इसवी सनाच्या १९९१ व्या वर्षातील हा दिवस क्रिकेट आणि एकंदरीत जगाच्याच दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस ठरला. २१ वर्षांच्या खंडानंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय क्रिकेट संघ अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या दिवशी खेळता झाला. बेसिल डी-ऑलिव्हेरा प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने वाळीत टाकले होते. आफ्रिकी राज्यकर्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणाचा हा परिपाक होता. ११ फेब्रुवारी १९९० रोजी नेल्सन मंडेला यांची कारावासातून सुटका झाली होती आणि दक्षिण आफ्रिकी क्रिकेटच्या पुनर्प्रवेशास आता पक्त काळाचाच अवकाश होता.
भारतीयांसाठी हा दिवस आणखीनच महत्त्वाचा असण्याचे कारण हे की या दिवशीचा हा ऐतिहासिक सामना भारतातील कलकत्ता नगरातील ईडन गार्डन्स मैदानावर झाला. क्लाईव राईस आणि मोहम्मद अजहरुद्दीन हे या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी कर्णधार होते. क्लाईव राईसच्या वाट्याला तीन आंतरराष्ट्रीय सामने आले, तेही या एका दौर्याीतच.
नियोजित पन्नासाऐवजी हा सामना सत्तेचाळीस षटकांचा खेळविला गेला. पाहुण्यांच्या १७७ धावा ओलांडताना यजमानांचे नऊ गडी फलंदाजीसाठी बाहेर आले आणि त्याचे प्रमुख कारण अलन डोनल्डचे २९ धावांमधील ५ बळी हे राहिले.
एका केप्लर वेसल्सचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या इतर १० जणांनी पदार्पणे साजरे केली. भारताकडून या सामन्यात प्रवीण आमरेने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण साजरे केले. अलन डोनल्ड पदार्पणातच ‘पाचाळी’ घेऊन सामनावीर ठरला पण हा बहुमान त्याला सचिन तेंडुलकरसोबत वाटून घ्यावा लागला. सचिनने ७२ चेंडूंमध्ये ६२ धावा काढल्या. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सचिनप्रमाणेच ८ चौकार आणि एका षटकार मारीत प्रवीण आमरेने पदार्पणातच ५५ धावा काढल्या.
या सामन्यानंतर पाहुणा कर्णधार क्लाईव राईस म्हणाला होता : “नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा त्याला काय वाटले असेल हे मला आता समजू शकते.” दक्षिण
आफ्रिकी क्रिकेटसाठी हा दिवस किती महत्त्वाचा होता हे यातून दिसून येते.
दक्षिण आफ्रिकेच्या
या पुनरागमनानंतर ९ वर्षांनी बांग्लादेश हा भारताचा शेजारी आंतरराष्ट्रीय कसोटीविश्वात प्रवेश करता झाला. बांग्लादेशचा कर्णधार होता नईमूर रहमान आणि योगायोगाने भारताचा कर्णधार होता बांग्लादेशाबरोबर प्रदीर्घ सीमारेषा असणार्या पश्चिम बंगालमधील सौरव गांगुली.
सामना झाला ढाक्याच्या बंगबंधू नॅशनल स्टेडिअमवर. बोंगोबोंधू हे बांग्लादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजिबुर रहमान यांचे बिरुद. या सामन्यासोबत बांग्लादेश आंतरराष्ट्रीय कसोटी खेळणारे दहावे राष्ट्र ठरले. पहिल्याच डावात बांग्लादेशींनी ठरवून खेळल्याप्रमाणे बरोब्बर ४०० धावा काढल्या. अमिनूल इस्लामने १४५ धावा काढीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
गोलंदाजीतील पहिल्या डावातही बांग्लादेशींनी कमाल केली आणि भारताला २९ धावाम्ची नाममात्र आघाडी मिळाली. कर्णधार नईमूर रेहमानने १३२ धावा देऊन सहा भारतीय टिपले. बांग्लादेशींचा दुसरा डाव मात्र गडबडला. केवळ ९१ धावांमध्ये १० गडी बाद झाले. पहिल्या डावात ५ आणि दुसर्या डावात ३ गडी बाद करणारा सुनील जोशी सामनावीर ठरला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply