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ठरतो. त्याची तुलना झाली तर फक्त अन्डी फ्लॉवरशीच होऊ शकते. झिम्मी खेळाडूचा कसोट्यांमधील सर्वाधिक धावांचा डाव डेवच्याच नावावर आहे (श्रीलंकेविरुद्ध २६६). हॉटन क्रिकेतसोबतच झिंबाब्वेच्या राष्ट्रीय संघाकडून हॉकीदेखील खेळला. गोलरक्षक म्हणून त्याने तिकडे चांगलेच नाव कमावले.
झिंबाब्वेतर्फे एकदिवसीय सामन्यांमधील हे पहिलेच वैयक्तिक शतक होते. झिंबाब्वेच्या कसोटी इतिहासातील पहिले शतकही कर्णधाराकडूनच निघाले पण संघाच्या पहिल्या सामन्यातच! १० ऑक्टोबर २००३ रोजी ‘मॅटी’ने वीस कमी चारशे धावा एकाच डावात करीत ब्रायन लाराचा कसोटी डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम मोडला. १८३वर डाव सकाळी पुढे चालू ठेवताना थकलेल्या गोलंदाजांना वारंवार ‘सीमा’ दाखवीत मॅथ्यू लॉरेन्स हेडनने दमदार खेळ केला. क्रीजवरील दहा तासांच्या मुक्कामादरम्यान त्याने कट, पुल, स्ट्रेट ड्राईव्जचा पुरेपूर इस्तेमाल करीत ३८ चौकार आणि ११ षटकार लगावले. प्रतिस्पर्धी झिंबाब्वे, मैदान पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (वाका).
२००१, २००२, २००३, २००४ आणि २००५ या अलग आणि सलग पाच कॅलेंडर वर्षांमध्ये हेडनने कसोट्यांमध्ये १,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. असा पराक्रम पाच वेळा करणारा तो इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला.
अडम गिल्क्रिस्टने याच सामन्यात ८४ चेंडूंमध्ये तीन आकडी धावसंख्या गाठली होती पण तो उंच्यापुर्या हेडनच्या सावलीतच राहिला. दूरध्वनीद्वारे मॅथ्यूचे अभिनंदन करणार्या ब्रायन लाराने त्यानंतर पृथ्वीची सूर्याभोवतीची अर्धी फेरी पूर्ण होण्याच्या आतच इंग्लंडविरुद्ध मॅटीच्या खेळीपेक्षा ‘स्कोअरभर’ धावा जास्त करून हा विक्रम ‘शांतपणे’ पुन्हा एकदा आपल्या नावावर केला. “कांगारू नेहमी संघहिताला प्राधान्य देत असल्याने हा विक्रम एखाद्या कांगारूकडून मोडला जाईल असे आपल्याला बिल्कुल वाटत नाही” असा आवाज त्यांचा कर्णधार असलेल्या रिकी पॉन्टिंगने केला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply